आत्याच्या मृत्यूबद्दल भाच्याची खुनाच्या गुन्ह्यातून झाली सुटका

Ratnagiri District Court - Murder
  • हायकोर्ट म्हणते हा खून नव्हे तर सदोष मनुष्यवध

मुंबई : रत्नागिरी जिल्ह्याच्या राजापूर तालुक्यातील बैंगवाडी, तेरवण येथील जनार्दन ऊर्फ शंकर तकाराम बैंग या इसमाने केलेल्या हल्ल्यात  काशिबाई या त्याच्या आत्याचा १० वर्षांपूर्वी झालेला मृत्यू हा खून नव्हता तर सदोष मनुष्यवध होता असा निशष्कर्ष काढून उच्च न्यायालयाने शंकरला जन्मठेपेऐवजी १० वर्षांच्या सश्रम कारावासाची शिक्षा ठोठावली.

मुळचा बैंगवाडीचा असलेला शंकर मुंबईत नोकरी करतो व पत्नीसोबत मुंबईत राहतो. वरचेवर तो गावी जात असतो. त्याची आत्या काशिबाई बैंगवाडीमध्ये त्याच्या शेचारच्या घरात राहते. १० मे, २०११ रोजी रात्री शंकरने काशिबाई व तिची अविवाहित मुलगी शालिनी यांच्या डोक्यावर बांबूने जोरदार वार केल्याने दोघींचीही डोकी फुटली होती. काशिबाईचे नंतर निधन झाले होते. यावरून दाखल झालेल्या खटल्यात रत्नागिरीच्या सत्र न्यायालयाने शंकरला काशिबाईच्या खुनाबद्दल जन्मठेप व शालिनीच्या खुनाचा प्रयत्न केल्याबद्दल सात वर्षांच्या कारावासाची शिक्षा ठोठावली होती.

याविरुद्ध शंकरने केलेले अपील न्या. प्रसन्न बी. वराळे व न्या. श्रीराम मोडक यांच्या खंडपीठाने अंशतः: मंजूर करून शंकरला काशिबाईच्या खुनाऐवजी सदोष मनुष्यवधाबद्दल दोषी ठरवून १० वर्षांच्या सश्रम कारावासाची शिक्षा दिली. शालिनीच्या खुनाच्या प्रयत्नाबद्दल शंकरला ठोठावलेली शिक्षा कायम ठेवली गेली.

शंकरला भादवि कलम ३०४ (भाग-२) अन्वये सदोष मनुष्यवधाबद्दल दोषी धरताना खंडपीठाने म्हटले की, शंकरला लग्नानंतर तीन वर्षे मूल नव्हते. आत्याने करणी केल्याने आपल्याला मूल होत नाही, असा शंकरचा समज होता. त्यावरूनच वादावादी झाली तेव्हा क्षणिक रागाच्या भरात त्याने काशिबाईच्या डोक्यावर काठीचा वार केला. आपल्या या कृतीने आत्याचा मृत्यू ओढवू शकतो याची त्याला कल्पना असली तरी तिला ठार मारणे हा डोक्यात काठी मारताना त्याचा हेतू नव्हता.

ही घटना घडली तेव्हा आपले मानसिक संतुलन ठीक नव्हते. त्यामुळे भादंवि कलम ८४ चा फायदा देऊन आपल्यावरील संपूर्ण खटलाच रद्द केला जावा, असा मुद्दाही शंकरने अपिलात मांडला होता. परंतु त्याच्या या म्हणण्यास कोणताही पुरावा नाही, असे म्हणून तो अमान्य केला गेला.

-अजित गोगटे

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button