नवीन मुलगी घरात येणार म्हणजे…!

The new girl will come home

कालच माझ्या मैत्रिणींना मी जेवायला बोलावलं होतं. कोरोनामुळे (Corona) भिशी तर बंदच झाली, पण भेटी होतील, थोड्या गप्पा होतील आणि आता कोरोनाची दहशत इकडे ओसरत चालली आहे. त्यामुळे हा प्रोग्राम ठरवला. खूप गप्पा झाल्या. भरीत-भाकरी, गाजराचा हलवा आणि गरमागरम मुगाची खिचडी आणि कढी! मेन्यू सगळ्यांना खूप आवडला. अनिताच्या मुलाचे लग्न ठरले. कालच सुनेसाठी साखरपुड्याची साडी खरेदी केली तिने. फोटो दाखवत होती. तर मयुराच्या मुलीचं लग्न ठरलंय. तिचं जावयाचं कौतुक सुरू होतं. एकूणच आम्ही सगळ्या सासू आणि आजा होण्याच्या वाटेवर चालत आहोत. त्यामुळे आमच्या चर्चेचे विषयही आता बदलले आहेत. सासु बाई आणि नवरा यावरून गाडी आता सध्या तरी नवीन सून व जावयाच्या कौतुकावर मुक्कामास आहे. नेहमी विनोदवीर समजली जाणारी अनिता आज जरा शांत दिसत होती. तरी एकदा एक पंच तिने टाकलाच !. तसं कारण काही नव्हतं पण एकदा कार्य होईपर्यंत टेंशन असतच आणि नवीन मुलगी, सून म्हणून घरात येणार म्हटल्यानंतर…..!

फ्रेंडस ! मुलगी सासरी पाठवणे ही जितकी जबाबदारी असते, त्याहीपेक्षा कदाचित जास्त मोठी जबाबदारी घरात नवीन व्यक्ती तीही आपल्या मुलाचा हात पकडून येणार ही जबाबदारी खूप मोठी असते .त्याचा ताण असतोच. मुलीला काय शिकवायचं, कसं वाढवायचं हे आपल्या हातात असतं, तिला तयार करून आपापल्या परीने आपण पाठवू शकतो. पण लहानपणापासून पूर्ण वेगळ्या वातावरणात, संस्कारात आणि सवयींमध्ये वाढलेली मुलगी जेव्हा घरात येते ावेळी भावी सासु-सासर्‍यांना या जबाबदारीसाठी मानसिक तयारी करायलाच लागते आणि करावी कारण ती काळाची गरज आहे असे वाटते.

प्रत्येकच कुटुंबात बरेच मतभेद संघर्ष असतातच. अशा वेळी नवीन मुली समोर हे काही होऊ नये याचं टेन्शन असतं. सासु ही कुणाची तरी सून, पत्नी असतेच. सुने समोर आपला मान राखून घ्यायचा असतो, ते दडपण असतं. आणि घरातल्या बद्दल मत बनवताना तिचा कुठलाही ग्रह करून न देता आता तुझी मते तू स्वतंत्र बनव, हे सांगावं लागतं. कारण पुढचे नातेसंबंध तिला हाताळायचे असतात.

सून माझ्या अगदी मुलीसारखी म्हणण्यात खूप अर्थ नसतो. कारण ती मुली सारखी असते पण मुलगी नसते ना ! याची जाणीव कधीकधी सुटते. त्यामुळे आपल्या घरात तिला सामावून घेणं खूप कौशल्याचं असतं. खुप प्रेमाने वागून ते सहजरीत्या होईल असं नाही. कारण त्याची आई, तिची आई नसते. हे ” सारखं असूनही नसणं” लक्षात घेतलं गेलं नाही तर गोंधळ होतो.

यात सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तिला सामावून घेताना ती नवीन आहे, तिने बदलावे हा खरंतर अत्यंत गैरसमज आहे. ती नवीन आहे आपल्या घरात येणारी! त्यामुळे तिच्या प्रमाणे थोड्या सवयी पद्धती काही बाबतीत बदलाव्या लागतील. उदाहरणार्थ अति कामसुपणा टाळावा लागेल. कारण आम्हाला आमच्या सासु-सासर्‍यांना खूष करण्यासाठी कामसूपणा दाखवावा लागला होता, पण त्याचा इथे उपयोग नाही. स्विगी ने अधून मधून जेवण मागवणे अंगवळणी पडावे लागेल. आता ट्रेंड बदलला आहे. तरुण पिढी पहिल्या दिवशी पासूनच as usual, जशी आहे तशी स्वतःला परफॉर्म करते. म्हणजे उगीचच अपेक्षा वगैरे वाढत नाहीत.

दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे नवीन घरात मिसळून जाण्यासाठी भरपूर वेळ द्यावा लागतो. त्यासाठी भरपूर पेशन्सही लागतो. महिन्या दोन महिन्यात कोणी बदलून आपल्या घरासारखी होईल ही अपेक्षा व्यर्थच आहे. तो वेळ प्रत्येक व्यक्तिगणिक वेगवेगळा असू शकतो. हे गृहीत धरले तर सासू-सासर्‍यांना त्रास होत नाही.

मुख्य फरक म्हणजे आजच्या मुला-मुलींचे प्राधान्यक्रम हे वेगळे आहेत. कोणतीही सून, ऑफिसला जाणारी तुम्ही घातलेल्या पूजेसाठी सुट्टी काढेलच असे नाही, कदाचित त्या ऐवजी त्याच आठवड्यात ती एखाद्या विकेंड ट्रीपसाठी त्यांच्या सुट्टी काढेल. पण तुलना करता कामा नये. कारण बारा बारा चौदा तासांच्या ड्युटीच केल्यानंतर त्यांना परस्परांसाठी द्यायला वेळ मिळत नाही. त्यामुळे,” तेव्हा कशी सुट्टी मिळाली आज का नाही? मी नेहमीच पौर्णिमेला सत्यनारायण घालते माहित नाही का ?” असं म्हणून चालायचं नाही. सोशल मीडियावर खूप active असलेली ही पिढी प्रत्यक्ष समाजापासून दुरावते. तशीच सवय झाली असू शकते किंवा स्वभाव असू शकतो. त्यामुळे हळदीकुंकू करू, तू तयार हो ! हा प्रेमळ आग्रह सोडावा. कारण मुली ऐकतीलही कदाचित. पण उगीच मनाविरुद्ध गोष्टी करायला लावून कटुता जमा कशाला करायची ?

मुले सुना दूर असतील तर फार संपर्क येत नाही. पण जर एका घरात राहायचे असेल, तर बऱ्याच सवयींना मुरड घालावी लागते. कित्तेक आपल्या चुकीच्या सवयी आपल्याला लक्षातही येत नाही. पण त्या जर लक्षात आणून दिल्या किंवा आवडल्या नाहीत तर त्याचा issue कशाला ? कित्येक बारीक-सारीक गोष्टी असतात. उदाहरणार्थ गुंतवळ इकडेतिकडे उडू न देणे, कधीतरी कंगव्याला न राहू देणे, उगीचच लवकर उठून खाटकुट करून इतरांची झोप न मोडणे, वस्तू जागच्या जागी न ठेवण्याची सवय असेल तर बदलणे, आणि बाबांना पण अनेक गोष्टी बदलाव्या लागतात, घरात हवेत असे अपशब्द न वापरणे, बनियन ,बरमुडा वर न राहणे, सतत चहा न मागणे, पडद्यांना हात न पुसणे, तंबाखू चोळून इकडेतिकडे न फेकणे……!

बरेचदा ही आपलीच मुलं का असा प्रश्न पडतो ? आणि मग त्यांच्यातले हे बदल नव्या मुलीमुळे का? असा उगीचच प्रश्न मनात पडतो. पण खरी परिस्थिती अशी असते की दहावी बारावी पासून बाहेर शिक्षणासाठी राहणारी मुलं, पुढे मोठे झाल्यानंतर काही काही गोष्टींवर आपल्या त्यांच्याबरोबर चर्चा या झालेल्या नसतात आणि त्यांची मतही आपल्याला कळलेली नसतात. तेव्हा लक्षात येतं की आपण त्याला आपलाच अंश म्हणून किती गृहीत धरतो. हे गृहीत धरणे आता सोडावे लागणार असतं, तेही कुठलाच गैरसमज न करून घेता. मग आपण भाजीच्या यादीत पटपट कांदे-बटाटे ,लसून सांगत राहतो,आणि अचानक मुलगा म्हणतो ,”आम्ही बटाटे खातच नसतो. डायट प्रमाणे खायचे नसतात.”त्यामुळे दाचकायच नसतं, तर” ये तो होना ही था !”असं समजून मुले ही आपली प्रतिकृती नाही हे लक्षात ठेवलं तर सोप्पच होतं. त्यामुळे त्यांच्या विचारांचा आदर करायची सवय जर कॉलेज जीवनापासून असली तर सून आपली मुलगी तर नाही पण मैत्रीण होऊ शकते. मात्र पारंपारिकतेची ही चौकट ओलांडून बाहेर आल्याशिवाय घरात येणार्‍या नव्या मुलीशी सूर जुळवणे शक्य होत नाही.

ही बातमी पण वाचा : कायम गृहितच धरता का ?

मानसी गिरीश फडके
(समुपदेशक व सायकोथेरपिस्ट)

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER