ऑफकॅमेरा ते ऑनकॅमेरा वीणाचा प्रवास

Veena Jagtap

मराठी सिनेमा, मालिका इंडस्ट्रीमध्ये असे अनेकजण आहेत जे सुरुवातीला कॅमेऱ्यामागे त्यांचा रोल करत होते. पण तो कॅमेऱ्यामागचा अनुभव त्यांना कॅमेऱ्यापुढे काम करतानाही कामी आला आणि सध्या ही मंडळी कॅमेऱ्या समोरही काम चोख बजावत आहेत. आई माझी काळुबाई या मालिकेत आर्याची भूमिका करत असलेली वीणा जगताप सुरुवातीला कॅमेऱ्यामागे सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम करत होती. पण कॅमेऱ्यामागे उभे राहून, समोर अभिनय करणाऱ्या कलाकारांकडे पाहताना तिच्या मनात कुठेतरी हा विचार आला की आपणही अभिनय करू शकतो. त्यादृष्टीने तिने प्रयत्न सुरू सुरु केले. आज ती अभिनेत्री म्हणून ओळखली जात आहे.

मुळची उल्हासनगरची असलेली वीणा जगताप हिच्या मनात कुठेच अभिनेत्री होण्याचा विचार तोपर्यंत नव्हता जोपर्यंत तिला एका जाहिरातीत काम करण्याची संधी मिळाली. उल्हासनगरमधल्या घरी कुटुंबीयांसोबत तिचे छान चाललं होतं. महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना तिला एक छोटीशी जाहिरात करण्याची संधी मिळाली त्याच जाहिरातीच्या संधीमुळे तिचा प्रवेश रुपेरी जगतात झाला. मात्र सुरुवातीला तिला अभिनेत्री म्हणून कुठेच स्थान मिळालं नाही पण कॅमेऱ्यामागे दिग्दर्शन टीम सहकारी म्हणून तिचं काम सुरू झालं. कॅमेरामागे कितीतरी गोष्टी घडत असतात त्यामुळेच आपण जे कॅमेर्‍यासमोर पाहतो ते साकारत असतं याची जाणीव तिला झाली. पण हे कॅमेऱ्यामागचं काम करत असताना तिला असं वाटलं की आपण अभिनय क्षेत्रात करिअर का करू नये. त्यावेळेस तिच्या काही सहकाऱ्यांनी तिला प्रोत्साहन दिलं आणि त्या दृष्टीने तिने ऑडिशन द्यायला सुरुवात केली. अर्थात सुरुवातीला तिला ऑडिशन मिळवण्यासाठी खूप धडपड करावी लागली.

त्याच आठवणींन बाबत सांगताना वीणा म्हणते, मला मराठी मालिकांमधून काम करण्यापासून सुरुवात करायची होती पण त्या काळात मराठी मालिकांमध्ये मला काम मिळालं नाही. सतरंगी ससुराल हिंदी सिरियलमध्ये मला एक छोटासा रोल करण्याची संधी मिळाली आणि त्याच रोलमुळे ये रिश्ता क्या कहलाता है या गाजलेल्या मालिकेत नकारात्मक रोल मिळाला. हिंदी मालिकांमध्ये काम केल्यानंतरही मला मराठी मालिकेत काम करण्याची ओढ काही स्वस्थ बसू देत नव्हती. खूप प्रयत्न केल्यानंतर राधा प्रेम रंगी रंगली या मराठी मालिकेत मला ब्रेक मिळाला आणि याच मालिकेतील राधा या भूमिकेने माझा आयुष्य बदलून गेलं.

ही मालिका संपल्यानंतर वीणाच्या हातात काहीच काम नव्हतं. तेव्हा मराठी बिग बॉसची घोषणा झाली आणि बिग बॉसच्या घरात वीणाची वर्णी लागली. या शोने तिला फक्त लोकप्रियताच मिळवून दिली असं नाही तर बिग बॉसच्या घरात तिला आयुष्याचा जोडीदार शिव ठाकरे देखील मिळाला. या जोडीचे प्रचंड चाहते असून सोशल मीडियावर देखील वीणा आणि शिवची जोडी लोकप्रिय आहे. वीणा सध्या आई माझी काळुबाई या मालिकेत काम करत असून लॉकडाउननंतर तिचं हे पहिलेच काम असल्यामुळे या मालिकेतील आर्याच्या भूमिकेची ती प्रचंड ऋणी आहे. ती नेहमी या भूमिकेचे आभार मानत असते. खरेतर या मालिकेत सुरुवातीला आर्याची भूमिका अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड करत होती. परंतु प्राजक्ता आणि या मालिकेच्या निर्मिती टीम यांचा वाद झाल्यानंतर आर्याच्या भूमिकेसाठी वीणाची निवड झाली.

ती सांगते की जेव्हा एखादी भूमिका आधीपासून दुसरी कलाकार करत असते त्यानंतर आपण जेव्हा ती भूमिका करतो तेव्हा सर्वात मोठ आव्हान हे असतं की आपण चाहत्यांच्या पसंतीस उतरण्याचं. लोकांच्या मनात आधी एक वेगळाच चेहरा असतो त्यामुळे आपल्या अभिनयाने, आपल्या कामाने त्या व्यक्तिरेखेसाठी आपली योग्यता सिद्ध करणं हे अभिनेत्री म्हणून माझ्या समोरदेखील आव्हान होतं. गेल्या दोन महिन्यांपासून मी माझ्या परीने पूर्ण प्रयत्न करत आहे. तर एखादी धार्मिक मालिका करणं हेदेखील खूप जोखमीचे काम असतं. धार्मिक कथेशी अनेकजण जोडले गेलेले असतात.

त्यांच्या भावना न दुखावता कथा योग्य मार्गाने पुढे नेणं ही खूप अवघड गोष्ट असते. आई माझी काळुबाई या मालिकेच्या निमित्ताने मला देखील स्वतःच्या जबाबदारीची जाणीव ठेवावी लागते की कुठेही माझ्या वागण्या-बोलण्यातून आई माझी काळुबाई या मालिकेकडे कुणीही बोट दाखवलं जाणार नाही. अर्थातच सध्या वीणा, आई माझी काळुबाई ही मालिका प्रचंड एन्जॉय करत आहे. पण जो अनुभव तिला सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम करत असताना कॅमेऱ्याच्यामागे आला तो अनुभव नक्कीच कॅमेरासमोर अभिनेत्री म्हणून काम करत असताना उपयोगी येत असल्याचं सांगत ती त्या कॅमेर्‍यामागच्या दिवसाचेही विशेष आभार मानते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER