औरंगाबादमध्ये मुख्य लढत चव्हाण विरुद्ध बोराळकरच

Satish Chavhan & Shirish Boralkar

विधान परिषदेच्या औरंगाबाद विभाग पदवीधर मतदारसंघाची निवडणूक १ डिसेंबरला होत असून विद्यमान आमदार राष्ट्रवादीचे सतीश चव्हाण (Satish Chavan) विरुद्ध भाजपचे शिरीष बोराळकर (Shirish Boralkar) असा सामना होत आहे. एकूण ३५ उमेदवार रिंगणात असले तरी मुख्य लढत चव्हाण विरुद्ध बोराळकर यांच्यात असेल. गेली १२ वर्षे या मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व करीत असलेले चव्हाण यांची सद्दी संपविण्यासाठी भाजपने निकराचे प्रयत्न चालविले आहेत. मराठवाड्यात आतापर्यंत शिवसेनेने काँग्रेस आणि राष्ट्रवादीला जोरदार टक्कर देत स्वत:चे अस्तित्व निर्माण केले. मात्र यावेळी शिवसेना महाविकास आघाडीच्या धर्मानुसार राष्ट्रवादीसोबत आहे पण शिवसेनेला मानणारा मतदार मनाने चव्हाण यांच्यासोबत राहील का यावरही बरेच काही अवलंबून आहे. गेल्यावेळीही चव्हाण आणि बोराळकर यांच्यातच लढत झाली होती पण बोराळकर यांना अपयशाचा सामना करावा लागला होता.

अनेक वर्षे या मतदारसंघावर जनसंघ आणि भाजपचे वर्चस्व राहिले. जनसंघाचे एक प्रमुख नेते आणि नंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष झालेले उत्तमराव पाटील यांनी १९५३ ते १९७८ म्हणजे तब्बल २६ वर्षे या मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व केले. या शिवाय, कुमुद रांगणेकर, जयसिंगराव गायकवाड (दोनवेळ), श्रीकांत जोशी हेही भाजपचे आमदार राहिले. मात्र, वसंतराव काळे (काँग्रेस) यांच्यानंतर सतीश चव्हाण यांनी भाजपच्या या गडाला धक्के दिले. १९५३ पासून हा मतदारसंघ पुणे-खान्देश-मराठावाडा असा संयुक्त होता.१९७८ मध्ये मराठवाड्याला स्वतंत्र मतदारसंघ मिळाला.

या निवडणुकीत एमआयएम, वंचित बहुजन आघाडीचेही उमेदवार आहेत. या दोघांना मानणाºया मतदारांनी त्यांच्या पारड्यात मते टाकली तर चव्हाण यांना त्याचा फटका बसेल. एमआयएमतर्फे कुणाल खरात, वंचित बहुजन आघाडीचे प्रा.नागोराव पांचाळ, समाजवादी पार्टीचे अब्दुल रऊफ, प्रहार जनशक्ती पक्षाचे सचिन ढवळे, आम आदमी पार्टीचे डॉ.रोहित बोरकर यांच्यासह इतर अपक्षही भाग्य अजमावित आहेत. शिक्षक, पदवीधरांच्या विविध संघटनांकडून अपक्ष लढत असलेल्या उमेदवारांनीही आपल्या परीने आव्हान उभे केले आहे.

सतीश चव्हाण हे मराठवाड्यातील राष्ट्रवादीचे एक प्रमुख नेते आहेत. मराठवाडा शिक्षक प्रसारक मंडळ या मराठवाड्यातील प्रमुख शिक्षण संस्थेचे ते सरचिटणीस आहेत. गेल्या १२ वर्षातील आमदारकीचा फायदा घेत त्यांनी शिक्षक, प्राध्यापकांचे एक जाळे विणले आहे. मराठवाड्यात भाजपची वाढलेली ताकद, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे समर्पित जाळे ही शिरीष बोराळकर यांची जमेची बाजू आहे. भाजपचे सरकार असताना विनाअनुदानित शाळांना मिळालेले २० टक्के अनुदान आणि महाविकास आघाडी सरकारने एकही पैशांचे अनुदान न देणे, वाढलेली बेरोजगारी, शिक्षक, प्राध्यापकांच्या प्रश्नांबाबत सरकारची उदासीनता या मुद्यांवर बोराळकर यांनी प्रचारात लक्ष केंद्रित केले आहे.ते निष्ठावंत भाजप कार्यकर्ते आहेत.

विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी एक दिवस मुक्काम ठोकून प्रचार यंत्रणेशी समन्वय साधला. पक्षाच्या राष्ट्रीय सरचिटणीस पंकजा मुंडे, केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे हेही बोराळकरांसाठी शर्थीने प्रयत्न करीत आहेत. चव्हाण यांच्याकडे साम-दाम-दंड-भेद अशी सगळी रणनीती आहे. त्याचा वापर करीत तिन्ही पक्षांच्या नेत्यांना त्यांनी प्रचारात सक्रिय केले आहे. आज तरी चव्हाण यांचे पारडे जड दिसते पण निवडणूक एकतर्फी नक्कीच नाही.

 महाविकास आघाडी म्हणून कोणत्याही निवडणुकीला एकत्रितपणे सामोरे जाण्याची ही पहिलीच वेळ आहे. त्यामुळेच या प्रयोगाकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. चार महिन्यांनी औरंगाबाद महापालिकेची निवडणूक होऊ घातली आहे. पदवीधर मतदारसंघात काय निकाल लागतो हे त्या दृष्टीनेही महत्त्वाचे ठरणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER