महाविकास आघाडी सरकारही त्यांच्या डोळ्यात खुपते, संजय राऊतांचा भाजपला टोला

Sanjay Raut

मुंबई: महाविकासआघाडी सरकारने (Mahavikas Aghadi govt) राज्यातील मंदिरे उघडण्यास परवानगी न दिल्यामुळे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना पत्र लिहले होते. या पत्रात त्यांनी उद्धव ठाकरे यांना हिंदुत्वाचा हवाला देत मंदिरे सुरु करण्याची विनंती केली होती. तुम्ही आता ‘सेक्युलर’ झाला आहात का, असा खोचक प्रश्नही त्यांनी उद्धव ठाकरे यांना विचारला होता. राज्यपालांच्या या पत्राला उद्धव ठाकरे यांनी अत्यंत संयत पण परखड भाषेत प्रत्युत्तर दिले होते. या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या ‘सामना’तील रोखठोक या सदरातून संजय राऊत यांनी भाजपचा (BJP) समाचार घेतला. या लेखात त्यांनी भाजप विविव राज्यांतील विरोधी सरकारे अस्थिर करण्यासाठी कोणते डावपेच खेळत आहे, याचा पाढा वाचला आहे.

जेव्हा जेव्हा धर्मावर संकट येते तेव्हा तेव्हा परमेश्वर अवतार धारण करतो असे अभिवचन स्पष्ट शब्दांत परमेश्वरानेच दिले आहे, पण देश व जनता संकटात आहे. परमेश्वर कोठे काय करतोय? राजकारणी एकमेकांना निपटवण्याच्या खेळात रमले आहेत हे काही बरे नाही!

दा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत! अभ्युत्थानमधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम!!

जेव्हा जेव्हा धर्माला ग्लानी येते आणि अधर्माचे प्राबल्य वाढते तेव्हा तेव्हा मी अवतार धारण करतो, असे परमेश्वराने अभिवचन दिलेले आहे. हे सगळय़ांनाच माहीत आहे. परंतु ते अभिवचन या कलियुगात कधी खरे होणार? आज देशात हिंदुत्ववाद्यांचे राज्य आहे, पण धर्माचे राज्य आहे काय? हा प्रश्नच आहे. मुळात तुमचे राज्य सेक्युलर का नाही? असा प्रश्न महाराष्ट्राच्या राज्यपालांनी मुख्यमंत्री ठाकरे यांनाच विचारला आहे. उत्तर प्रदेशातील हाथरस येथे एका मुलीवर बलात्कार आणि हत्या झाली. ते सर्व प्रकरण आधी मीडियाने, राजकारण्यांनी वणव्यासारखे पेटवले. आता ते त्यांनीच शांत केले. पालघर येथे दोन साधूंचे हत्याकांड जमावाने केले. त्यावर देशात वादळ उठवण्यात आले. पण गेल्या चारेक दिवसांत उत्तर प्रदेशात चार साधू व राजस्थानात एका पुजाऱयाची गोळय़ा घालून हत्या करण्यात आली. राजस्थानात तर पुजाऱयास जिवंत जाळले. जणू काही घडलेच नाही अशा आविर्भावात मीडिया आहे. पालघरमध्ये साधूंवर हल्ला झाला तेव्हा तो अधर्म, पण इतरत्र तो होतो तेव्हा नेहमीची घटना हे कसे शक्य आहे? व अशा वेळी परमेश्वर कुठे असतो? साधूंचे संरक्षण करण्याकरिता दुष्ट कृत्ये करणाऱयांचा विनाश करण्याकरिता आणि धर्मस्थापना करण्याकरिता जेव्हा जेव्हा प्रसंग पडेल तेव्हा तेव्हा धावत येण्याविषयी भगवंता, तू अभिवचन दिलेले आहेस आणि तुझे अभिवचन म्हणजे मनुष्यांना फसविण्यासाठी दिलेले आहे असे कधीच कुणाला म्हणता येणार नाही. भगवंता, तू दिलेल्या अभिवचनामध्ये तू एकही संदिग्ध शब्द घातलेला नाही. त्यातील प्रत्येक शब्दाचा अर्थ स्पष्ट आहे! आज कृष्ण आणि अर्जुनाच्या भूमिकेत जे राज्यकर्ते वावरत आहेत त्यांच्यावर अभिवचन पूर्ण करण्याची जबाबदारी आहेच.

संकटे दूर कर!

श्री. नरेंद्र मोदी हे भगवान श्रीकृष्ण आणि अमित शहा हे अर्जुन असे त्यांच्या भक्तांना वाटत असेल तर त्यांचे काही चुकत नाही, पण खऱया धर्मस्थापनेचे, देशावरील संकटे दूर करण्याचे काम त्यांनी करावे इतकीच अपेक्षा आहे. श्री. बाळासाहेब ठाकरे हे लाखो लोकांसाठी दैवी अवतार ठरले होते. चीनने सीमेवर 60 हजार सैन्य जमा केले आहे. युद्धास तयार रहा असे चिनी सैनिकांना आदेश आहेत. चीन नेपाळमध्ये घुसलंय. आता त्यांनी नेपाळच्या सैनिकांवरच हल्ले केले. त्याच चीनच्या मदतीने आपण कश्मीरात पुन्हा 370 कलम लागू करू, असे डॉ. फारुख अब्दुल्ला उघडपणे म्हणाले. एक तर डॉ. अब्दुल्ला यांनी देशाची माफी मागायला हवी. नाही तर केंद्राने अशा वक्तव्यांवर कठोर कारवाई केली पाहिजे. डॉ. अब्दुल्लांचे वक्तव्य हा फक्त बिहार किंवा पं. बंगालच्या निवडणुकांतील प्रचारांचा मुद्दा नाही. कश्मीर खोऱयात कुणाला तरी चीनचा सरळ हस्तक्षेप करायला हवा आहे व त्यावर देशाच्या गृहमंत्र्यांकडून कोणतेही प्रत्युत्तर नाही. आता प्रश्न इतकाच आहे की, डॉ. अब्दुल्ला यांच्यासारख्या नेत्यांना केंद्र सरकारने आधी तुरुंगात टाकले. कारण 370 कलम हटवायला त्यांचा विरोध होता. आता ते बाहेर आले तेव्हा चीनच्या मदतीची अपेक्षा ते करीत आहेत. कश्मीरपासून लडाख अडीचशे किलोमीटरवर आहे व आता लडाखच्या सीमेवर चीनने 60 हजार इतके सैन्य आणून उभे केले. या सैन्याने कश्मीरपर्यंत यावे व 370 कलम पुन्हा आणण्यात मदत करावी, असे बोलणे हा सरळ राष्ट्रद्रोहच आहे. देशांतर्गत स्थिती हाताबाहेर गेल्याचे हे चिन्ह आहे.

अधर्म कोठे?

जेथे भाजपचे राज्य नाही तेथे अधर्म सुरू आहे असा प्रोपोगंडा सुरूच आहे व जे भाजपला हवे असलेल्या धर्माचे राज्य आणण्यास विरोध करतील त्यांना लगेच निपटवून टाकायला हवे असे काही प्रमुख लोकांना वाटते. प. बंगालात एका भाजपा पदाधिकाऱयाची हत्या झाली हे दुर्दैव पण त्याविरोधांत हजारो भाजप कार्यकर्त्यांना जमवून कोलकात्यातील मंत्रालयावर चाल करण्यात आली. यातून कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल व त्याचा राजकीय फायदा विधानसभा निवडणुकांत घेता येईल हे भाजपचे राजकीय धोरण ठीक, पण प. बंगाल हा हिंदुस्थानचाच एक भाग आहे हे केंद्राला विसरता येणार नाही. महाराष्ट्रातील महाविकास आघाडीचे सरकारही डोळय़ांत खुपते व सरकारने घेतलेला प्रत्येक निर्णय त्यांना देशविरोधी वाटतो. त्यामुळे महाराष्ट्रातील सरकार डिसेंबरपर्यंत बरखास्त करून राष्ट्रपती राजवट लादली जाईल, असे भविष्य श्री. प्रकाश आंबेडकर यांनी वर्तवून ठेवले. त्याआधी प्रमुख नेत्यांना ‘निपट डालो’ हे धोरण अमलात आणायचे. मुळात दिल्लीतील राज्यकर्त्यांनी एक लक्षात घेतले पाहिजे, एखाद्या राज्यात भाजपविरोधी सरकार स्थापन होणे हे काही घटनाविरोधी नाही, पण जेथे आपल्या विरोधी सरकारे आहेत त्या राज्यांत पॉलिटिकल एजंट म्हणून राज्यपाल नेमायचा व राज्यपालांच्या खांद्यावर बंदूक ठेवून राज्य अस्थिर करायचे हे धोरण चांगल्या राज्यकर्त्यास शोभत नाही. प. बंगालात राज्यपाल धनखर हे ममता बॅनर्जींविरोधात रोज नवी आघाडी उभारत आहेत. ममता बॅनर्जीही लढाईत मागे हटत नाहीत. दिल्लीत केजरीवाल विरुद्ध राज्यपाल झगडा आहेच. पंजाबातील लढवय्या शीख समाज अंगावर उसळला तर गडबड होईल म्हणून तेथे कुणाची हिंमत होत नाही. महाराष्ट्रात राज्यपालांनी प्रयत्न करूनही ‘ठाकरे सरकार’ स्थिर आहे. राजस्थानात अशोक गेहलोत यांचे सरकार अस्थिर करण्याचे सर्व प्रयत्न फसले हे सत्य आहे. महाराष्ट्रापेक्षा गंभीर प्रश्न गुजरात, हरयाणासारख्या राज्यांत निर्माण झाले. गुजरातमध्येही सोमनाथ, अक्षरधामसारखी मंदिरे बंद आहेत; पण महाराष्ट्रात मंदिरे बंद म्हणून राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांना खोडसाळ पत्र लिहिले. शेवटी राज्याच्या मुख्यमंत्रीपदी ‘ठाकरे’ आहेत याचा विसर त्यांना पडला व पुढचे महाभारत घडले. एकछत्री अंमल गाजवण्यासाठी जे आडवे येतील त्यांना मिळेल त्या हत्याराने दूर करा. हे एक आणीबाणीसदृश्य धोरण राबवले जात आहे. महाराष्ट्रातील सरकार स्थापनेत अडसर ठरलेले, शरद पवारांपासून संजय राऊत यांच्यापर्यंत सगळय़ांना ‘निपट डालो’ हा नवा अजेंडा राबवायचा. सुशांत प्रकरणात शिवसेनेच्या युवा नेत्यांना निपटण्याचे प्रयत्न झाले ते त्यांच्यावरच उलटले. काही झाले तरी सत्ता हवी व त्यासाठी कोणत्याही थराला जायचे. सीबीआय, इन्कम टॅक्स, ईडी यांचा वापर करायचा. हे तर रशिया, चीनपेक्षा भयंकर चालले आहे. बिहार निवडणुकीनंतर नितीश कुमार यांनाच निपटले जाईल अशी स्थिती आहे. बिहारात चिराग पासवान यांच्या पक्षाने स्वतंत्र निवडणूक लढवायचे ठरवले त्यामागे सूत्र हेच आहे.

संकटेच संकटे…

बिहार निवडणुकीत काय होणार याची उत्सुकता सगळय़ांनाच आहे. बिहारची निवडणूक एकतर्फी होणार नाही हे आता स्पष्ट झाले आहे. लालू यादव तुरुंगात आहेत, पण त्यांचे पुत्र तेजस्वी यादव यांनी गेल्या काही महिन्यांत संपूर्ण बिहारात दौरे करून वातावरण तयार केले. चिराग पासवान यांनी नितीश कुमार यांच्या ‘जदयु’विरोधात सर्वत्र उमेदवार उभे करण्याचे ठरवले. तसे झाले तर भाजप आमदारांचा आकडा जदयुपेक्षा मोठा होईल हे तर नक्कीच. बिहारात अशा वेळी राजभवन हेच सत्ताकेंद्र बनू शकते व राजकीय विरोधकांना निपटवण्याच्या खेळात राजभवनाचे महत्त्व वाढेल. अशा वेळेस धर्माच्या रक्षणासाठी परमेश्वर काय करणार ते पाहावे लागेल. बिहारची स्थिती आज चांगली नाही. मागास राज्य म्हणून अधिक मदत मिळावी अशी मुख्यमंत्र्यांची मागणी आहे. हे कसले लक्षण? या निवडणूक प्रचारातील गंमत अशी की, नितीश कुमार हे बिहारात पंधरा वर्षे राज्य करीत आहेत, पण नितीश कुमार लालू यादवांकडे ‘हिशेब’ मागत आहेत. बिहारात अपराध वाढले, त्याचा जाब सुशील मोदी राहुल गांधींकडे मागत आहेत. मुख्य म्हणजे मधल्या काळात नितीश कुमार व लालू यादव यांनी एकत्र येऊन सरकारही बनवले होते. या सगळय़ात निपटली गेली ती बिच्चारी जनता! हे चित्र फक्त बिहारचेच नाही, तर संपूर्ण देशाचे आहे. हिंदुस्थानच्या लोकांवर सध्या इतकी संकटे कोसळत आहेत की, त्यातून हिंदुस्थानला कधी डोके वर काढता येईल अशी आशा बाळगण्याला क्वचितच आशा उरलेली आहे. त्यात चीनचे 60 हजार सैन्य लडाखच्या सीमेवर उभे आहे. युद्ध देशात व बाहेर होईल. निपटवण्याचा खेळ थांबला तरच देश सुरक्षित राहील, असे राऊत यांनी म्हटले आहे.

ह्या बातम्या पण वाचा : 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER