मुक्ताच्या घराला ‘मधुगंधा’चे नाव !

Mukta Barve & Madhughanda Kulkarni

मैत्रीविषयी काय बोलावं? त्यातही मराठी सिनेमा इंडस्ट्रीमध्ये काम करणाऱ्या कलाकारांच्या मैत्रीचे अनेक किस्से आपण ऐकतो. इथे मधुगंधा कुलकर्णी आणि मुक्ता बर्वे यांच्यातील मैत्रीचा एक किस्सा आहे. त्यातून मुक्ताने घराला ‘मधुगंधा’चे नाव देऊन टाकले आहे.

आपण घराला कुणाचं नाव देतो? आजी-आजोबांच्या आठवणी असलेले नाव देतो. कधी कधी आपली श्रद्धा असते त्या श्रद्धेचे प्रतीक घराच्या नावांमध्ये दिसतं. पण मुक्ताच्या घराचं नाव ‘मधुकृपा’ आहे. हे जरी ऐकलं तर आपल्याला हे नव्याने कळेल की एखाद्या मैत्रिणीच्या प्रेमापोटी तिचे नाव घराला देण्यात काय आनंद असतो. हा किस्सा काय आहे हे मुक्ताने शेअर केले आहे.

मुक्ता कामासाठी मुंबईत आली तेव्हा तिला राहायला जागा हवी होती. सगळ्याच कलाकारांचा हा प्रश्न असतो की राहायचं कुठे. तोच प्रश्न मुक्तासमोरदेखील होता. मुक्ता खरे तर मूळची पुण्याची. कामाच्या निमित्ताने तिला मुंबई राहावे लागणार होते.

मुक्ता सांगते, मुंबईत एकट्या मुलीला राहण्याचा खूप प्रॉब्लेम येतो. घर भाड्याने घ्यायचं झालं की घर मालक अनेक अटी घालतात. ज्यामध्ये तुम्ही पालकांसोबत राहा किंवा घरचं कोणी तरी राहायला बोलवा. तर एकटे राहणार असेल तर रात्री उशिरा घरी येऊ नका. मित्र-मैत्रिणींना घरात बोलवून पार्टी करू नका. पण सध्या अशी अनेक क्षेत्रे आहेत की जेथे मुलींच्या कामाच्या वेळा रात्री उशिरापर्यंत आहेत. अशा वेळी या सगळ्या प्रॉब्लेमला फेस करावं लागतं. सुरुवातीच्या काळात घर भाड्याने शोधताना या सगळ्या गोष्टी फेस केल्या; पण यामध्ये माझ्यासाठी धावून आली माझी मैत्रीण मधुगंधा कुलकर्णी. आपण सगळे एक लेखिका म्हणून तिला ओळखतो. मधुगंधा लेखिका म्हणून उत्तम आहे, तितकीच ती मैत्रीण म्हणूनदेखील प्रचंड भारी मुलगी आहे. तिचं मुंबईत घर होतं पण ती दुसऱ्या घरात राहात होती. ती मला म्हणाली, जोपर्यंत तू स्वतःचं घर घेत नाही तोपर्यंत माझ्या घरी राहा आणि मग मी मधुगंधाच्या घरी भाडेकरू म्हणून आले. ती मला असं म्हणाली होती की, तू लवकरात लवकर माझ्या घरातून बाहेर पडावे, अशी माझी इच्छा आहे. मी हा विषय तिथे सोडून दिला. पण तिच्या डोक्यातून तो विषय जात नव्हता. ती तडक माझ्या पुण्याच्या घरी गेली. तिथे माझ्या आईसोबत बसून तिने माझ्या आर्थिक व्यवहारांची माहिती घेतली.

माझ्याकडे किती शिल्लक रक्कम आहे, माझे असे प्रोजेक्ट आहेत त्यातून मला पैसे देणार आहेत आणि त्यातून मुक्ता नक्कीच मुंबईत स्वतःचे घर घेऊ शकते. तिने मला घरातूनच फोन केला की, आपण तुझ्यासाठी घर बघतोय. मला तर काही कळतच नव्हतं. पण मधुगंधाने इतकी मेहनत घेतली की मला कधी कधी वाटायचं घर माझं होईल; पण त्यासाठी मेहनत तिची आहे. आणि मग आम्हाला एक घर पसंत पडलं. एजंट महिलेला देण्यासाठी आम्ही अडीच लाखांचा चेकदेखील दिला. पण झालं असं की तो चेक मिळाल्यानंतर त्या बाईंनी फोन उचलायचा बंद केला. मला फार टेन्शन यायला लागलं आणि फोन उचलत नाही म्हटल्यानंतर मला एक दिवस सणकून ताप आला. हे बघून आईने मधूला फोन केला. मुक्ताला खूप ताप आला आहे; कारण त्या बाई फोन उचलत नाहीत. त्यांना अडीच लाखांचा चेक दिला आहे म्हणून. मधुगंधा फार धाडशी आहे. तिने मला फोन केला आणि पहिले माझ्या मनातील भीती काढून टाकली.

आणि मला धीर देण्यासाठी ती म्हणाली, अगं बाई कुठे असतील त्यांना शोधून काढून तुझ्यासमोर हजर करेन. आणि आपले कष्टाचे पैसे कधीच वाया जात नसतात. त्यामुळे काळजी करू नकोस. खरंच मी तिच्या बोलण्यानंतर ठणठणीत झाले. त्याच्यानंतर त्या एजंट बाईंचा अचानक फोन आला. त्यांनी त्यांचा काय प्रॉब्लेम झाला होता तो सांगितला. आणि मग आमची घर ताब्यात घेण्याची प्रक्रिया सुरू झाली. काही दिवसांतच आम्हाला गोरेगावचे घर मिळाले आणि या सगळ्या प्रवासात मधुगंधा माझ्या पाठीशी खंबीर उभी होती. तिच्यामुळेच मुंबईत माझं स्वतःचं घर घेण्यापर्यंत असा प्रवास करू शकले. माझ्या घराला ‘मधुकृपा’ हे नाव मी यासाठीच दिलंय. हे नाव बघितल्यानंतर आम्हाला आजही घर घेण्यापर्यंतच्या सगळ्या प्रवासातील गोष्टी आठवतात. त्यामध्ये टेन्शन्स होते , घर घेण्यासाठी भटकंती होती.

आम्ही दोघी माझ्या घराच्या नावाकडे बघतो तेव्हा हा किस्सा आठवतो. खरे तर अनेकांच्या आयुष्याशी जवळीक साधणारा हा किस्सा. प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये घर घेताना आपल्या नातेवाइकांची साथ मिळत नाही, इतकी आपल्या मित्र-मैत्रिणींची साथ घराच्या खरेदीच्या प्रवासामध्ये मिळत असते. मुक्ता बर्वे हिलादेखील तिची मैत्रीण मधुगंधा कुलकर्णी हिने दिलेली ही साथ अशीच कायम तिच्या घरासोबत आठवणीत राहावी म्हणून मुक्ताने आपल्या घराला मधुगंधाचे नाव दिले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER