लोकशाहीच्या बळकटीकरणासाठी माध्यमांनी सकारात्मक भूमिका बजावावी – दिलीप शिंदे

मुख्य निवडणूक कार्यालयाची माध्यमांसाठी कार्यशाळा

Dilip Shinde

मुंबई :- लोकशाहीच्या बळकटीकरणासाठी राज्यातील माध्यमांनी नेहमीच सकारात्मक भूमिका बजावली असून त्यांचा लौकिक देशपातळीवर आहे. निकोप लोकशाहीसाठी पारदर्शक पद्धतीने, कोणत्याही बाह्य दबावाशिवाय, स्वत:चे मत बनविण्यास मतदारांना मदत व्हावी यासाठी ‘पेड न्यूज’सारख्या बाबींपासून दूर राहत यावेळीसुद्धा माध्यमे सकारात्मक भूमिका बजावतील, अशी अपेक्षा अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी दिलीप शिंदे यांनी आज व्यक्त केली.

आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वृत्तपत्रे व अन्य प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींसाठी भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार मंत्रालयात ‘पेड न्यूज’ या विषयावर कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. त्यावेळी प्रारंभी श्री. शिंदे यांनी संवाद साधला. यावेळी मुंबई उपनगर जिल्ह्याचे उपजिल्हा निवडणूक अधिकारी अजित साखरे यांनी ‘पेड न्यूज’बाबत सादरीकरण करुन माहिती दिली.

निवडणुकांमध्ये ‘पेड न्यूज’चा नकारात्मक प्रभाव मतदारांवर पडू शकतो, असे सांगून श्री. शिंदे यावेळी म्हणाले की, पैशाच्या किंवा कोणत्याही वस्तुस्वरुपातील प्रलोभनाच्या बदल्यात प्रसिद्ध करण्यात येणाऱ्या बातमीची व्याख्या प्रेस कौन्सिल ऑफ इंडियाने ‘पेड न्यूज’ म्हणून केली आहे. लोकांना आपला उमेदवार ठरविताना ‘पेड न्यूज’बाधा ठरतात. येणाऱ्या निवडणुका नियमानुसार, कायद्यानुसार, स्वच्छ वातावरणात, निर्भयपणे पार पडतील यासाठी ‘पेड न्यूज’ पासून दूर राहत माध्यमांचे सहकार्य मिळेल, अशी अपेक्षाही श्री. शिंदे यांनी व्यक्त केली.

श्री. साखरे यांनी मीडिया सर्टिफिकेशन ॲण्ड मीडिया मॉनिटरींग (एमसीएमसी) समितीबाबत माहिती दिली. तसेच या जिल्हास्तरीय आणि राज्यस्तरीय समितीची रचना आणि कार्य याबाबत माहिती दिली. पेड न्यूजची सर्वसाधारण व्याख्या, पेड न्यूज निश्चित करण्याचे सर्वसाधारण निकष, एकदा बातमी, विश्लेषणात्मक मजकूर पेड न्यूज असल्याचे निश्चित झाल्यास करावयाची कार्यवाही. उमेदवाराच्या निवडणूक खर्चात पेड न्यूजचा खर्च समाविष्ट करणे, समाजमाध्यमांचे संनियंत्रण आदींबाबत माहिती दिली.