लातूर शहरात पालकमंत्र्यांच्या हस्ते फिरते मुत्रालयाचे लोकार्पण

Nilengekar patil

लातूर :- लातूर शहरातील नागरिकांना सार्वजनिक ठिकाणी शौचालयाची सुविधा नसल्याने मोठी समस्या निर्माण झाली होती. स्वच्छ भारत अभियानांतर्गत फिरते मुत्रालय (मोबाईल युरिनल व्हॅन ) आज पासून सुरु करण्यात येत असून या फिरते मुत्रालयाचे लोकार्पण कामगार कल्याण, कौशल्य विकास, भूकंप पुर्नवसन व माजी सैनिक कल्याण मंत्री तथा पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांच्या हस्ते आज येथे झाले.

भारत विकास परिषदेच्या लातूर शाखेच्या वतीने स्वच्छ भारत अभियानांतर्गत नंदी स्टॉप येथे फिरते मूत्रालय लोकार्पण सोहळा आयोजित केला होता. यावेळी खासदार डॉ. सुनील गायकवाड, महापौर सुरेश पवार, उपमहापौर देविदास काळे प्रभागातील सर्व नगर सेवक, स्वयंसेवी संस्थेचे प्रतिनिधी व नागरिक उपस्थित होते.

या फिरते मूत्रलयामुळे लातूर शहरातील व बाहेरुन येथे येणाऱ्या नागरिकांसाठी चांगली सुविधा निर्माण झाली असून लवकरच फक्त महिलांसाठी ही दोन स्वतंत्र फिरते शौचालय सुरु केली जाणार असल्याची माहिती पालकमंत्री निलंगेकर यांनी दिली. तसेच लातूर शहर महानगरपालिकेच्या वतीने शहरातील प्रमुख रस्ते, चौक व बाजारपेठेच्या ठिकाणी सार्वजनिक शौचालय बांधली जात आहेत. या सर्व शौचालयांची कामे अंतिम टप्प्यात असून ही सर्व शौचालयांचे एका महिन्यात लोकार्पण केले जाणार असून लातूरकरांसाठी व लातूर शहरात जिल्हयातून व इतर ठिकाणाहून येणाऱ्या नागरिकांना शौचालयाची सुविधा मिळणार आहे. तसेच लातूर शहर हे सुंदर व स्वच्छ शहर म्हणून ओळखले जाईल. या स्वच्छता अभियानात सर्व नागरिकांनी सक्रीय सहभाग देण्याचे आवाहन श्री. निलंगेकर यांनी यावेळी केले.

Sambhaji Nilengekar patilफिरते मूत्रालयाची संकल्पना ही नावीन्यपूर्ण असून कदाचित राज्यातील असा हा पहिलाच प्रयोग असेल, असे श्री. निलंगेकर यांनी सांगून या सुविधेचा नागरिकांनी लाभ घेऊन आपलं शहर स्वच्छ ठेवावे, असे त्यांनी म्हटले. यावेळी खासदार डॉ. गायकवाड यांनी या उपक्रमाचे कौतूक करुन केंद्रीय स्तरावरुन मदत देण्याचा प्रयत्न करण्याची ग्वाही देऊन उपक्रमाला शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक शैलेश कुलकर्णी यांनी केले तर आभार श्री. पत्की यांनी मानले.