आयपीएलच्या टाय सामन्यात आता ‘सुपर ओव्हर्स’साठी तासाभराचा अवधी

IPL - Maharastra Today
  • तिसऱ्या पंचांना मिळाले जादा अधिकार
  • साॕफ्ट सिग्नल झाले बाद
  • 20 वे ओव्हरही 90 मिनीटातच व्हावे
  • सुपरओव्हर्सच्या संख्येवर मर्यादा नाही

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ‘साॕफ्ट सिग्नल’च्या (Soft Signal) निर्णयावरुन गदारोळ सुरू असताना इंडियन प्रिमीयर लीग (IPL) ने मात्र साॕफ्ट सिग्नलच बाद करुन विवादाचे मूळच संपवले आहे. त्यामुळे यंदाच्या आयपीएलमध्ये मैदानातील पंचांनी लाईन काॕलवरुन नो बाॕल (No Ball) दिला तरी तिसरे पंच ( Third Umpire) तो निर्णय बदलू शकतील. याचप्रकारे शाॕर्ट रनचा (Short Run) निर्णयही आता तिसऱ्या पंचाला बदलता येणार आहे.

याशिवाय आणखी एक महत्त्वाचा बदल म्हणजे आयपीएलमध्ये सामना ‘टाय’ झाला (Tie) तर प्रत्यक्षात ज्यावेळी सामना संपला तेंव्हापासून आणखी तासभर सुपर ओव्हर (Super Over) खेळता येणार आहेत. आतापर्यंत सामना संपण्याच्या नियोजीत वेळेनंतरच सुपर ओव्हरसाठी तासाभराचा अवधी मिळत होता पण आता सामना नियोजीत वेळेच्या उशिरासुध्दा संपला तरी हा तासाभराचा अवधी मिळणार आहे.

गेल्यावर्षी मुंबई इंडियन्स आणि किंग्ज इलेव्हन पंजाबदरम्यानच्या सामन्यात दोन सुपर ओव्हर खेळले गेले होते पण तिसऱ्या सुपर ओव्हरची गरज पडली असती तर प्लेइंग कंडिशन्सनुसार तेवढा वेळच नव्हता.

आयपीएलच्या संचालन मंडळाने (IPL Governing Council) मान्यता दिल्यावर भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) मैदानातील पंचांना तिसऱ्या पंचाकडे निर्णय सोपवताना साॕफ्ट सिग्नल्स देण्यास परवानगी दिलेली नाही.

आतापर्यंतच्या नियमात असे म्हटले होते की, मैदानातील दोन्ही पंचांना निर्णय घेण्यासाठी तिसऱ्या पंचाच्या मदतीची आवश्यकता असेल तर गोलंदाजाच्या टोकाकडील पंचाने स्क्वेअर लेग पंचाशी सल्ला करुन निर्णय घ्यावा. त्यानंतर वाॕकी टाॕकीद्वारे तिसऱ्या पंचाशी सल्ला करावा. तसे करताना गोलंदाजाच्या टोकाकडील पंचाने हाताने इशारे करुन टीव्हीच्या पडद्यासारखी खूण करावी आणि त्यापाठोपाठ आपल्या छातीजवळ हात घेत फलंदाज बाद की नाबाद याचा साॕफ्ट सिग्नल तिसऱ्या पंचाला द्यावा. तिसऱ्या पंचाला जर निर्णय घेण्याइतपत स्पष्टता नसेल तर मैदानातील पंचांनी घेतलेला मूळ निर्णय कायम राहील. पण आता नव्या दुरुस्तीनुसार तिसऱ्या पंचाला कोणतेही मत न बनवता मोकळेपणाने निर्णय घेता यावा यासाठी साॕफ्ट सिग्नलला मनाई करण्यात आली आहे.

भारत आणि इंग्लंडदरम्यानच्या चौथ्या टी-20 सामन्यात सूर्यकुमार यादवला डेव्हिड मालनकडून झेलबाद दिले गेल्यापासून साॕफ्ट सिग्नल चर्चेत आहे. मालनने झेल बरोबर घेतलेलाच नव्हता असे अनेकांचे मत होते पण मैदानातील पंचांनी यादव बाद असल्याचा जो साॕफ्ट सिग्नल दिला होता तो तिसरे पंच विरेंद्र शर्मा यांनी उचलून धरला होता.

आयपीएलमध्ये आतापर्यंत प्रतितास 14.11 षटकं गोलांदाजी झाली पाहिजे, याचाच अर्थ डावातील विसावे षटक हे 90 मिनिटाच्या आत (टाईम आउटची 5 मिनिटे धरुन) सुरु झाले पाहिजे असा नियम होता. व्यत्यय आलेल्या सामन्यांमध्ये प्रत्येक षटकासाठी 4 मिनीट 15 सेकंद अशा हिशेबाने वेळ कमी करता येत होता. आता नव्या नियमानुसार 20 वे षटक हे 90 मिनिटांच्या आत संपायला हवे.

नव्या नियमाने तिसरे पंच हे शाॕर्ट रन बाबतचा मैदानातील पंचांचा निर्णय बदलू शकणार आहेत. ते स्वतःच याबाबतची पडताळणी करु शकणार आहेत. आतापर्यंत मैदानातील पंचांनी याबाबतचा सिग्नल तिसऱ्या पंचांना दिल्यावरच ते शाॕर्ट रनबाबत निर्णय घेऊ शकत होते. नो बाॕलबाबतही तिसऱ्या पंचांना असा अधिकार देण्यात आला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button