
नवी दिल्ली :- युपीएचं नेतृत्व शरद पवारांनी करण्याच्या शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्या वक्तव्यावरुन काँग्रेस नेत्यांनी नाराजी जाहीर केली आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी संजय राऊतांनी आपला संबंध नाही त्या विषयात पडू नये असा सल्लाच दिला आहे. दरम्यान संजय राऊत यांनी काँग्रेस नेत्यांच्या टीकेला उत्तर दिलं असून महाराष्ट्रातील काँग्रेस नेत्यांनी अभ्यास करणं गरजेचं आहे असं म्हटलं आहे. संयुक्त पुरोगामी आघाडीच्या अध्यक्षपदाचा विषय हा केंद्रातील चर्चेचा विषय आहे. राज्यातील किंवा जिल्हा-तालुका स्तरावरील नेत्यांनी यावर बोलू नये. तसंच या विषयावर सोनिया गांधी, राहुल गांधी यांनी भाष्य केल्यास आपण त्यांना उत्तर देऊ अश्या शब्दांत संजय राऊत नाना पटोले (Nana Patole) यांना प्रत्युत्तर दिले. ते दिल्लीत पत्रकारांशी बोलत होते.
युपीए विषयी बोलण्यासाठी त्याचा भाग असलंच पाहिजे, हे आवश्यक नाही. या देशात भाजपविरोधात विरोधी पक्षांची मजबूत आघाडी उभी करायची असेल तर युपीए विषयी चर्चा झाली पाहिजे. ही गोष्ट महाराष्ट्रातील नेत्यांना उमजत नसेल तर त्यांना अभ्यास करण्याची गरज आहे. हा दिल्लीतील विषय आहे. महाराष्ट्रातील नेत्यांनी यामध्ये पडू नये. सोनिया गांधी किंवा राहुल गांधी याविषयी काही बोलले तर आम्ही उत्तर देऊ. देशात विरोधी पक्षांची सक्षम आघाडी उभी राहिली नाही तर भाजपचा पराभव कसा करणार, याचं उत्तरही या नेत्यांनी दिल्लीत बसून द्यावं, असा टोला संजय राऊत यांनी लगावला. त्यामुळे आता यावर नाना पटोले काय बोलणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.
काँग्रेसने यूपीएच अध्यक्षपद चांगल्याने हाताळले आहे. मात्र आता काँग्रेसने अध्यक्षपदाचा हट्ट न सोडल्यास राष्ट्रीय स्तरावरील काही नेते यूपीए २स्थापन करण्याच्या तयारीत आहेत. हीच चिंता असल्याने मी यूपीएचे अध्यक्षपद शरद पवार (Sharad Pawar) यांच्याकडे देण्याची मागणी केली. पण काँग्रेस पक्षाशिवाय यूपीए असूच शकत नाही, असेही संजय राऊत यांनी स्पष्ट केले.
शरद पवार पश्चिम बंगालला जाणार आहेत. माझा विचार आहे जाण्याचा. काँग्रेसने आक्षेप घेतलेला, परंतू पवार हे देशाच्या फायद्याचा त्यांच्या विवेकबुद्धीला पटणारा निर्णय घेतात. यामुळे भाजपाची प्रचार करण्याची पद्धत पाहता ममतांचे हात बळकट करणे गरजेचे आहे, असे राऊत म्हणाले.
ही बातमी पण वाचा : ‘अस्तीनीतल्या सापांना दूर ठेवा’ ही बाळासाहेब, पवारांची भूमिका स्वीकारण्याची गरज – संजय राऊत
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला