वैद्यक क्षेत्रानं अपप्रवृत्तीचा उपचार करून रोगमुक्त व्हावं

Shailendra Paranjapeराष्ट्रीय डॉक्टर दिनाच्या शुभेच्छा पंतप्रधानांपासून मुख्यमंत्र्यांपर्यंत सर्वांनीच दिल्या. कोरोनाच्या युद्धातील आघाडीवर लढणारे शिलेदार म्हणून देशभरातल्या डॉक्टरांचे आभार मानताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी डॉक्टर म्हणजे देवाचे रूप असतात, असं म्हटलं आहे. कोरोना लढाईत सगळ्यात पुढे असलेल्या राज्यातील डॉक्टरांचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रीय डॉक्टर दिनाचे औचित्य साधून आभार मानले. डॉक्टरांच्या सेवा आणि समर्पणाला या दोघांनीही सलाम केला आहे.

भारतरत्न डॉ. बी. सी. रॉय यांच्या जन्मदिनानिमित्त राष्ट्रीय डॉक्टर दिन साजरा केला जातो. राष्ट्रीय डॉक्टर दिनाच्या शुभेच्छा देण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी रुग्णसेवेसाठी झटणाऱ्या डॉक्टर्सना उद्देशून पत्राद्वारे संदेश दिला आहे. कोविड युद्धातील अशा डॉक्टर्सना मुख्यमंत्री महोदयांचे हे पत्र ई-मेल तसेच विविध माध्यमातून पाठविण्यात आले आहे.

पत्रात मुख्यमंत्री म्हणतात,  डॉक्टर्स दिन आपण दरवर्षी साजरा करतो; पण यंदाची ही परिस्थिती अभूतपूर्व कसोटीची आहे. कोरोनाच्या विरोधातल्या या युद्धाच्या आघाडीवर तुम्ही बिनीचे शिलेदार आहात आणि रुग्णसेवेतून कोरोना विरोधात लढत आहात. सेवा बजावत असताना आपले कुटुंबीय, प्रियजनांपासून कित्येक दिवस दूर राहात असताना इतरांच्या कुटुंबातील प्रियजन कोरोनाने हिरावले जाऊ नयेत म्हणून अहोरात्र मेहनत करत आहात. तुमचे हे योगदान येणाऱ्या पिढ्या विसरणार नाहीत. तुमच्या सेवेतून आपण कोरोना विषाणूला हरवल्याशिवाय राहणार नाही,  असा विश्वास आहे. तुमच्या या समर्पणामागे तुमच्या कुटुंबाचाही मोठा त्याग आहे. त्यासाठी महाराष्ट्र कृतज्ञच राहील, असेही मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे.

डॉक्टर्स डे साजरा करतानाच कोरोनाच्या काळात प्रकर्षानं जाणवतीय ती आरोग्य क्षेत्रात विशेषतः वैद्यकीय सेवेच्या संदर्भात शहरी भागात अनुभवास येणारी विदारकता. मुंबई-पुण्यासारख्या शहरात रुग्णालयांची येणारी बिलं रोगमुक्त होऊन घरी जाणाऱ्या रुग्णांचे डोळे पांढरे करणारीच असतात. अर्थात, मुंबई आणि पुणे अशी वेगवेगळ्या शहरांतल्या रुग्णसेवा बिलांची तुलनाच करता येणार नाही, अशी स्थिती आहे. ज्या कारणासाठी अलोपॅथीवाले आयुर्वेदाला डिसकार्ड करतात ते म्हणजे आयुर्वेदात प्रमाणीकरण नाही. त्याचं साधं कारण म्हणजे आयुर्वेद व्यक्तीनिहाय त्या त्या रुग्णाच्या  मुख्यत्वे वात-कफ-पित्त दोषांनुसार वेगळा विचार करून औषध उपचार करतो. त्यामुळंच मेडिकलच्या दुकानात जाऊन डोकं दुखायची गोळी द्या म्हणून गोळी आणायची आणि तथाकथित बरं व्हायचं, असं आयुर्वेदात होत नाही. पण प्रमाणित वैद्यक व्यवसाय करणाऱ्या मोठमोठ्या रुग्णालयांमधेही बिलं येताना मात्र प्रमाणीकरण नसतं. म्हणजे हृदय शस्त्रक्रिया किंवा कर्करोग शस्त्रक्रिया या किंवा अशा कोणत्याही उपचारांमध्ये शहरातल्या  कोणत्याही दोन मोठ्या रुग्णालयांमध्ये सारख्याच पातळीची बिलं येतील, अशी सुतराम शक्यता नाही.

डॉक्टर्स डे साजरा करतानाच या क्षेत्रातल्या अपप्रवृत्तींबद्दल काही उपाय या क्षेत्रातल्या धुरिणांनीच करायला हवेत. रुग्णाकडे आजारापेक्षा त्याचा खिसा बघून उपचार ठरवण्याची वृत्ती, विमा असल्यास विम्याच्या अपर लिमिटपर्यंत बिल येईपर्यंत सुरू ठेवली जाणारी औषधं अचानक बंद होतात; कारण विमारक्कम मर्यादा संपत आलेली असते, असले प्रकार, हार्ट सर्जरीजसाठी असलेली टार्गेट्स, त्यासाठी ग्रामीण भागातल्या छोट्या डॉक्टरांना दिल्या जाणाऱ्या परदेश सहलीच्या प्रलोभनांसारखे प्रकार, त्यातून वैद्यक व्यवसायाला आलेलं नफेखोरीचं, धंद्याचं स्वरूप या साऱ्या बाबींचा विचारही व्हायला हवा.

रुग्णाचा आजार अचूक निदानातून योग्य उपचारानं बरा करून त्याला स्वस्थ करणाऱ्या वैद्यक क्षेत्रानं स्वतःला झालेल्या नफेखोरीच्या, कमर्शियलनेसच्या आजाराचं अचूक निदान करावं आणि वैद्यक व्यवसायाला रोगमुक्त, अपप्रवृत्ती मुक्त करतानाच समाज खरोखर स्वस्थ होईल, हे पाहावं आणि हे सर्व करण्याचं बळ आमच्या कोरोनाकाळातल्या बिनीच्या लढवय्या डॉक्टरांमध्ये  येवो, हीच विठ्ठलचरणी प्रार्थना.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER