चित्रपटांच्या कमाईच्या आकड्यांचा संबंध सरकारने अर्थव्यवस्थेशी जोडला; केंद्रीय मंत्री ट्रोल

ravi-shankar

मुंबई : देशात आर्थिक मंदी आहे, देश संकटात सापडला आहे. मात्र देशात मंदी असल्याचा विरोधकांचा दावा केंद्रीय मंत्री रवीशंकर प्रसाद फेटाळून लावल्याने ते सोशल मीडियावर चांगलेच ट्रोल झाले आहेत. प्रसाद यांनी आर्थिक मंदीचा दावा फेटाळताना प्रदर्शित झालेल्या चित्रपटांच्या कमाईच्या आकड्यांचा आधार घेतला होता. त्यावरुन सोशल मीडियाने प्रसाद यांची जोरदार खिल्ली उडवली आहे. यावरून प्रसाद यांनाही अर्थशास्त्राचे ज्ञान नसल्याचे बोलले जात आहे.

नुकत्याच प्रदर्शित झालेल्या तीन चित्रपटांनी १२० कोटींची कमाई केली आहे. अर्थव्यवस्थेची स्थिती उत्तम असल्यानेच चित्रपटांनी कोट्यवधींची कमाई केली असल्याचे प्रसाद म्हणाले होते. त्यांच्या या दाव्याचे पडसाद ट्विटरवर लगेचच पाहालया मिळाले. या सरकारने अर्थव्यवस्था बॉक्स ऑफिसवर आणून ठेवलीय, असे ट्विट एका वापरकर्त्याने केले आहे. तर दुसऱ्या एका व्यक्तीने उद्या हे सरकार चित्रपटगृहाबाहेर तिकिटांचा काळा बाजार करण्यालाही रोजगार म्हणेल, असा टोला लगावला आहे.

चित्रपट उत्तम कमाई करत असल्याने अर्थव्यवस्था उत्तम स्थितीत असल्याचा दावा करणाऱ्या प्रसाद यांची सोशल मीडियावर नेटकऱ्यांनी धुलाई केली आहे. प्रसाद यांचाच तर्क वापरायचा झाला तर मग २००८ मध्ये केआरकेच्या देशद्रोही चित्रपटाने १० लाखदेखील कमावले नव्हते. मग ते वर्ष भारतीय अर्थव्यवस्थेसाठी वाईट होते असे म्हणायचे का, असा प्रश्न एकाने विचारला आहे.

काय म्हणाले होते रवीशंकर प्रसाद? ‘मला चित्रपट अतिशय आवडतात. सध्या चित्रपट चांगला व्यवसाय करत आहेत. गत आठवड्यात ३ चित्रपट प्रदर्शित झाले. सिने उद्योगाच्या एका जाणकाराने दिलेल्या आकडेवारीनुसार या चित्रपटांनी त्या दिवशी १२० कोटी रुपयांची कमाई केली. देशातील आर्थिक परिस्थिती उत्तम असल्यानेच चित्रपट इतकी कमाई करत आहेत,’ असे प्रसाद यांनी म्हटले होते. तर नेटकऱ्यानी यावर जोरदार हल्लाबोल केला. तर काहींनी सरकणारे चित्रपटच निर्माण करावेत यामुळे अर्थव्यवस्था सुधारू शकेल, असा टोलाही नेटकऱ्यानी हाणला.