मुलीचे दोन मार्क्स वाढवल्याने मंत्र्यानेही राजीनामा दिला होता : अजित पवार

पुणे :- पूजा चव्हाण (Pooja Chavan) आत्महत्याप्रकरण चांगलेच गाजत असून, शिवसेना (Shiv Sena) नेते आणि वनमंत्री संजय राठोड (Sanjay Rathod) यांच्यावर कारवाई करण्याची मागणी भाजपने उचलून धरली आहे. पूजा चव्हाणच्या आत्महत्येला १२ दिवस होऊनही संजय राठोड यांनी आपली बाजू स्पष्ट केलेली नाही. इतकंच नाही तर संजय राठोड अजूनही नॉटरिचेबल आहेत. त्यामुळे महाविकास आघाडीच्या (Mahavikas Aghadi) मंत्र्यांना संजय राठोड यांच्याबाबत सातत्याने विचारले जात आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनाही त्याबाबत विचारण्यात आलं. अजित पवार यांनी संजय राठोड यांच्या राजीनाम्याच्या प्रश्नावर माजी मंत्र्यांचा दाखला दिला. ते मंत्री म्हणजे माजी दिवगंत मुख्यमंत्री शिवाजीराव निलंगेकर (Shivajirao Nilangekar). शिवाजीराव निलंगेकर हे १९८५-८६ या कालावधीत  मुख्यमंत्री होते. त्यांनी राज्य मंत्रिमंडळात अनेक महत्त्वाच्या खात्यांचा कारभार सांभाळला होता. स्वातंत्र्यपूर्व काळापासून देशाच्या स्वातंत्र्य लढ्यातही त्यांचा सहभाग होता. एमडी परीक्षेत आपल्या मुलीच्या गुणांमध्ये बदल केल्याचे समजल्यानंतर मुंबई उच्च न्यायालयाने त्यांच्याविरोधात कठोर कारवाई केली. त्यामुळे त्यांना मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला होता.

त्यावर अजित पवार म्हणाले, “पोलिसांकडून चौकशी सुरू आहे. चौकशी कशी करावी, काय करावी हे मी सांगू शकत नाही. मी गृहमंत्री नाही, मी उपमुख्यमंत्री आहे. तुम्ही पत्रकार नेहमी याबाबत विचारतात, पण मी नेहमी सांगतो, चौकशी चालू आहे, चौकशीतून सत्य बाहेर येईल.” चौकशी होईपर्यंत बाजूला राहिलं पाहिजे, नैतिक जबाबदारी स्वीकारली पाहिजे, असा प्रश्न अजित पवारांना विचारला असता अजित पवार म्हणाले, तसं मग लालबहादूर शास्त्रींनी रेल्वेचा अपघात झाल्यानंतर राजीनामा दिला होता. पण आता लालबहादूर शास्त्रीजींशी तुलना होऊ शकते का? त्या त्या वेळी त्यांनी घेतलेली भूमिका आपल्याला माहिती आहे. प्रत्येकाचा विचार करण्याची पद्धत वेगळी आहे.

पूर्वीच्या काळात मला माहितीय, मी त्यावेळी राजकारणात नव्हतो, केवळ कोर्टाने ताशेरे ओढले तरी राजीनामा द्यावा लागत होता. घरातल्या मुलीचे दोन मार्क्स  वाढवले तरी राजीनामा द्यावा लागत होता. अशा गोष्टी मागे झालेल्या आहेत. आता काय होतंय, काय घडतंय हे आपण पाहतोय. धनंजय मुंडे (Dhananjay Munde) समोर येऊन बोलले, मात्र संजय राठोड अजून बोलत नाहीत. नॉटरिचेबल आहेत, असे  अजित पवारांना विचारण्यात आले. त्यावर ते म्हणाले, बरोबर आहे, माझी भेट झाल्यावर मी सांगेन, सगळे पत्रकार तुमची अतिशय आत्मीयतेने वाट बघत आहेत, एक प्रेस घ्या.

ही बातमी पण वाचा : पवारांच्या मार्गदर्शनामुळे सरकारला कुठलाही धोका नाही, अजित पवारांचा दावा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER