फुटपाथ ते वांद्र्यातील प्लॅट…सोपा नव्हता प्रवास

The journey from the sidewalk to Bandra was not easy

संघर्ष प्रत्येक क्षेत्रात आहे. कष्टातून जे यश मिळतं त्याचा आनंद हा त्या व्यक्तीशिवाय कुणीच जाणू शकत नाही. मनोरंजन क्षेत्रातील अनिश्चिततेच्या वातावरणामुळे या क्षेत्रातील संघर्षातून यशस्वी होणाऱ्या कलाकारांचा प्रवास त्यांचे चाहते नेहमीच अभिमानाने ऐकतात. अभिनेता निखिल राऊत (Nikhil Raut) यानेही त्याच्या संघर्षमय काळातील काही आठवणी सोशलमीडियावर शेअर केल्या. निखिलने एकेकाळी मुंबईत दादरमधील फुटपाथवर रात्री झोपून काढल्या आहेत, पण कामाची लाज न बाळगता आज त्याने अभिनेता म्हणून स्थान बळकट करत वांद्र्यात हक्काचे घरही घेतले आहे. त्याच्या या कर्तृत्वामुळेच त्याच्या अभिनयालाही झळाळी आल्याच्या प्रतिक्रिया त्याच्या चाहत्यांनी दिल्या आहेत.

महाराष्ट्राचा सुपरस्टार कोण या रिअॅलिटी शोमध्ये आपलं नशीब आजमावण्यासाठी जे तरूण आले त्यामध्ये निखिल राऊत हे एक नाव होतं. आज त्या शोमधला एक स्पर्धक मालिका, नाटक, सिनेमा, वेबसिरीज या प्रत्येक माध्यमात यशस्वी झाला आहे. चला हवा येऊ द्या शोमधील विनोदवीरांच्या पंचचा शिलेदार डॉ. निलेश साबळे, अभिनेता व निवेदक असलेला अभिजित खांडकेकर (Abhijit Khandkekar), कवितांमधून अंतर्मुख करून आणि उत्तम निवेदनशैलीने खिळवून ठेवणारा अभिनेता संकर्षण कऱ्हाडे (Sankarshan Karhade) हे हिरेही त्याच शोमधून झळकलेले. अभिनयाची आवड होती पण दिशा मिळत नव्हती.

त्या काळातील काही भावूक आठवणी सांगताना निखिल म्हणतो, अभिनयातच करिअर करायचं म्हणून मी पुण्यातून मुंबईला येण्याची तयारीही केली होती. पण वडीलांची नोकरी गेली आणि आमचं आर्थिकचक्रच बिघडले. सुरूवातीला मी दुधाच्या पिशव्या घरोघरी पोहोचवण्याचं काम केलं. त्यानंतर मी प्युरिफायर बनवणाऱ्या एका कंपनीत कमिशन बेसिसवर काम करू लागलो. एकदा पुण्यात दुपारच्या वेळी प्युरिफायरच्या मार्केटिंगसाठी एका घरी गेलो असताना त्या घरातील बाईंनी खूप वाईट शब्दात अपमान केला. त्यादिवशी ठरवलं की अभिनयाच्या आवडीलाच करिअर बनवायचं. मुंबई गाठायचं ठरवलं पण तोपर्यंत पुण्यातून मुंबईला ऑडीशनसाठी जाताना खूप पैसे खर्च व्हायला लागले. मग मात्र मुंबईतच रहायचं ठरवलं. दिवसभर ऑडीशन्स आणि रात्री फुटपाथवर झोप असा प्रवास सुरू झाला. एका ऑडीशनच्यानिमित्ताने सहसूत्रसंचालनाची संधी मिळाली. सेटवर स्पॉटबॉयचे काम करत असताना काही कलाकारांची रिप्लेसमेंट करण्याची संधी मिळाली. तेव्हाच सुपरस्टार या शोबाबत कळलं आणि माझं आयुष्य बदलून गेलं. या शोमध्ये मी उपविजेता झालो. कामं मिळतं गेली आणि आज अभिनेता म्हणून ओळख बनवू शकलो. फुटपाथवरचे ते दिवस आजही आठवतात, आज जरी मी हक्काच्या घरी राहत असलो तरी त्या पाच फूट जागेनं मला खूप काही दिल्याची जाणीव विसरू शकत नाही.

निखिल राऊत सध्या येऊ कशी तशी मी नांदायला या मालिकेत मोहित ही भूमिका साकारत आहे. एखाद्या श्रीमंत मालकाच्या हो ला हो म्हणणाऱ्या होयबा टाइपची ही भूमिका निखिलने अत्यंत उत्तम साकारली आहे. यापूर्वी काहे दिया परदेस या मालिकेतही निखिल झळकला होता. फत्तेशिकस्त, फर्जंद या सिनेमातही निखिलच्या भूमिकेचे कौतुक झाले होते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button