देशात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या सहा हजारांवर; १९९ जणांचा मृत्यू

नवी दिल्ली :- भारतात गेल्या काही दिवसांपासून कोरोनाबाधितांच्या संख्येत लक्षणीय वाढ झालेली दिसून आली. आरोग्य मंत्रालयानं जाहीर केलेल्या आकड्यांनुसार देशात आतापर्यंत ६४१२ रुग्ण कोरोनाबाधित आढळले आहेत. तर १९९ जणांना प्राण गमवावे लागले आहेत. कोरोनाचा सर्वांत जास्त प्रभाव महाराष्ट्रात दिसून आला. मृतांपैकी ९७ जण महाराष्ट्रातील आहेत. म्हणजेच देशभरातील मृतांच्या संख्येच्या जवळपास ५० टक्के.

मागील २४ तासांत देशात झालेल्या मृत्यूंमध्ये महाराष्ट्रात आठ, गुजरात आणि मध्यप्रदेशात प्रत्येकी तीन, जम्मू-काश्मीरमध्ये दोन तसेच पंजाब, उत्तरप्रदेश, कर्नाटक आणि तामिळनाडूमध्ये प्रत्येकी एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. महाराष्ट्रात सर्वाधिक ७२ लोकांचा मृत्यू झाला आहे. त्यानंतर गुजरात आणि मध्यप्रदेशमध्ये प्रत्येकी १६ लोकांचा मृत्यू झाला आहे. दिल्लीमध्ये नऊ तर पंजाब आणि तामिळनाडूमध्ये प्रत्येकी आठ लोकांचा मृत्यू झाला आहे. तर तेलंगणामध्ये सात लोकांचा मृत्यू झाला आहे.

पश्चिम बंगाल आणि कर्नाटकामध्ये प्रत्येकी पाच लोकांचा मृत्यू झाला आहे. आंध्रप्रदेश, जम्मू-काश्मीर आणि उत्तरप्रदेशमधून प्रत्येकी चार लोकांचा मृत्यू झाला आहे. हरियाणा आणि राजस्थानमध्ये कोरोना व्हायरसमुळे तीन लोकांचा मृत्यू झाला होता. आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, केरळमध्ये संसर्ग झालेल्या दोन व्यक्तींचा मृत्यू झाला आहे. तर बिहार, हिमाचलप्रदेश आणि ओडिशामध्ये प्रत्येकी एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. संसर्ग झालेल्या एकूण रुग्णांमध्ये ७१ विदेशी नागरिक आहेत. बुधवारी आरोग्य मंत्रालयाने मृतांची संख्या १४९ सांगितली होती.