औरंगाबादेत व्यापाऱ्याला मारहाण करून लुटले

मारहाण करून लुटले

औरंगाबाद : गुटखा पुडी खान्यासाठी पैसे न दिल्याने दुचाकीवरुन घरी जाणाऱ्या एका व्यापाऱ्याला दोघांनी बेदम मारहाण करुन त्याच्या कडील मोबाईल, सोन साखळी व चांदीचे ब्रासलेट असा सुमारे २१ हजार ५०० रुपयांचा ऐवज बळजबरी हिसकावुन नेला. ही घटना २९ नोव्हेंबर रोजी मुकुंदवाडी परिसरातील शिवशाही नगराजवळ घडली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राजकुमार ब्रम्हदेव विश्वकर्मा (वय २१, रा. शिवशाही नगर, मुकुंदवाडी रेल्वे स्थानका जवळ) यांचे स्लाईडींग विडोंचे दुकान आहे. २९ नोव्हेंबर रोजी रात्री ९ वाजता ते नेहमी प्रमाणे दुकान बंद करुन दुचाकीवर घरी जात होते. शिवशाही नगर येथील मोकळ्या मैदानाजवळ विश्वकर्मा यांना फोन आला. त्यामुळे ते गाडी थांबवुन फोनवर बोलत उभे होते. त्याचवेळी, एका दुचाकीवर २० ते २५ वर्षीय दोन तरुण तेथे आले. त्यातील एकाने विश्वकर्मा यांना पुडी खाण्यासाठी १० रुपयांची मागणी केली.

राजकुमार विश्वकर्मा यांनी नकार देताच दोघांनी विश्वकर्मा यांना हातचापटाने व बेल्टने मारहाण करुन त्यांच्या खिशातीाल मोबाईल व चांदीचे ब्रासलेट व गळ्यातील अर्धी सोन्याची चैन असा एकूण २१ हजार ५०० रुपयांचा ऐवज बळजबरी हिसकावुन नेला. याप्रकरणी राजकुमार विश्वकर्मा यांनी दिलेल्या तक्रारीवरून मारहाण करीत लुटणाऱ्या दोघांविरूध्द मुकूंदवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सहाय्यक फौजदार कौतिक गोरे करत आहेत.