‘रेमडेसिविर’च्या काळ्याबाजाराची नागपूर खंडपीठाने घेतली दखल

Nagpur HC - Remdesivir - Maharashtra Today
  • अशा लोकांना जरब बसविण्याची गरज व्यक्त

नागपूर :- कोरोना रुग्णांसाठी गुणकारी ठरणार्‍या ‘रेमडेसिविर’ या जीवरक्षक इंजेक्शनच्या तीव्र तुटवड्याचा गैरफायदा घेऊन राज्यात त्याचा काळाबाजार सुरु झाल्याची उच्च न्यायालयाच्या नागपूर (Nagpur) खंडपीठाने दखल घेतली असून हा विषय स्वत:हून सुनावणीसाठी हाती घ्यायचे ठरविले आहे.

‘रेमडेसिविर’ इंजेक्शनचा काळाबाजार करणार्‍या एका डॉक्टरसह ३२ जणांवर नागपूर पोलिसांनी (Nagpur Police) फौजदारी गुन्हे नोंदविल्याची बातमी ‘हितवाद’ या स्थानिक इंग्रजी दैनिकात गुरुवारी प्रसिद्ध झाली. तिच्या आधारे न्या. झेड. ए. हक व न्या. अमित बोरकर यांच्या खंडपीठाने हा विषय फौजदारी अर्ज म्हणून नोंदवून घेऊन त्यावर सुनावणी करण्याचे ठररविले. यासाठीचा औपचारिक आदेश देऊन व प्रतिवादींना नोटीस काढून प्रत्यक्ष सुनावणी ४ मे रोजी ठेवण्यात आली. अशा प्रकारे नागपूर खंडपीठाने आता कोरानाच्या संदर्भात दिवाणी व फौजदारी अशी दोन्ही प्रकारची प्रकरणे स्वत:हून हाती घेतली आहेत.

न्यायालयाने म्हटले की, कोरोना (Corona) रुग्णांच्या संख्येत अचानक एवढी वाढ होईल याची औषध उत्पादकांना किंवा सरकारी यंत्रणेला पूर्वकल्पना नसल्याने या इंजेक्शनची तीव्र टंचाई जाणवत आहे. या परिस्थितीचा गैरफायदा घेऊन काही स्वार्थी लोक या इंजेक्शनचा काळा बाजार करत आहेत.

असा प्रकार उघडकीस येताच नागपूर पोलिसांनी तत्परतेने कारवाई केली याचे खंडपीठाने कौतूक केले. पण पुढे असेही म्हटले की, रुग्णांच्या नडलेल्या नातेवाईकांकडून या इंजेक्शनची अव्वाच्या सव्वा किंमत आकारून लुबाडणूक केली जाते तेव्हा असे प्रत्येक प्रकरण पोलिसांकडे दाखल होतेच असे नाही. कारण त्यावेळी लोकांना आपल्या प्रियजनांचा जीव वाचविण्याची अधिक चिंता असते. यासाठी असे दुवर्तन करण्यास कोणी धजावणार नाही, अशी व्यवस्था करणे हा एक उपाय आहे. त्यासाठी समोर येणार्‍या अशा प्रकरणांचे खटले लवकरात लवकर निकाली काढून जरब बसेल अशी शिक्षा द्यावी लागेल. याच दृष्टीने काय केले जाऊ शकते हे पाहण्यासाठी आम्ही हा विषय हाती घेत आहोत, असे खंडपीठाने नमूद केले.

अजित गोगटे

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button