आस्ताद नगरसेवकांवर बरसला

Marathi Tadka - Maharashtra Today

आपण प्रेक्षक म्हणून कलाकारांचा अभिनय नेहमीच पाहत असतो, पण हे कलाकार अनेकदा समाजातील चुकीच्या गोष्टींवर जेव्हा भाष्य करत असतात तेव्हा ते आपल्यातीलच एक असतात याची जाणीव असतात. आजकाल सोशल मीडियाचा वापर हा केवळ टाइमपास किंवा मनोरंजन म्हणून केला जात नाही याची उदाहरणे आपण ऐकली असतील. समाजात सुरू असलेल्या विघातक गोष्टींकडे लक्ष वेधण्यासाठी सध्या सोशलमिडिया हे माध्यम चांगलच प्रभावी ठरत आहे.

कलाकारांच्या थकित मानधनाचा प्रश्न असो किंवा कास्टिंगकाउचसारख्या घटना असोत, कलाकारांना व्यक्त होण्यासाठी हे माध्यमच साद घालत असते. समाजाचा घटक म्हणूनही कलाकार त्यांच्या सोशलमीडिया पेजवरून टीकास्त्र सोडत असतात. सध्या याच माध्यमात चर्चेत आला आहे तो अभिनेता आस्ताद काळे. आस्तादने थेट नगरसेवकांच्या भ्रष्ट कारभारावरच ताशेरे ओढले आहेत. चला प्रश्न विचारूया ही मोहीम त्याने ऑनलाइन सुरू केली असून याच व्यासपीठावरून आस्तादने नगरसेवकांचा पगार आणि त्यांची जीवनशैली यांचा समाचार घेतला आहे.

एखाद्या गोष्टीवर राग येणाऱ्यांपैकीच आस्ताद आहे. आस्ताद कोणत्याही गोष्टीवर लगेच व्यक्त होतो. त्याच्या आजवरच्या भूमिका पाहिल्या तर अनेकदा व्यक्तीगत जीवनात आस्तादचा हा स्वभाव त्याच्या पडद्यावरच्या भूमिकांच्या जवळ जाणारा आहे. त्याच्या याच स्वभावानुसार तो नगरसेवकांवर बरसला आहे. आस्तादने चला प्रश्न विचारूया या मोहिमेतून नगरसेवकांना प्रश्न केले आहेत. यामध्ये आस्ताद म्हणतो की, महानगरातील नगरसेवकांना स्थानिक स्वराज्य संस्थेकडून २५ हजार पगार दिला जातो. क्वचितच असे नगरसेवक असतात की त्यांचा वेगळा बिझनेस आहे किंवा अर्थार्जनाचा अन्य स्रोत आहे. पण बहुतांशी नगरसेवकांना या नगरसेवकपदातून मिळणाऱ्या कमाईचाच आधार असतो. मग तरीही त्यांच्याकडे लाखोंच्या गाड्या असतात. त्या गाडीचा महिन्याचा हप्ताच ३० हजाराचा असतो. मग २५ हजार रूपयांच्या नगरसेवकपदाच्या पगारात ३० हजाराचा हप्ता कसा परवडतो ? परवडतो कारण विकासकामाच्या नावाखाली नगरसेवक भ्रष्टाचार करतात म्हणूनच पगारापेक्षा जास्त पैसे त्यांच्या खिशात येत असतात.

आस्तादने केलेली ही पोस्ट सध्या खूपच गाजत आहे. चला प्रश्न विचारूया या टॅगलाइनखाली आस्ताद अजूनही काही प्रश्न विचारणार आहे. त्याची सुरूवात त्याने नगरसेवकांच्या पगाराचा मुद्दा उपस्थित करून केली आहे. त्यामुळे आता आस्ताद त्याच्या सोशलमीडिया पेजवरून पुढचा प्रश्न काय आणि कोणाला विचारणार, त्याचे उत्तर काय असणार याकडे त्याच्या चाहत्यांचे लक्ष लागले आहे. पण आस्तादच्या या पोस्टला त्याच्या चाहत्यांनी केवळ लाइकचे बटन दाबून प्रतिसाद दिलाय असे नाही तर याबाबतचा अनुभवही शेअर केला आहे. आस्तादने या पोस्टच्या निमित्ताने एका महत्त्वाच्या विषयावरची खपली काढल्याने त्याचे कौतुक होत आहे. कलाकार मंडळी ही केवळ त्यांच्याच विश्वात रमलेली असतात, त्यांना समाजातील गोष्टींचं काहीच वाटत नसतं हा गैरसमजही आस्तादच्या या टॅगलाइनने अधोरेखित केला आहे.

आस्तादने नुकतीच चंद्र आहे साक्षीला ही मालिका केली असून सध्या तो घरीच आहे. सरस्वती या मालिकेतील आस्तादची भूमिका गाजली होती. पुढचं पाऊल या मालिकेतील सहकलाकार स्वप्नाली पाटील हिच्यासोबत १४ फेब्रुवारीला आस्तादने लग्नगाठ बांधली असून गाजावाजा व मोठा खर्च न करता नोंदणी पद्धतीने त्याने हा विवाह केला. आस्तादची पहिली प्रेयसी कॅन्सरने काळाच्या पडद्याआड गेली तेव्हा आस्ताद नैराश्येत गेला होता. पण पुन्हा एकदा तो जीवनात उभा राहिला. अभिनयासोबत आस्तादला गायनाची आवड असून त्याने शास्त्रीय गायनाचे धडेही घेतले आहेत. रोखठोक स्वभावाच्या आस्तादने, मध्यंतरी जेव्हा त्याच्याकडे काहीच काम नव्हतं तेव्हा, मला काम हवंय, कुणी काम देईल का अशी पोस्ट सोशलमीडियावर केली होती. जे वाटतं ते धडधडीतपणे बोला असं तो केवळ सांगतच नाही तर कृतीतही आणतो. आणि सध्या त्याने नगरसेवकांवर जे काही भाष्य केलं आहे त्यातून त्याचा हा रोखठोकपणा त्याच्या चाहत्यांना जास्तच भावला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button