
कोल्हापूर : कोल्हापूर येथील उच्च शिक्षण विभागांतर्गत विभागीय सहसंचालक कार्यालयामध्ये सुरू असलेल्या कामकाजाची गंभीर दखल तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत (Uday Samant) यांनी घेतली आहे. या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्व विभागीय सहसंचालक कार्यालयांच्या कामकाजाचा आढावा घेण्याकरिता तीन महिन्यांचा कालबद्ध कार्यक्रम तयार करण्याच्या सूचना विभागाचे सचिव गुप्ता यांना दिल्या आहेत. यानुसार मंत्रालय आपल्या दारी हा उपक्रम राज्यभर राबवणार असल्याचे त्यांनी सांगितले. आमदार प्रकाश आबिटकर यांनी कोल्हापूर येथे घेतलेल्या आढावा बैठकीमुळे विभागातील कामकाजाची सद्य:स्थिती आपल्या निदर्शनास आल्याचे सामंत यांनी स्पष्ट केले.
या आढाव्यामध्ये राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे प्रधान सचिव, संचालक, उपसचिव, संबंधित कक्ष अधिकारी, संचालक कार्यालयातील संबंधित अधिकारी यांना उपस्थित राहण्याच्या सूचना करण्यात आल्या असून २५ जानेवारीपासून कोल्हापुरातून मोहिमेची सुरुवात केली जाईल. यामध्ये जे अधिकारी व कर्मचारी दोषी आढळतील त्यांना जागीच निलंबित करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले. सकाळी १० ते ६ या वेळेत बैठक आयोजित केली जाईल.
यामध्ये पहिल्या सत्रात महाविद्यालयीन व विद्यापीठाचे प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी यांच्या विविध प्रश्न व दुपारच्या सत्रात संस्थांचे प्रतिनिधी यांच्याकरिता वेळ राखीव ठेवून प्रश्न निकाली काढण्यात येणार आहेत. बैठकीचे नियोजन शिवाजी विद्यापीठात करण्यात येणार आहे. यावेळी उपसचिव कहार, उच्च शिक्षण संचालक डॉ. धनराज माने, डॉ. अशोक उबाळे, प्राचार्य अर्जुन आबिटकर, नंदकुमार ढेंगे, डॉ. विजय पवार, डॉ.नीलेंद्र लोखंडे उपस्थित होते.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला