
अकोला : सर्वोपचार रुग्णालयात कोविड रुग्णांना निकृष्ट दर्जाचे जेवण दिले जात असल्याची माहिती राज्याचे जलसंपदा, शालेय शिक्षण, कामगार, महिला व बालकल्याण विभागाचे राज्यमंत्री बच्चू कडू यांना मिळताच काल त्यांनी रुग्णालयाच्या व्यवस्थेची पाहणी केली. मात्र यावेळीही पुन्हा एकदा त्यांचे रौद्ररुप पाहायला मिळाले. बच्चू कडू यांनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला अचानक भेट दिली. त्यावेळी त्यांनी वैद्यकीय महाविद्यालयातील जेवणाची व्यवस्थाही पाहिली. मात्र, सर्वच रुग्णांना निकृष्ट दर्जाचे जेवण दिल्याचा प्रकार समोर आला. यामुळे संतापलेल्या बच्चू कडू (Bacchu Kadu) यांनी सर्वांसमोर तेथे असलेल्या आचाऱ्याच्या कानशिलात लगावली.
धान्याचा होणारा पुरवठा आणि त्याचा वापर कशा पद्धतीने केला जातो, यासंदर्भात सावळागोंधळ सुरू असताना संबंधित कर्मचाऱ्याने मूग आणि तूर डाळ मिळून दररोज २३ किलो लागत असल्याचे सांगितले. दरम्यान, हाच प्रश्न पालकमंत्री कडू यांनी स्वयंपाकीला विचारला असता त्यांनी दोन्ही डाळी मिळून आठ ते दहा किलोंचा उपयोग होत असल्याचे सांगितले. स्वयंपाकीला पुन्हा विचारल्यानंतर सांगितलेल्या आकडेवारीत तफावत आढळून आल्यानंतर पालकमंत्री कडू यांनी स्वयंपाकीच्या कानशिलात लगावली.
मेसमधील सावळागोंधळ उघडकीस आल्यानंतर, येथील नोंदवहीमध्ये महिनाभराच्या धान्याची मागणी करण्यात आल्याचे निदर्शनास आले. मात्र, संबंधित पुरवठादाराकडून केवळ आठ दिवसांचेच धान्य पुरविण्यात येत असल्याची धक्कादायक माहिती उघडकीस आली. या प्रकारानंतर संबंधित पुरवठादारावरही चौकशी बसविण्याची निर्देश त्यांनी दिले.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला