आईला नकोशी झालेली मुलगी ‘दत्तक’ दाम्पत्याच्या हवाली करण्यास नकार

Bombay High Court
  • मुलीची विक्री झाली असल्याचे हायकोर्टाचे मत

मुंबई : जन्मदात्री आई सांभाळ करू इच्छित नाही म्हणून एका स्वयंसेवी संस्थेच्या अनाथालयात ठेवलेली भवरीत ऊर्फ भवनूर कौर नावाची सुमारे सव्वा दोन वर्षांची मुलगी आपण तिच्या आईकडून रीतसर दत्तक घेतली असल्याने ती मुलगी आपल्या ताब्यात द्यावी यासाठी चार बंगला, अंधेरी (प.) येथील श्री गुरुसिंग सभेत राहणाºया एका शीख दाम्पत्याने केलेली याचिका मुंबई उच्च न्यायालयाने (Bombay High Court) फेटाळली आहे.

अंधेरी येथेच राहणारी दुर्गामती धमेंद्र बहादूर साहा ऊर्फ हीरा साहा ही महिला या मुलीची आई आहे. आपल्यावर झालेल्या बलात्कारातून भवरीत जन्माला आल्याचे तिचे म्हणणे आहे. मुंबई उपनगर जिल्हा बाल कल्याण समितीने दिलेल्या आदेशानुसार भवरीत हिला सध्या अनाथ किंवा आई-वडिलांनी सोडून दिलेल्या मुलांना दत्तक देण्याचे काम करणार्‍या ‘वात्सल्य ट्रस्ट’च्या अनाथालयात ठेवण्यात आले आहे.

कृपाल अमरिक सिँग व बलविंदर कौर सभरवाल हे शीख दाम्पत्य भवरीत हिला पंजाबला घेऊन गेले होते. परंतु मुलगी विकत घेतल्याच्या गुन्हा त्यांच्याविरुद्ध नोंदविल्यानंतर पोलीस तिला पंजाबमधून घेऊन आले. कृपाल सिंग व बलविंदर कौर या दाम्पत्याने भवरीक हिचा ताबा आपल्याकडे दिला जावा यासाठी याचिका केली होती. परंतु न्या. संभाजी शिवाजी शिँदे व न्या. मनिष पितळे यांच्या खंडपीठाने ती फेटाळली.

भवरीक हिला तिच्या आईने आम्हाला रीतसर दत्तक दिली आहे, असा या दाम्पत्याचा दावा होता. त्यासाठी त्यांनी नोटरीकडे नोंद केलेला दत्तकविधानाचा दस्तावेजही सादर केला होता. परंतु बालकल्याण समितीपुढे झालेल्या कामाकाजातून खंडपीठाच्या असे निदर्शनास आले की, भवरीक हिला घेऊन जाताना अमरिक सिंग व बलविंदर कौर यांनी आपल्याला ४० हजार रुपये दिले, असे स्वत: भवरीक हिच्या आईनेच समितीपुढे कबूल केले होते. यावरून भवरीक हिला अमरिक सिंग व बलविंदर कौर यांनी ‘दत्तक’ नव्हे तर ‘विकत’ घेतली असावी, असा प्रथमदर्शनी निष्कर्ष खंडपीठाने काढला. शिवाय नोटरीकडे केलेल्या दस्तावेजाने हिंदू दत्तक कायद्यानुसार कायदेशीर दत्तकविधान होत नाही, असेही न्यायालयाने नमूद केले.

भवरीक हिला ‘वात्सल्य ट्रस्ट’च्या ताब्यात देण्याचा बालकल्याण समितीचा आदेश योग्य आहे व तसा आदेश देण्याचा समितीला अधिकार आहे, असेही न्यायालयाने म्हटले. यासाठी बाल न्याय (काळजी आणि संरक्षण) कायद्याच्या २ (१४) (व्ही) या कलमाचा आधार घेतला गेला. या कलमात ‘ काळजी व संरक्षणाची गरज असलेले मूल’ म्हणजे कोण याची व्याख्या केलेली आहे. त्यानुसार ज्याचा सांभाळ करण्यास आई-वडील किंवा पालक असमर्थ अथवा अनुत्सुक आहेत असा मुलाला ‘काळजी व संरक्षणाची गरज असलेले मूल’मानले जाते. भवरीक हिचा सांभाळ करण्यास तिची जन्मदात्री आई उत्सूक नाही हे तिच्या कृती व उक्तीवरूनच स्पष्ट होत असल्याने भवरीक हिला ‘काळजी व संरक्षणा’साठी ‘वात्सल्य ट्रस्ट’कडे सोपविणे योग्य आहे, असे खंडपीठाने म्हटले.

-अजित गोगटे

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER