तुर्कस्तानच्या ‘त्या’ मशिदीच्या मुद्द्याचा केरळच्या निवडणुकीवर परिणाम!

hagia sophia

मुंबई : तुर्कस्तानचे राष्ट्राध्यक्ष रेसेप तैयब एर्दोगान (Turkey President Recep Tayyip Erdogan) यांनी जुलै महिन्यात तुर्कस्थानमधल्या हाया सोफिया (Hagia Sophia) म्युझियमचे मशिदीत रुपांतर केले. या मुद्द्याचा केरळच्या स्थानिक संस्थांच्या निवडणुकीवर परिणाम झाला!

हाया सोफिया (Hagia Sophia) म्युझियमचे मशिदीत रुपांतर करण्याच्या रेसेप तैयब एर्दोगान यांच्या निर्णयाला जगभरातून विरोध झाला त्याची केरळमध्येही चर्चा झाली. एर्दोगन यांच्या निर्णयाचे केरळ मुस्लीम लीगने स्वागत केले. या पक्षाचे नेते अली शिहाब यांनी या निर्णयाला पाठिंबा देणारा लेख लिहिला. केरळ मुस्लीम लीग हा ‘युनायटेड डेमॉक्रॅटीक फ्रंट’चा (UDF) घटकपक्ष आहे. राज्यात सध्या विरोधी पक्षामध्ये असलेल्या या आघाडीचं नेतृत्व काँग्रेसकडे आहे.

अली शिहाब यांच्या लेखावर सत्तारुढ मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने जोरदार टीका केली. ‘आता मुस्लीम लीग कोणत्या आधारावर अयोध्येत राम मंदिर उभारण्याच्या भाजपाच्या निर्णयाचा विरोध करेल? त्या जागेवर यापूर्वी मशिद होती ती पाडून आता मंदिर उभारले जात आहे’ असा प्रश्न पक्षाचे पॉलिट ब्युरो सदस्य कोडियारी बालकृष्णन यांनी फेसबुक पोस्टवर विचारला.

काँग्रेस टार्गेट

बालकृष्णन यांनी त्यांच्या फेसबुक पोस्टमध्ये काँग्रेसला टार्गेट केले. ‘जमात-ए-इस्लामीने तुर्कस्तान सरकारला पाठिंबा दिला आहे. त्यानंतर मुस्लीम लीगच्या नेत्यानीही म्युझियमचे रुपांतर मशिदीमध्ये करण्याच्या निर्णयाचे उघड स्वागत केले आहे. काँग्रेसने जमात-ए-इस्लामी संघटनेची राजकीय शाखा असलेल्या वेलफेअर पार्टीशी आघाडी करण्याचा निर्णय घेतला आहे. ‘पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया’ (PFI) ची राजकीय शाखा असलेल्या एसडीपीआयसोबतही काँग्रेसचा आघाडीचा विचार आहे. त्यामुळे तुर्कस्तानच्या या प्रश्नावर काँग्रेसची भूमिका काय आहे?’ असा प्रश्न विचारला.

चर्चचा विरोध

केरळमध्ये मोठा प्रभाव असलेल्या कॅथलिक चर्चनेही तुर्कस्तान सरकारच्या निर्यणाचा जोरदार विरोध केला. ‘मुस्लीम लीगच्या नेत्यांनी इतिहासाचे वाचन करावे’ असा सल्ला चर्चने दिला. विशेष म्हणजे केरळच्या राजकारणात चर्चची भूमिका आजवर काँग्रेसच्या सोयीची राहिलेली आहे. चर्चने स्थानिक निवडणुकांपूर्वी भूमिका बदलली. त्याचा मोठा परिणाम निवडणूक निकालांवर आणि मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या विजयात झाला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER