मान्सूनने संपूर्ण महाराष्ट्र व्यापला, राज्यभरात पावसाची दमदार सुरूवात

Monsoon

मुंबई :- महाराष्ट्रात साधारणपणे १५ जूनपर्यंत मान्सून संपूर्ण महाराष्ट्र दाखल होतो. मात्र यंदा त्याने ५ दिवस अगोदर महाराष्ट्रात (Maharashtra) प्रवेश केला असून, राज्यभरात पावसाला सुरूवात झाली आहे. हवामान विभागाने मुंबई, ठाण्यासह कोकणात ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. तर संपूर्ण महाराष्ट्रात अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. विशेष म्हणजे दरवर्षी उशिराने पोहोचणारा मान्सून विदर्भात दाखल झाला आहे.

नागपूर (Nagpur) जिल्ह्यात बऱ्याच ठिकाणी ११ ते १४ जून या कालावधीत हलक्या ते मध्यम स्वरुपाचा पाऊस व एक किंवा दोन ठिकाणी वादळी वाऱ्यांसह वीज कोसळण्याची शक्यता भारतीय हवामान खात्याने वर्तवली आहे. तसेच १४ जूनला वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर दुसरीकडे मुंबईसह (Mumbai) उपनगरात पावसाने हजेरी लावली आहे. पावसाळ्याच्या ४ महिन्यांत १८ दिवस धोक्याचे असतील, असा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे. या १८ दिवसांत अरबी समुद्राला भरती येईल. त्यामुळे ५ मीटर उंचीच्या लाटा उसळतील. याच कालावधीत मुसळधार पाऊस झाल्यास मुंबईकरांना अडचणींचा सामना करावा लागेल.

सर्वसामान्यपणे १० जूनला मुंबईत पावसाचं आगमन होतं. मात्र यंदा एक दिवस आधीच मान्सून मुंबईत दाखल झाला. बुधवारी सकाळी पावसानं दमदार हजेरी लावली. त्यामुळे मुंबईचा वेग मंदावला. गुरुवारीदेखील मुंबई आणि आसपासच्या भागांमध्ये पाऊस सुरू होता. बऱ्याच भागांमध्ये पावसाची संततधार सुरू होती. मुसळधार पाऊस आणि त्याचवेळी समुद्राला भरती आल्यास मुंबईकरांसमोर दुहेरी संकट निर्माण होतं. त्यामुळेच हवामान विभागानं भरतीबद्दल महत्त्वाची सूचना दिली आहे. पुढचे ३ दिवस महाराष्ट्रासाठी धोक्याचे असून, संपूर्ण महाराष्ट्रात अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. कोकण (Konkan), मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात अतिवृष्टीच्या इशाऱ्यासह मुंबई, ठाण्यासह कोकणात ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर नाशिक, धुळे, नंदुरबारमध्ये यलो अलर्ट घोषित केला गेला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button