मुस्लिम स्त्रीने एकाहून अधिक विवाह करण्यास कायद्याने बंदी

Punjab & Haryana HC
  • बहुविवाहाचा हक्क फक्त मुस्लिम पुरुषांनाच

चंदिगढ :- पहिला पती हयात असताना किंवा त्याच्यापासून रीतसर तलाक घेतल्याखेरीज मुस्लिम स्त्रीने दुसऱ्या पुरुषाशी केलेला विवाह कायद्यानुसार अवैध ठरतो, असे पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयाने म्हटले आहे. न्यायालयाने म्हटले की, मुस्लिम पुरुष आधीच्या पत्नीला तलाक न देता एकाहून अधिक विवाह करू शकत असला तरी मुस्लिम स्त्रीला हा हक्क नाही. आधीच्या पतीचे निधन झाल्यावर किंवा त्याच्यापासून रीतसर तलाक घेतल्यावरच मुस्लिम स्त्री कायदेशीरपणे दुसरा विवाह करू शकते.

एका दाम्पत्याने संरक्षणासाठी केलेली याचिका फेटाळताना न्या. अलका सरिन यांनी वरीलप्रमाणे कायदा विषद केला. याचिका करणाऱ्या या दाम्पत्यामधील स्त्री व पुरुष दोघेही धर्माने मुस्लिम व वयाने सज्ञान होते. आमचे परस्परांवर निरतिशय प्रेम आहे. गेली अनेक वर्षे आम्ही एकत्र राहात आहोत व १९ जानेवारी रोजी आम्ही रीतसर विवाहही केला आहे. परंतु या दाम्पत्यातील स्त्रीच्या घरचे लोक धमक्या देत असल्याने आमच्या जीवाला धोका आहे, असे त्यांचे म्हणणे होते. यासाठीच त्यांनी संरक्षणासाठी याचिका केली होती.

न्यायमूर्तींनी विचारलेल्या प्रश्नाच्या उत्तरात या दाम्पत्याने असेही सांगितले की, आत्ता जानेवारीत केलेला विवाह हा आमच्या दोघांचाही दुसरा विवाह आहे. आम्ही दोघेही मुस्लिम असल्याने आम्ही असा दुसरा विवाह करू शकतो. न्या. सरिन यांनी अधिक चौकशी करता असे स्पष्ट झाले की, न्यायालयापुढे असलेल्या दम्पत्यापैकी स्त्रीने पहिल्या पतीपासून घटस्फोट घेतलेला नाही, त्यामुळे तिचे तो विवाह कायद्याने अद्यापही साबूत आहे. म्हणजेच तिने पहिल विवाह संपुष्टात न आणता आता हा दुसरा विवाह केला आहे.

या अनुषंगाने सुरुवातील म्हटल्याप्रमाणे मत नोंदवत न्यायमूर्तींनी म्हटले की, या दाम्पत्याचा विवाहच कायदेशीर नसल्याने ते न्यायालयात रिट याचिका करून संरक्षण मागू शकत नाहीत. तरीही त्यांना व्यक्ती म्हणून संरक्षण हवे असेल तर त्यासाठी ही दोघं संबंधित जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे अर्ज करू शकतात. त्यांनी तसा अर्ज केल्यास अधीक्षकांनी त्यावर कायद्यानुसार निर्णय घ्यावा, असे न्यायालयाने म्हटले.

अजित गोगटे

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER