ज्याचे लिव्हर देशमुखांना द्यायचे होते तो व्यक्ती शस्त्रक्रियेच्या एकदिवस आधीच वारला!

Vilasrao Deshmukh - Maharashtra Today
Vilasrao Deshmukh - Maharashtra Today

महाराष्ट्राच्या राजकारणातल्या मातब्बर नेत्यांपैकी एक नाव ‘विलासराव देशमुख.’ (Vilasrao Deshmukh) महाराष्ट्राचं मुख्यमंत्री पद दोन वेळा सांभाळणाऱ्या विलासरावांची कारकिर्द तशी वादळी. मराठवाड्याच्या जगण्या मरण्याच्या प्रश्नाकडे त्यांनी महाराष्ट्राचं लक्ष वेधलं. ते प्रश्न सुटावेत यासाठी पुर्ण ताकद लावली. त्यांना काही जण राजकारणातला जितेंद्र म्हणतात. हिंदे सिनेसृष्टीतला आघाडीचा अभिनेता जितेंद्र यांच्या सारखी चेहरे पट्टी त्यांची असल्यामुळं त्यांना काही लोकं जितेंद्र म्हणत, तर राजकारणाच्या दलदलीत राहून स्वतःची प्रतिमा शुभ्र ठेवल्यामुळं काही जण त्यांना राजहंस ही म्हणतात.

विलास दगडोजीराव देशमुख २६ मे १९४५साली लातूरात जन्मले. २९ व्या वर्षी बाभूळ गावचं सरपंचपद मिळवणाऱ्या देशमुखांना कार्यकर्त्यांनी आणि जनतेनं साहेब ही पदवी दिली असली तरी त्यांनी शिक्षण क्षेत्रात स्वतः तीन पदव्या मिळवल्या होत्या. विलास रावांनी राजकारणात प्रवेश केला तेव्हा कॉंग्रेस मजबूत होती. कॉंग्रेस हाच एकमेव सक्षम पर्याय जनतेसमोर होता. तेव्हा लातूर जिल्हा अस्तित्त्वात नव्हता. विलासराव उस्मानाबाद बँकेचे संचालक होते. पंचायत समितीचे उपसभापती ते राहिले. जिल्हा परिषदेवर गेले आणि शेवटी १९८० साली त्यांनी पहिल्यांदा विधानसभा गाठली.

एखाद्यानं राजकारणात यश मागावं तर विलासरावांसारखं असं यश त्यांनी मिळवलं. आमदारकी मिळाल्यानंतर त्यांनी दोनच वर्षात मंत्रीपद मिळवलं. यानंतर विलासरावांनी फक्त यशाच्या पायऱ्या चढल्या. मागं वळून पाहिलं नाही. नंतर ते दोन वेळेस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले तर नंतर केंद्रीय अवजड उद्योग मंत्री. महाराष्ट्रातून जरी ते दिल्लीत गेले असले तरी त्यांनी महाराष्ट्रावर कमांड शेवटपर्यंत टिकवून ठेवली होती.

विलासरावांचा राजकीय प्रवास वाटतो तितका सोप्पा नव्हता. त्यांना पराभव ही स्वीकारयला आहे. १९९५ च्या निवडणूकीत शिवाजी कव्हेकर यांनी विलासरावांचा पराभव केला. यामागं नेहमीप्रमाणं शरद पवारांचा अदृश्य हात होता. मुंडे आणि विलासरावांची जवळीक यामुळं मराठवाड्यातलं बदलू पाहणार सत्ता चित्र याचा अंदाज कदाचित पवारांना आला आणि त्यांनी ९५ च्या विधानसभेत विलासरावांचा पराभव केला असा अंदाज बांधताना अनेक विश्लेषक दिसतात. विलासरावांच्या कारकीर्दीला हा सर्वात मोठा हादरा होता. त्यानंतर कॉंग्रेसच्या बाहेर जाऊन शिवसेनेच्या मदतीने विधानपरिषदेवर येण्याचा त्यांचा प्रयत्नही फसला होता. पण पुढे दोनच वर्षात ९५ हजार मतांच्या फरकाने निवडून येऊन ते मुख्यमंत्री झाले होते.

मजबूत जनसंपर्क ही त्यांची खासियत होती. कितीही कामात असले तरी ते कार्यकर्त्यांचे, सामान्य जनतेचे फोन उचलायचे, स्वतः त्यांची समस्या समजून घ्यायचे. विलासराव फक्त राजकारणात नाही तर कला. संगीत, नृत्य आणि सिनेमा या क्षेत्रात विशेष रुची घ्यायचे. त्यांनी राजकारणात अनेकवेळा स्वतःचा मुत्सद्देपणा सिद्ध केला. २००९ मध्ये सत्तेत आल्यावर कर्जमाफी देण्याचं त्यांनी दिलेलं आश्वासन अनेक गोष्टी अधोरेखित करतं. यावरुन त्यांची राजकीय प्रगल्भता लक्षात येते. मांजरा चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून त्यांनी शिक्षण क्षेत्रात चांगलं काम केलं. मराठवाडा मित्र मंडळ स्थापन केलं. मुंबईवर २६/११ ला हल्ला झाल्यानंतर त्यांनी मुख्यमंत्री पदाचा त्याग केला. यानंतर ते दिल्लीत रमले असले तरी त्यांच संपूर्ण लक्ष महाराष्ट्रावर होतं.

पुढं त्यांना लिव्हर ट्रान्सप्लांटसाठी चेन्नईला दाखल करण्यात आलं. ज्याचे लिव्हर देशमुखांना द्यायचे होते तो व्यक्ती शस्त्रक्रियेच्या एकदिवस आधी वारला. यातच त्यांनी १४ ऑगस्ट २०१२ला अखेरचा श्वास घेतला. राजकारणात येऊ इच्छणाऱ्या अनेक युवकांसाठी विलासरावांचा प्रवास आदर्शवत आहे.

सदरील माहिती पुस्तक, वर्तमान, इंटनेटवरील स्त्रोतांमधून संकलीत केलेली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button