
न्यूझीलंड : कोरोनाच्या साथीमुळे जगाची आर्थिक व्यवस्था कोसळली आहे याचे अनेक दाखले मिळत आहेत. असा एक धक्कादायक दाखला नुकताच मिळाला. आर्थिक टंचाईमुळे बेजार झालेली ‘स्टफ’ ही न्यूझीलंडमधील नामांकित मीडिया कंपनी केवळ एक न्यूझीलंड डॉलरला (४६.४१ रुपये) विकली गेली! ही कंपनी कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी सिनेड बाउचर यांनीच विकत घेतली आहे.
‘स्टफ’ ही न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलियामधील आघाडीच्या मीडिया कंपन्यांपैकी होती. या कंपनीचे हक्क ‘नाईन एंटरटेन्मेट’ या कंपनीकडे होते. एका वृत्तपत्राने दिलेल्या वृत्तानुसार ही कंपनी प्रामुख्याने अनेक नामांकित वर्तमानपत्र व नियतकालिकांची छपाई करत असे. शिवाय, ‘स्टफ’ या नावाची त्यांची एक वेबसाईटदेखील आहे. लॉकडाऊनमुळे त्यांचा पैशांचा ओघ आटला होता. त्यांनी ज्या अमेरिकी कंपन्यांमध्ये पैसे गुंतवले होते त्याही सर्व कंपन्या डबघाईला आल्या आहेत. स्टफला कोट्यवधींचे नुकसान झाले.
आर्थिकदृष्ट्या रसातळाला गेलेली ही कंपनी कुठलाही व्यावसायिक खरेदी करण्यास तयार नव्हता. अखेर कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी सिनेड बाउचर यांनी ही कंपनी विकत घेतली. स्टफ कंपनीत सध्या ४०० पत्रकार आणि ८०० इतर कर्मचारी आहेत. ‘नाईन एंटरटेन्मेट’ या कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी ह्यूग मार्क्स यांनी एका मुलाखतीत या व्यवहाराबाबत सांगितले. ते म्हणाले, “कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव होण्याआधीच ‘स्टफ’ने आर्थिक दिवाळखोरी जाहीर केली होती. कोरोना विषाणूमुळे त्यांची उरलेली आशाही संपली. सिनेड बाउचर एक हुशार व्यक्ती आहेत. त्यांनी विचार करूनच स्टफ खरेदी केली असणार. मला आशा आहे की, ते या कंपनीचे सुवर्णयुग पुन्हा एकदा परत आणतील.”
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला