जमता जमेना हे वेळेचे गणित (भाग 2)

morning

हाय फ्रेंड्स ! आज मकर संक्रांत .”सगळ्यांना या शुभ दिनाच्या खूप खूप शुभेच्छा !” शीत काळाची पूर्णतः होऊन ऊर्जेने भरलेल्या या पर्वाचा प्रारंभ होणारा हा दिवस . तिळातिळाने मोठा होत जाणारा. त्याबरोबरच कर्मप्रधानतेचा काळ वाढविणारा हा मंगल दिन.

तशीच नुकतीच दोन दिवसांपूर्वी विवेकानंद जयंती,” युवा दिन” म्हणून साजरी करण्यात आली .हजारो वर्षांचा अंध:कार घालवण्यासाठी अविरत तळपणार्या एका मुलाची आवश्यकता होती म्हणून की काय संक्रांतिला नवे परिमाण देणारा हा सूर्य संक्रांतीच्या दोन दिवसापूर्वीअवतरला होता. त्यांनी आपल्या आयुष्यात सगळ्या युवकांना , शिक्षणाला आणि इतर अनेक गोष्टींना नवे आयाम दिले . कार्य करणार्‍याच्या मार्गात काही संकटे येतातच .कर्त्याची उमेद कमी करण्यासाठी ती संकटे येत नाहीत, तर कर्मनिष्ठेचे बळ वाढवणे हाच या मागचा परमेश्वर हेतू असतो. असे विवेकानंद म्हणतात.

पण आजच्या आपल्या युवकांचा वेळ कसा जातो ? किंवा आपण प्रत्येकजण कसा वेळ घालवतो ? असं बघितलं तर आला वेळ…… गेला वेळ ! असं फक्त घड्याळ सांगत राहत आणि आपण हळूहळू त्या बरोबर फक्त चालतो . माहितीही नसतं कशासाठी ? आणि कुठपर्यंत ? मग विवेकानंद म्हणतात ते कर्म प्रधानता वगैरे तर फारच दूर !

आपण कालच्या लेखात वेळेचे नियोजन चूकण्या मागचे एक कारण हे ध्येयाचा अभाव, उद्दिष्टांचा अभाव असं म्हटलं होतं. आणि ते खरंच आहे .बरेच जण कागद-पेन घेऊन बसतात. पण दोन दिवसही ते जमते तर जमते, नाही तर परत पहिले पाढे पंचावन्न . आपल्या ध्येय ठरवत असताना दोन प्रकारची ध्येय आखावी लागतात. दीर्घकालीन आणि अल्पकालीन. उदाहरणार्थ यामध्ये प्रत्येक जण वेगवेगळ्या पद्धतीने आपले ध्येय ठरवू शकतो. म्हणजे काहीतरी आगळेवेगळे आणि फार मोठे, जगावेगळे असण्याची गरज नसते. तर तुमच्या माझ्या आयुष्यामध्ये ज्या काही गोष्टी मला हव्या असतात त्याच. म्हणजे ही धेय्य ! वजन कमी करायचे आहे किंवा स्टॅमिना कायम ठेवायचा आहे कारण मला ट्रेक ला जायचे आहे किंवा पुढच्या वर्षी पंढरपूरची वारी करायची आहे, नर्मदा परिक्रमा करायची आहे .एखाद्या पुस्तक लिहून प्रकाशित करायचं आहे किंवा कुणाला दिवाळीच्या वेळी प्रदर्शन भरतात त्यासाठी काही वस्तू शोभेच्या बनवायच्या आहेत. किंवा या वर्षभरात एक चांगलं रेसिपीसाठी यूट्यूब चैनल सुरू करायच आहे किंवा कुणाला आणखीन एखादी भाषा या वर्षभरात शिकायचे असते. कम्प्युटरची प्रोग्रामिंग किंवा कंप्यूटर लैंग्वेज शिकायची एवढेच काय तर या वर्षात दहा तरी अगदी जवळची माणसे मी जोडून ठेवीन अशी आपल्या आपल्या प्राथमिकते नुसार किंवा आतून जे वाटतं त्याचा वापर करून ही ध्येय निवडायला हवीत. ( ह्या निवडीसाठी मागील लेख,इकिगाई शोधतांना आणि त्याचे भाग ) याचाही वापर करता येईल.

ही सगळी वर्षभरासाठी गोल्स होती .अशीच पुढील पाच वर्षे ,दहा वर्षे यासाठी ही करू शकतात. त्याच प्रमाणे आर्थिक गोल्स,अध्यात्मिक गोल्स,वैयक्तिक गोल्स अशी वेगवेगळी गोल्स येतील. परंतु आता एकदा एक ध्येय ठरले की, मला ते पूर्ण करण्यासाठी प्रत्येक आठवड्यात काय करावे लागेल ? त्यानंतर त्यासाठी प्रत्येक दिवशी मला काय करावे लागेल ? मग त्यासाठी दररोज किती वेळ द्यावा लागेल ? जसे आपण वेगवेगळे ध्येय आखून जी वेळेची आखणी केली आहे .त्यामुळे मग आपले दिवसातले कदाचित दोन ते तीन तास त्यात जाणार असतील. तर मग उरलेल्या वेळेचा वापर मी कसा करणार ? यासाठी आपण दिवसभरात काय काय करतो याची बारकाईने मनात नोंद करू. त्यात बरीच कामं नियमित करावी लागणारी असतील. दररोजचे घर काम किंवा ऑफिस काम . पण त्या व्यतिरिक्त दररोज काहीतरी नवीनच घडत असत. सणसमारंभ ,आजारपण, पाहुणेरावळे लग्नकार्य, दर महिन्याला करावी लागणारी कामे ,दुरुस्त्या इत्यादी .त्यासाठी साधारण किती वेळ देणार ?

आणि मग आपली स्वतःची दैनंदिन कामे आटपली तर त्यात खरोखर किती वेळ जातो ?हा लेखाजोखा काढल्यानंतर लक्षात येतं की माझा फाजील वेळ जाण्यास कुठल्या कुठल्या गोष्टींचा अडथळा येतो?

# काल बघितल्याप्रमाणे मी जिथे असतो तिथे नसतो किंवा नसते. असे अनुभव बहुतेक सगळ्यांना येतात .आपण काही कामासाठी फ्रीज उघडतो आणि नेमके कशासाठी उघडले ते आठवतच नाही. काही कामासाठी मोबाईल हातात घेतो आणि मेसेजेस दिसतात ते बघतांना काम बाजूला पडते. कित्येकदा तर मोबाईल हातात घेऊन कपाटाचा लॉक उघडून पैसे काढतो, ते करताना कपाटात मोबाईल कुठेतरी टेकवतो. परत लॉक लावतो .मग अचानक मोबाईल दिसत नाही याची आठवण येते. खूप शोधाशोध होऊनही दिसत नाही .काय सापडणार ? कप्पाळ ! तो तर चक्क कपाटात पहुडला असतो. आणि “कुठून कुठून येई साद ऐकावयाला” याप्रमाणे रिंगटोन बारीक ऐकू येत रहातो.

परवाच एक लेख वाचला डिमेन्शियावरचा. त्यात उल्लेख आहे की आजकाल फार लहान वयात ही विस्मरण होत आहे . विशेषता: या कोरोना काळात एकटेपण वाढले , संवाद हरवला .त्याचा परिणाम स्मरणशक्तीवर होतो असं सांगितल्या जाते .परंतु वेळेचे एकदा नियोजन केलं आणि आपण योग्य तो वेळ योग्य गोष्टींसाठी देणार आहे असे ठरवले. तर बराच फोकस त्या कामावर होऊ शकतो. आजकाल बर्‍याच जणी स्वयंपाक घरातील महत्त्वाची कामं म्हणजे संक्रांतीचा तिळगुळ बनवणे असो की गोकुळाष्टमीचा सुंठवडा किंवा दिवाळीचा फराळ नाहीतर नेहमीसाठी डब्यात भरून ठेवायचं खाऊ .तो निवांत संध्याकाळनंतर करतात, कारण तेव्हा डोक्याला थोडी शांतता असते. असा प्रत्येकाचा वेळ ठरलेला असतो की ज्या वेळेला एखादं काम जास्त चांगल्या पद्धतीने त्या व्यक्ती करू शकतात.

खरे तर आज वेळेचे नियोजन अवघड झाले आहे कारण मनाला अनेक दिशांना ओढणाऱ्या गोष्टी अनेक झाल्या आहेत .त्याचप्रमाणे सगळ्यांच्या झोपण्याच्या आणि उठण्याच्या वेळा पार बदल्या. त्यामुळे सकाळचे दोन तास सहज वाया जायला लागले, रात्री सगळेजण एकत्र घरी असतात त्यामुळे बारा वाजेपर्यंत जागे असले तरी आपापले काम घेऊन क्वचित बसणे क्वचित होऊ शकते.

# मोबाईल आणि लॅपटॉप सतत यावर येणाऱ्या पोस्ट माहितीचा गदारोळ घेऊन येतात. तसेच फेसबुक मध्ये तर अक्षरशः खोल दरीत जायला होतं की आपण आपला स्वतःचा face, चेहऱ्याच विसरतो.. ! चांगल्या ही असल्या तरी एका वेळेला अनेक गोष्टी दिसत जातात आणि “मनकल्लोळ” माजतो. काही कामांसाठी हातात घेतलेल्या फेसबुक मध्ये आपलं नियोजित काम तोपर्यंत विरघळून गेलेल असत आणि घड्याळ एक तास पुढे गेलेलं असतं.

जुने लोक एका विशिष्ट पद्धतीने काम करायचे ते तसेच आपल्याला करता येणार नाही. कारण आपल्या कामाची प्रायोरिटी बदललेली आहे. पण त्यानुसार आपल्याच कामात जर एक नियमितता आणि शिस्त असेल तर ती कामं साठत जात नाही आणि एकदम अंगावरही येत नाही .ज्याचे आपल्याला दडपण येईल. आणि रूटीन असल्याने ती कामे मेथोडिकली होत जातात. त्यात फार डोक्याचा वापर करावा लागत नाही,अंगवळणी पडत जातात.

# आपल्या ठिकाणी जर वस्तू जागेवर ठेवण्याची सवय असेल तर ती खूप सोयीचे असते. नाहीतर ऐनवेळी वस्तू न सापडणे आणि कागदपत्र जागेवर नसणे यामुळे आपले मनस्वास्थ्य हरवून खूप वेळ वाया जातो.

# काही गोष्टी आपल्याला करण्याची खूप इच्छा असते. अनेक गोष्टी करायला आवडत असतात. अशा वेळी आपली स्वतःची स्वतः कडून खूप अपेक्षा असते आणि मग वेळ पुरत नाही. त्याचप्रमाणे बऱ्याच गोष्टी इतरांना छान वाटेल म्हणूनही आपण करत असतो दुसऱ्याला खुश करण्याचा प्रयत्न मध्ये म्हणून आपण करत असतो (समोरचा खूष होतो की नाही हा पुढचा विचार)आणि तेव्हाही वेळ पुरत नाही. बरेचदा एखादी गोष्ट आपल्या प्रायोरिटी मध्ये नसेल, पण तरी बरे दिसणार नाही म्हणून किंवा नाही म्हणता न आल्यामुळे आणि समाजासाठी आपण बऱ्याच गोष्टी करत असतो. अशा वेळीसुद्धा वेळेचे गणित बिघडते.

आपण प्रत्येक व्यक्तीला खूश करू शकणार नाही हे एक वास्तव आहे. त्याचप्रमाणे “नाही ” म्हणण्याची कलाही शिकून घेणे खूप गरजेचे आहे. म्हणजे दुसऱ्याला न दुखवता चांगल्या शब्दांमध्ये आपल्याला न जमणारी किंवा पटणारी ,एखादी गोष्ट नाकारणे.

या अमर्याद अपेक्षा वेळेचे नियोजन चूकवतात ,confusion निर्माण करतात, आणि त्यामुळे जिथे आहे तिथे आपण राहू शकत नाही. प्रत्येकाची कुठल्याही बाबतीत एक मर्यादा असते, आपल्या ही मर्यादा आपण म्हणूनच मान्य केल्या ,तरच जे काही करू शकतो आहे, करतोय त्यातला आनंद घेता येईल आणि तोच महत्त्वाचा !

मानसी गिरीश फडके.
समुपदेशक व सायकोथेरपिस्ट.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER