
सातारा : भाजपचे (BJP) आमदार शिवेंद्रराजे भोसले (Shivendra Raje Bhosale) व राष्ट्रवादीचे (NCP) आमदार शशिकांत शिंदे (Shashikant Shinde) यांच्यातील गेल्या आठवडाभरातील टोकाचा संघर्ष पाहिलेल्या सातारा (Satara) जिल्हावासीयांना काल, रविवारी सातारा जावलीचा तह अनुभवायला मिळाला. काट्याने काटा काढण्याची भाषा झाल्यानंतर कोणत्याही संघर्षाला तयार असल्याचीही ललकारी देण्यात आली होती. तेच हे दोन्ही नेते एका सुपारी-साखरपुड्याच्या कार्यक्रमात एकत्र आले, एकमेकांशी संवाद साधला अन् गप्पाही मारल्या. या दिलजमाईमुळे राजकीय वर्तुळाच्या मात्र, भुवया पुन्हा उंचावल्या.
आ. शिवेंद्रराजे व आ. शशिकांत शिंदे यांच्यात गेल्या काही दिवसांपासून शीतयुद्ध सुरू आहे. दोन – तीन दिवसांपूर्वी तर आ. शिवेंद्रराजे भोसले यांनी कुडाळ येथील कार्यक्रमात आ. शिंदे यांच्यावर तोफ डागली होती. माझी वाट लागली तरी चालेल, पण समोरच्याला संपवल्याशिवाय राहणार नाही. माझ्या वाटेला कोणी गेला तर काट्याने काटा काढलेला कळणारही नाही, अशा आक्रमक भाषेत त्यांनी आ. शिंदे यांच्यावर घणाघात केला होता. राजकीय पटलावर त्यामुळे मोठी खळबळ उडाली. आ. शशिकांत शिंदे यांनीही वैयक्तिक वाद नसला तरी पक्षीय पातळीवर वाद असल्याचे सांगताना कोणत्याही संघर्षाला आपण तयार असल्याचा इशारा दिला होता. त्याचवेळी राज्याचे उपमुख्यमंत्री ना. अजित पवार यांनीही या संघर्षावर कोटी केली होती. धमकीला घाबरायचे काही कारण नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले होते. या पार्श्वभूमीवर रविवारी मात्र हे दोन्ही नेते टोकाची भाषा विसरून एकत्र आलेले दिसले.
सुरुवातीला काट्याने काटा काढण्याची भाषा आणि भेटल्यावर मात्र, संवाद असे सातारा जावळीचा तह झाल्याचे चित्र पाहायला मिळाले.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला