जालन्यात हातभट्टी चालविणार्‍या सराईत महिलेची स्थानबद्धता कायम

Bombay High Court Aurangabad Bench
  • हायकोर्ट म्हणते तिच्या कारवाया समाजविघातक

औरंगाबाद : जालन्यात हातभट्टीची दारु गाळून ती विकणार्‍या महिलेची कृत्ये केवळ बेकायदाच नव्हेत तर गोरगरिबांचे आरोग्य धोक्यात आणणारी व म्हणूनच समाजविघातकही आहेत, असे म्हणत उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने या महिलेच्या वर्षभराच्या प्रतिबंधात्मक स्थानबद्धतेवर (Preventive Detention) शिक्कामोर्तब केले आहे.

खडक तलाव, वडारवाडी येथे राहणाºया चंद्रकला रामराव जाधव या ३९ वर्षीय महिलेला ‘एमपीडीए’ कायद्यान्वये स्थानबद्ध करून गेल्या ७ डिसेंबरपासून तिची रवानगी औरंगाबादच्या हर्सूल मध्यवर्ती कारागृहात करण्यात आली आहे. जालन्याच्या जिल्हा दंडाधिकार्‍यांनी काढलेल्या स्थानबद्धता आदेशास राज्य सरकारने १० डिसेंबर रोजी संमती दिली व ‘एमपीआयडी’ कायद्याखालील सल्लागार मंडळाने यंदाच्या २१ जानवारी रोजी तो आदेश कायम केला.

या स्थानबद्धतेस आव्हान देणारी चंद्रकला यांची याचिका न्या. रवींद्र घुगे व न्या. भालचंद्र देबडवार यांच्या खंडपीठाने फेटाळली. त्यामुळे आता येत्या डिसेंबरपर्यंत तरी ही हातभट्टीवाली महिला तुरुंगातून बाहेर येणार नाही.

यापुढे हा हातभट्टीचा धंदा कधीही न करण्याची लेखी हमी द्यायला मी तयार आहे. एक स्त्री म्हणून मला दया दाखवावी व झाली तेवढी स्थानबद्धता पुरेशी मानून मला सोडण्याचा आदेश द्यावा, अशी विनंती या महिलेने केली. परंतु ती अमान्य करताना खंडपीठाने म्हटले की, याचिकाकर्तीची गुन्हेगारी पार्श्वभूमी नसती तर तिच्या या विनंतीवर कदाचित विचार करता आला असता. परंतु या महिलेने सन २०१८ मध्येही पोलिसांना असेच सद्वर्तनाचे हमीपत्र लिहून दिले होते. परंतु त्यानंतरही तिने आपले बेकायदा धंदे सुरुच ठेवल्याचे दिसते. त्यामुळे आता ती देत असलेली हमी निरर्थक आहे, असे आम्हाला वाटते.

न्यायालयाने असेही नमूद केले की, गेल्या तीन वर्षांत जालन्याच्या कादिम पोलीस ठाण्याने चंद्रकला यांच्याविरुद्ध दारुबंदी कायद्यानुसार सात गुन्हे नोंदवून खटले दाखल केले. दोन ‘चॅप्टर’ केसेस करून तिच्याकडून चांगल्या वर्तनाची हमी घेण्यात आली. तरीही तिने बेकायदा दारू गाळण्याचा धंडा सोडला नाही. एवढेच नव्हे तर तिच्याविरुद्ध पोलिसांना खबर देणाºयांना पिस्तुलाचा धाक दाखवून धमकावणे व मारहाण करणे हे प्रकार करून तिने त्या भागात दहशत निर्माण केली.

-अजित गोगटे

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button