मुंबईत कोरोनाच्या रुग्णांची संख्या सप्टेंबरमध्ये वाढते आहे

Mumbai - Coronavirus

मुंबई : राज्यात आतापर्यंत कोरोनाचे (Corona) ८ लाख ५७ हजार ९३३ रुग्ण बरे झाले आहेत. रुग्णांची एकूण संख्या ही ११ लाख ८८ हजारांवर गेली आहे. राज्यात ऍक्टिव्ह रुग्ण सुमारे तीन लाख आहेत. मुंबईत (Mumbai) गेल्या १५ दिवसांत रुग्णांची संख्या २५ हजारांनी वाढली आहे. ही वाढ आतापर्यंत सर्वांत जास्त आहे. ऑगस्टच्या तुलनेत सप्टेंबरमध्ये रुग्णांचा आलेख सारखा वर सरकतो आहे. रुग्णसंख्येत होणारी ही वाढ आणखी महिनाभर कायम राहील, अशी भीती महापालिकेनं व्यक्त केली आहे.

मुंबईत मे महिन्यातही कोरोनाच्या रुग्णांची संख्या रोज दीड हजारावर गेली नव्हती. मात्र, ती आता दररोज दोन हजारांच्या पार गेली आहे. ऑगस्टमध्ये रुग्णवाढीचा आलेख खाली आला होता. मात्र, सप्टेंबर महिन्यात तो वर गेला आहे. त्यातही पश्चिम उपनगरात हा वेग जास्त आहे.

अनलॉकमुळे मुंबईत कोरोनाच्या रुग्णांची संख्या रोज वाढते आहे. मुंबईच्या पश्चिम भागात बाजार, औद्योगिक संस्था, कार्यालये जास्त आहेत. लॉकडाऊनमध्ये हा भाग कडकडीत बंद होता. मात्र, अनलॉकचा टप्पा सुरू झाल्यानंतर लोक हळूहळू घराबाहेर पडू लागले. लोकांचा संपर्क वाढल्याने कोरोना पसरतो असे महापालिकेचे म्हणणे आहे. अनलॉक करताना अशी वाढ दिसून येईल, याची आम्हाला कल्पना होती. त्या दृष्टीने तयारी करून ठेवली होती, असा दावा महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी केला.

पश्चिम उपनगरातील अंधेरी, मालाड, कांदिवली, बोरिवली या भागांत गेल्या १५ दिवसांत रुग्णांची संख्या फार वाढली आहे. येथे रुग्णसंख्यावाढीचा दर साधारणपणे एका टक्क्यापेक्षा जास्त आहे.

मुंबईतली कोरोनाच्या रुग्णांची संख्या आतापर्यंत १ लाख ८० हजारांपेक्षा जास्त झाली आहे. आतापर्यंत ८३७२ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यात गेल्या काही दिवसांत झालेली वाढ मुंबईकरांची झोप उडवणारी आहे. यापूर्वी मुंबईने ज्या धीराने कोरोनाचा सामना केला, तसाच पुन्हा एकदा करावा, असे आवाहन मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी केले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER