पांगळ्यांचा बाजार !

Mother

अनघा ही बहिणीच्या बाळाच्या बारशासाठी मुंबईला पोहचली. तसा नवीनच संसार! त्यामुळे काही वस्तू कमी पडत होत्या. तिने नोटपॅड कागद-पेन असं काहीतरी शोधलं, तर ते सापडेना .चार-पाच दिवसांचे बाळ घेऊन बहीण घरी येणार होती, म्हणून बाळाचे सामान ठेवायला तिच्या खोलीत थोडे आवरून नवीन पेपर घालून ठेवावे असं वाटलं, म्हणून तिने न्यूज पेपर शोधले; पण घरात ते पण नव्हते. कारण ते दोघेही नोकरी करणारे . त्यांची सगळी कामं लॅपटॉप, मोबाईलवर चालत असतात. त्यामुळे या नोंदी सगळ्या त्यावरच. न्यूजमधले सगळे कळते ते यावरच. त्यामुळे न्यूज पेपरचं कामच नाही. बाकी वाचायचं झालं तर ई- बुक्स ! पिक्चर्स, सिरीयल बघायचे तर नेटफ्लिक्सवर.

म्हणजे इथे एकूण सगळा ई-माहोल आहे तर. अनघा मनात म्हणाली !आज कुठेही मोठ्या शहरातून हीच परिस्थिती आहे. मध्यंतरी रस्त्यावर झाडू मारणाऱ्या मावशीकडून खराटा खरेदी केला .त्या स्वतः बनवतात आणि विकतात . छान निघतात खूप ते ! सकाळी झाडत असताना त्यांना सांगितलं आणून द्यायला .दुपारी बारा-साडेबाराला टू-व्हीलरवर आल्या आणि दोन खराटे देऊन गेल्या. खूप कौतुक वाटलं. आता आपण कोणीच दोन पायांच्या गाडीवर फिरतच नाही. अगदी जवळ जायचं असो ,नाही तर लांब ! परवा आमच्या अलका मावशी कुरकुरत होत्या. मॅडम खाली वाकून फरशी पुसताना कंबर दुखते. त्यामुळे उभ्याने फरशी पुसायचा मोप आणा.

मी अलका मावशींना सांगितले, “मावशी मला माझा नवरा म्हणतो, फरशी उभं राहून पुसायचा मोप आणायचा ,तर तुला मावशी कशाला हव्यात? तूच पुसत जा.” धुणे धुताना आज-काल मशीनमधून वाळवून द्यावेत हेच अपेक्षित असते बहुतेक. माझी एक मैत्रीण म्हणाली, काठीने उंचावर टाकताना मान मोडून येते. त्यामुळे मी बाईला वाळत टाकायला सांगते. म्हणजे धुणं मशीनमध्ये आणि वर टाकायला मावशी. सगळ्या उपकरणांनी आम्हाला पार पांगळे बनवून टाकले आहे. लिंबू पिळणीपासून रोटी मेकरपर्यंत, भाजी कापण्यापासून तर कणीक मळण्यापर्यंतची कामे उपकरणांनी होतात. हातांचा उपयोग शून्य ! ऑफिसला जायला वाहन. जिने नाहीतच. लिफ्ट किंवा सरकते जिने! घरीही हॅन्ड मसाजर, फूट मसाजर, कमरेला व्हायब्रेशनने मसाज देणारी उपकरणे उपलब्ध आहेत.

किती व्यायाम केला? किती कॅलरीज खर्च झाल्या? ही मोजणारे यंत्र तर आहेतच. पुन्हा हा लाडू वळण्याचे, मोदक घडवण्याचे साचे. आपलं सगळं आयुष्यच असं साचेबंद झालं आहे. गाणी लिहायची गरज नाही. मोबाईलमध्ये लिरिक्स उपलब्ध. नाही तर कॉलेजमध्ये असताना गाण्याच्या ओळीचे वर्डिंग कळले नाही, तर परत-परत ऐकून पूर्ण करावे लागत असे. आता तर तबला मास्टर ,सतार सगळ्यासाठी इलेक्ट्रॉनिक माध्यम. इस्त्री ,घरघंटी घरोघरी झाल्यात.पण पूर्वी सगळं हाताने करूनही दिवाळी सोपी वाटायची. म्हणजे अनारसा पीठ खलबत्त्यात कुटून, मैद्याच्या चाळणीने चाळून घ्यावे लागे. पिठीसाखर दळावी लागे. पुरण वाटावे लागे.

आता या सगळ्या क्रिया बटणावर चालतात. पूर्वी कंदिलावर नाही तर बल्बवर अभ्यास केला जाई. आणि मग लाईट जाणे ही पर्वणी असे. लाईट गेले की मग अभ्यासातून सुटी आणि गप्पांना वेळ. आणि मग भुताच्या गोष्टी वगैरेंची मज्जा येत होती. आता इन्व्हर्टर असतात .त्यामुळे ते सुख नाही. पण बरीचशी गॅजेट्स इन्व्हर्टरवर चालत नाहीत. विस्मरणाच्या आजाराला वयोवृद्ध काळात बळी पडायचे नसेल तर सतत डोक्याला चालना मिळेल असे काही तरी कोडे, सुडोकू सोडवा असे सांगितले जाते. पण आता सरसकट सगळ्या कॅल्क्युलेशनस मोबाईलवर किंवा कॅल्क्युलेटरवर केली जातात . कुठेही पोचायचं तर पत्ते लक्षात ठेवण्याची भानगडच नाही.

आम्ही गुगल मॅप लावतो. कुठलाही फोन नंबर व आकडे लक्षात ठेवण्याची तसदी घेण्याची गरजच नाही. सगळे फिड असते फोनमध्ये. एवढेच काय आयुष्यातील सुखद क्षण आपण या गॅझेटला पुरवतो. आणि स्वतः मात्र आपल्या मनातले ते हरवून टाकतो. पण गॅझेट्स हे केव्हाही आऊट ऑफ सर्विस एरिया जाऊ शकतात. त्यांची बॅटरी लो असू शकते हे सगळे माहीत असूनही त्यांच्या अधीन होऊन आपण आपलं आयुष्यही आऊट ऑफ रेंज करून टाकतो. पूर्वीच्या काळचा मानव चार पायांवर चालायचा. त्याला शेपटी होती. पाठीचा कणा आडवा होता.

चेहरेपट्टी पूर्ण वेगळी होती. क्रांती काळातील माणसाची रूपे बघितली तर या गोष्टी लक्षात येतात. हळूहळू शेपटीचा वापर नसल्याने शेपटी नाहीशी झाली. पुढच्या पायांचा वापर तो हातांसारखा करू लागला. चेहरेपट्टी नीट झाली आणि पूर्वी विकसित नसलेल्या मेंदूचा विकास होत गेला. त्याचा वापर होत गेल्याने माणसाची बुद्धी वाढत गेली. आजच्या या सगळ्या यंत्रांनी आपल्या सगळ्या अवयवांना अडगळीत टाकले आहे, त्यावर गंज चढतो आहे . म्हणजे अगदी आपली बुद्धी आपले सामर्थ्य आहे त्यावरसुद्धा. अशी आपली सदैव पांगळेपणाशी संगत असेल, तर ही प्राणाशीही गाठ आहे हे नक्की ! कारण यामुळे आपल्यामागे बीपी, शुगर, हार्ट ट्रबल, मेंदूचे वयानुरूप होणारे आजार हे लागून, आपली प्राणाशी गाठ होऊ शकते. तुम्हाला काय वाटतं ?

मानसी गिरीश फडके
(समुपदेशक व सायकोथेरपिस्ट)

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER