खासगी बँकांच्या ‘एमडी’ पदासाठी आता १५ वर्षांची कमाल मर्यादा

RBI - Maharashtra Today
RBI - Maharashtra Today
  • रिझर्व्ह बँकेने लागू केली नवी नियमावली

मुंबई :- सर्व खासगी बँकांमधील व्यवस्थापकीय संचालक (Managing Director-MD) आणि मुख्य कार्यकारी अधिकारी (Chief Executive Officer-CEO) तसेच पूर्णवेळ संचालक (Whole Time Director-WTD) या पदांवर यापुढे कोणीही एकच व्यक्ती १५ वर्षांहून अधिका काळ राहू शकणार नाही, असा नवा नियम रिझर्व्ह बँकेने लागू केला आहे.

देशतील बँकांच्या व्यवस्थापनासाठी रिझर्व्ह बँकेने जारी केलेल्या नव्या नियमावलीत हे बंधन घालण्यात आले आहे. छोट्या वित्तीय बँक (Small Finance Banks) आणि विदेशी बँकांच्या भारतात कार्यरत असलेल्या सहयोगी बँकांनाही हा नियम लागू होईल. भारतीय स्टेट बँक (SBI) आणि अन्य राष्ट्रीयीकृत बँकांच्या स्थापना कायद्यांत याहून काही निराळी तरतूद नसेल तर या पदांसाठीची कमाल कालमर्यादा त्यांनाही लागू होईल, असे नियमावलीत स्पष्ट करण्यात आले आहे. मात्र विदेशी बँकांच्या भारतातील शाखांना हा नियम लागू असणार नाही.

रिझर्व्ह बँकेने यासंबंधी प्रसिद्ध केलेली अधिसूचना म्हणते की, बँकांमधील व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी तसेच पूर्णवेळ संचालक या पदावर एकच व्यक्ती सलग १५ वर्षांहून अधिक काळ राहू शकणार नाही. कोणाही व्यक्तीचा या पदांवरील १५ वर्षांचा कालावधी पूर्ण झाल्यावर तिला पुढील तीन वर्षे त्याच बँकेत कोणत्याही पदावर राहता येणार नाही. हा तीन वर्षांचा फारकतीचा काळ पूर्ण झाल्यावर बँकेला गरजेचे वाटले व संबंधित व्यक्ती त्यावेळी लागू असलेल्या पात्रता निकषांमध्ये बसत असेल तर तिला पुन्हा वरीलपैकी कोणत्यही पदावर नेमता येऊ शकेल.

तसेच बँकेत ‘एमडी’, ‘सीईओ’ किंवा ‘डब्ल्यूटीडी’ यापैकी कोणत्याही पदावर असलेली व्यक्ती त्या बँकेची प्रवर्तक अथवा  मोठी भागधारक असेल तर अशा व्यक्तीला यापैकी कोणत्याही पदावर सलग १२ वर्षांपेक्षा जास्त काळ राहता येणार नाही, असे बंधनही घालण्यात आले आहे. परंतु असाधारण परिस्थितीत अशा व्यक्तीला यापैकी कोणत्याही पदावर १५ वर्षांपर्यंत राहण्याची परवानगी अपवाद म्हणून दिली जाऊ शकेल.

याच बरोबर रिझर्व्ह बँकेने बँकांमधील ‘एमडी’, ‘सीआओ’ व ‘डब्ल्यूडीडी’ या पदांवरील व्यक्तींसाठी ७० वर्षांची कमाल वयोमर्यादाही लागू केली आहे. ही कमाल वयोमर्यादा लक्षात घेऊन बँका या पदांवरील त्यांच्या अधिकाऱ्यांचे निवृत्तीचे वय ठरवू शकतील.

या नियमावलीने बँकांमधील अकार्यकारी संचालक (Non Executive Director) आणि संचालक मंडळाचे अध्यक्ष या पदांसाठी ७५ वर्षांची कमाल वयोमर्यादा ठरविण्यात आली आहे. वयाची ७५ वर्षे पूर्ण झाल्यावर कोणीही व्यक्ती कोणत्याही परिस्थितीत या पदांवर राहू शकणार नाही. शिवाय कोणीही व्यक्ती कोणत्याही बँकेत सलग अथवा अनेक टप्प्यांमध्ये मिळून आठ वर्षांपेक्षा जास्त काळ अकार्यकारी संचालक पदावर राहू शकणार नाही. तीन वर्षांचा फारकतीचा काळ गेल्यानंतर त्या व्यक्तीला पुन्हा या पदावर नेमले जाऊ शकले. तसेच तीन वर्षांच्या फारकतीच्या काळात संबंधित व्यक्ती अन्य एखाद्या बँकेच्या संचालक पदावर राहू शकेल.

ही बातमी पण वाचा : पुस्तक विक्रीच्या व्यवसायाचाही अत्यावश्यक सेवांमध्ये समावेश करा

अजित गोगटे

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button