बुद्धिप्रामाण्यवादी दृष्टिकोनाचीच गरज

Dr.Harsh Vardhan

Shailendra Paranjapeकेंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन (Dr.Harsh Vardhan) यांनी कोरोनाची (Corona) लस २०२१ च्या पहिल्या तीन महिन्यांत उपलब्ध होईल आणि सुरुवातीला ती कोरोनायोद्धे तसंच वरिष्ठ नागरिक आणि लहान मुलं अशा कोरोनाची भीती सर्वाधिक असलेल्या नागरिकांना दिली जाईल, असं सांगितलंय. दुसरीकडे कोरोनाच्या भारतातल्या चाचण्यांवर बंदी राहणार नाहीय, हेही वृत्तपत्रांतील बातम्यांमधून स्पष्ट झालंय. त्यामुळे कोरोनाची लस आता साधारणपणे पुढच्या सहा महिन्यांत नक्की येईल, असं मानायला हरकत नाही. मार्च महिन्यात पहिला लॉकडाऊन झाला तेव्हा काही जाणत्या नेत्यांनी, तज्ज्ञांनी साधारणपणे वर्षभर कोरोनाचे संकट राहील, असा अंदाज व्यक्त केला होता. आता लस जास्तीत जास्ती मार्च २०२१ पर्यंत येईल, असं केंद्रीय आरोग्यमंत्री म्हणत आहेत.

ते खरं मानाला हवं. तसंच अर्थव्यवस्थेबद्दल सारं काही सुरळीत व्हायला साधारण २०२१ चा मार्च-एप्रिल उजाडेल, असंही सांगितलं जात होतं. ते मात्र आजमितीस खरं वाटत नाहीये. अर्थचक्राला गती द्यायची तर तीदेखील एखाद्याच क्षेत्राला आयसोलेटेड पद्धतीने देऊन उपयोग नाही. तीच गोष्ट कोरोनावरील उपाययोजनांबद्दलही आहे. महाराष्ट्रात विशेषतः पुणे जिल्ह्यात तसंच पश्चिम महाराष्ट्रातल्या पाचही जिल्ह्यांत ग्रामीण भागात कोरोनाचे रुग्ण मोठ्या प्रमाणात वाढताना दिसत आहेत. त्यामुळे दोन दिवसांपूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांचं जन्मस्थान शिवनेरी किल्ला असलेल्या जुन्नर तालुक्यात कोरोनाचे रुग्ण खूपच वाढत असल्याने जुन्नरमध्ये आरोग्य सुविधा मोठ्या प्रमाणात उपलब्ध करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. नेमकी हीच गोष्ट या लेखमालेतून वारंवार मांडली गेलीय.

विकेंद्रित पद्धतीने कोरोनाचा मुकाबला करायला हवा आणि पुण्यात तसंच पिंपरी-चिंचवडमध्ये कोविड जम्बो सेंटर उभारण्यापेक्षा सर्वप्रथम पुणे जिल्ह्यातल्या १३ तालुक्यांसाठी किमान तीन ते चार कोविड सेंटर्स अशा प्रकारे उभारली जावीत जेणेकरून जुन्नर असो की भोरचे शेवटचे टोक किंवा मावळ, मुळशीसारख्या सुदूर भागातले नागरिक, कोणालाही कोरोनाचा संसर्ग झाला तरी रुग्णाची रुग्णवाहिकेतून परवड होता कामा नये. प्रशासनावर आज जुन्नरमध्ये आरोग्य सुविधा युद्धपातळीवर भरण्याची वेळ आलीय तशीच ती अन्य जिल्ह्यातही येऊ शकते.

त्यामुळे कोरोनाच्या संकटाचं संधीत रूपांतर करून विकेंद्रित पातळीवर आरोग्य सुविधा निर्माण करणं सर्वाधिक गरजेचं आहे. ताजा कलम : सध्या विशेषतः गणेशोत्सवानंतर वाढलेली रुग्णसंख्या लक्षात घेता कोरोना ही युद्धस्थिती आहे, हे मान्य करतानाच अर्थचक्र सुरू करण्यासाठी प्रशासनानं पुण्यात स्थानिक बससेवा सुरू केलीय. या स्थानिक बसगाड्यांमध्ये आता एरवीसारखी गर्दीही दिसू लागलीय. तसं असेल तर इतर उद्योग विशेषतः दुकानं, इतर आस्थापना संध्याकाळी सातच्या पुढेही पूर्ववत सुरू करायला काय हरकत आहे… हॉटेल्समधून पार्सलसेवा आजही सुरू आहे; पण हॉटेलमध्ये बसल्याने कोरोना कसा काय पसरू शकतो, हा रंजक प्रश्न आहे.

कारण बसगाडीमध्ये, पीएमपीएमएलच्या बसमध्ये स्वारगेटहून डेक्कन तसंच कोथरूडला माणूस शेजारी शेजारी उभा राहून अर्धा तास प्रवास करतो तेव्हा कोरोना पसरत नाही; पण हॉटेलमध्ये अगदी जेवायलाही पंधरा ते वास मिनिटे पुरतात. मग त्यांना परवानगी का नाही, असे प्रश्न उपस्थित होतातच. त्यामुळे कोरोनाकाळातही अर्थचक्राला गती देताना किंवा आरोग्य सुविधा निर्माण करतानाही बुद्धिप्रामाण्यवादी दृष्टिकोनच ठेवायला हवा आणि राजकारण हद्दपारच करायला हवे. तसे झाले तरच दीर्घकालीन उपाय केले, असे होईल आणि पुढच्या पिढ्याही आपल्याला करंटे म्हणणार नाहीत.

Disclaimer :-‘संपादकीय’ लिहिणारे हे ज्येष्ठ पत्रकार असून त्यांचे स्वतंत्र मत आहे. त्यांच्या लेखासोबत ‘महाराष्ट्र टुडे’चा कसलाही संबंध नाही. आम्ही केवळ त्यांचे मत मांडण्याचा प्रयत्न आमच्या माध्यमातून करत आहोत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER