ठाणे क्लस्टरच्या सीमांकनाचा वाद पुन्हा उफाळला

Thane mahanagarpalika

ठाणे : ठाणे शहरातील पाच ठिकाणांच्या क्लस्टरचा आराखडा गुरुवारी झालेल्या महासभेत मंजूर करण्यात आला. या योजनेतून गावठाण आणि कोळीवाडे वगळण्यात आल्याचे स्पष्ट करण्यात आले. परंतु असे असतांना आता क्लस्टरचा नवीन वाद निर्माण झाला आहे. महसूलमंत्र्याचे आदेश धाब्यावर बसवून ठाण्यात क्लस्टर राबविण्याची पालिकेला घाई झाल्याचा आरोप गावठाण आणि कोळीवाडय़ातील रहिवाशांनी केला आहे. त्यामुळेच महसूल विभाग व भूमापन विभागाने करायचे सीमांकनाचे काम ठाणे महापालिका प्रशासनाने घाई घाईने क्लस्टर राबविण्यासाठी चालू केल्याची माहिती या भूमीपुत्रंनी दिली आहे.

ही बातमी पण वाचा :- ठाणे क्लस्टरच्या भुमिकेत राष्ट्रवादीचे 24 तासातच यू टर्न

कोळीवाडा व गावठाणांचे विस्तारित सीमांकन झाले नसताना श्रेय वादासाठी वैयिक्तक स्वार्थासाठी सर्व नियम धाब्यावर बसवून प्रशासन क्लस्टरचे सुधारित प्रस्ताव महासभेत मंजुरीसाठी मांडले होते. त्याला सभागृहाने एकमताने मंजुरीसुध्दा दिली आहे. परंतु हे कायद्याला धरुन नसल्याचा मुद्दा गावठाण कोळीवाडय़ातील रहिवाशांनी उपस्थित केला आहे. ठाण्यातील भूमिपत्रंनी याबाबतचे सविस्तर निवेदन सोमवार 17 डिसेंबरला महापौर मीनाक्षी शिंदे यांना दिले होते. त्यावर सविस्तर चर्चा सुद्धा केली होती. या प्रस्तावाला स्थगिती द्या, अशी विनंती यावेळी करण्यात आली होती. परंतु असे असतांना गुरुवारी महासभेत क्लस्टरचा प्रस्ताव मंजूर कसा झाला, असा प्रश्न ‘ठाणे गावठाण कोळीवाडे पाडे संवर्धन समिती’च्या वतीने उपस्थित करण्यात आला आहे.

कोपरी व राबोडी या परिसरात कोळीवाडे गावठाणात येत असून त्याचे महसूल विभागामार्फत व भू- नगरमापन विभागाकडून विस्तारित सीमांकन झालेच नाही. मुंबईच्या धर्तीवर ठाण्यातही ते लवकरात लवकर व्हावे ही कोळीवाडा व गावठाण यांची मागणी शासनाकडे आजही प्रलंबित आहे. हद्द निश्चित करण्याचे काम पालिकेचे नसून ते महसूल व भूमापन विभागाचे आहे. संबधित विभागाने कोळीवाडा व गावठाण यांचे विस्तारित सीमांकन केलेच नाही तर पालिकेच्या प्रशासनाने क्लस्टरचा सुधारित प्रस्ताव बनवलाच कसा? असा सवाल उपस्थित करण्यात आला आहे.

या संदर्भात समितीचे सदस्य गिरीश साळगावकर यांनी सांगितले आहे की सीमांकन झाल्याशिवाय क्लस्टरच्या प्रकल्पाला मंजुरी देणो चूक आहे. त्यामुळे याविरोधात शेतकरी पुन्हा रस्त्यावर उतरेल, असा इशाराही त्यांनी दिला आहे.