कर्नाटक सरकार आज ना उद्या पडणारच

Karnataka Goverment copy

badgeकर्नाटकातील जनता दल आणि काँग्रेस आघाडीचे अवघ्या १३ महिन्याचे सरकार वाचवण्याची अखेरची धडपड सुरु आहे. १३ बंडखोर आमदारांनी राजीनामे दिल्याने कुमारस्वामी सरकार अल्पमतात आले आहे. आज विधानसभा सभापती रमेशकुमार यांनी यातल्या फक्त पाच आमदारांचे राजीनामे नियमानुसार आहेत असे सांगितल्याने सरकार तात्पुरते का होईना बचावले आहे. राजीनाम्याचे पत्र लिहायलाही काही नियम आहेत. आठ आमदारांनी त्या प्रमाणे पत्र लिहिलेले नाही. सरकारच्या ते पथ्यावर पडले. पण किती टिकणार? बंडखोरांना मंत्रीपदे देण्याची तयारी दाखवूनही बंडखोर नमायला तयार नाहीत. त्यामुळे आज ना उद्या ह्या सरकारला जावे लागणार आहे.

ही बातमी पण वाचा :  संघाचा इतिहास का शिकू नये?

परस्परांच्या विरोधात लढल्यावर केवळ सत्तेसाठी एकत्र आलेल्या पक्षांचे हे सरकार पहिल्या दिवसापासून अविश्वासाच्या वातावरणात गुदमरत होते. दोघेही एकमेकांवर कुरघोडी करण्याची कुठलीही संधी सोडत नव्हते. मुख्यमंत्री कुमारस्वामी यांचे वडील माजी पंतप्रधान एच. डी. देवेगौडा यांनी आजच्या संकटात मुदतपूर्व निवडणूक हा एकमेव पर्याय असल्याचे दोन दिवसांपूर्वीच सांगितले आहे. सत्ताधाऱ्यांनाही ते कळते. पण सरकार वाचवण्यासाठी ते अखेरचे हातपाय मारत आहेत. कर्नाटकातल्या फोडाफोडीशी आमचा संबंध नाही असे भाजपने म्हटले असले तरी वास्तव लपलेले नाही. ‘आम्ही संन्यासी नाही’ असे भाजप नेते येदियुरप्पा यांनी सांगून टाकले आहे. कर्नाटक विधानसभेचे अधिवेशन १२ जुलैपासून सुरु होत आहे. त्यावेळी सरकारचा हिशोब होईल.

कर्नाटकाच्या निवडणुकीत मागच्या वर्षी १०४ जागा जिंकून भाजप सर्वात मोठा पक्ष बनला. पण बहुमतासाठी ११३ जागा हव्या होत्या. भाजपला रोखण्यासाठी जद सेक्युलर आणि काँग्रेस एकत्र आले. पण मनाने ते दूर राहिले. त्याचा परिणाम असा झाला, की १३ महिन्याचे हे सरकार केव्हाही कोसळू शकते. २२८ सदस्यांच्या विधानसभेत सत्ता आघाडीकडे बहुमतापेक्षा फक्त पाच आमदार जास्त होते. १३ आमदारांनी शनिवारी राजीनामे दिल्याने सरकार अल्पमतात आले आहे. अंतर्गत राजकारणामुळेच हे संकट उद्भवले आहे. भाजप आता काय डावपेच खेळतो ते पाहायचे. भाजप सत्तेत आला तरी त्यांचेही सरकार असेच कोसळेल. प्रचंड अस्थिरतेच्या सापळ्यात कर्नाटक सापडले आहे. कर्नाटकच्या लोकांना लवकरच पुन्हा मतदानाला जावे लागेल.