पानसरे, दाभोलकर हत्यांचा तपास केव्हा तरी संपायलाच हवा

Mumbai HC - CBI- Maharastra Today
  • हायकोर्टाची ‘सीबीआय’, ‘एसआयटी’वर नाराजी

मुंबई : कम्युनिस्ट नेते गोविंद पानसरे व अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या सात वर्षांपूर्वी झालेल्या हत्यांचा तपास केव्हा तरी संपायलाच हवा, अशी रास्त अपेक्षा व्यक्त करत मुंबई उच्च न्यायालयाने हा तपास अद्याप न संपल्याबद्दल अनुक्रमे ‘सीबीआय’ व महाराष्ट्र पोलिसांची ‘एसआयटी’ यांच्या संथगती कामाबद्दल पुन्हा एकदा नाराजी व्यक्त केली.

पानसरे आणि दाभोलकर यांच्या कुटुंबीयांनी केलेल्या याचिकांवर झालेल्या सुनावणीच्या वेळी न्या. संभाजी शिवाजी शिंदे व न्या. मनीष  पितळे यांच्या खंडपीठाने तपास केव्हा पूर्ण होणार याचे काही तरी सकारात्कमक उत्तर ‘सीबाआय’ व ‘एसआयटी’ने ३० मार्चंपर्यंत द्यावे, असे निर्देश दिले.

न्या. शिंदे या तपासी संस्थांना म्हणाले, केव्हा तरी तपास पूर्ण व्हायला हवाच. या हत्या २०१३ मधील आहेत व आता आपण २०२१ मध्ये आहोत. कर्नाटकात यानंतर २०१७ मध्ये झालेल्या पत्रकार गौरी लंकेश यांच्या खुनाचा खटला तेथे सुरू झाला आहे; पण आपल्या येथे अद्याप तपास पूर्ण झालेला नाही, याने आम्ही नक्कीच व्यथित  आहोत. न्या. शिंदे पुढे म्हणाले की, आम्हाला कोणालाही दूषण द्यायचे नाही. पण अशा संवेदनशील प्रकरणांचा तपास संपणार केव्हा हे लोकांना कळायला हवे.

महाराष्ट्रात दाभोलकर यांची हत्या २० ऑगस्ट, २०१३ रोजी तर पानसरे यांची हत्या २० फेब्रुवारी, २०१५ रोजी झाली होती. तर कर्नाटकात ख्यातनाम भाषातज्ज्ञ एम. एम. कलबुर्गी यांची हत्या ३० ऑगस्ट, २०१५ तर  पत्रकार गौरी लंकेश यांची हत्या ५ सप्टेंबर, २०१७ रोजी झाली होती. या चारही हत्यांमध्ये सामायिक दुवा आहे व त्यासाठी वापरले गेलेले पिस्तूलही एकच होते, असा दावा महाराष्ट्र ‘एटीएस’ने मध्यंतरी केला होता.

दाभोलकर हत्येचा तपास ‘सीबीआय’ करत आहे तर पानसरे हत्येचा तपास ‘एसआयटी’ करत आहे. ‘सीबीआय’ने पाच आरोपींना अटक करून तीन आरोपपत्रे दाखल केली आहेत. पण त्यांचा तपास संपलेला नाही. पानसरे प्रकरणात ‘एसआयटी’च्या हाती अद्याप काहीच लागलेले नाही.

दाभोलकर व पानसरे कुटुंबीयांच्यावतीने  अ‍ॅड. अभय नेवगी यांनी कर्नाटकात गौरी लंकेश हत्याप्रकरणात खटला सुरू  होऊनही महाराष्ट्रात खासकरून पानसरे प्रकरणात काहीच प्रगती होऊ नये याविषयी नापसंती व्यक्त केली. अतिरिक्त सॉलिसिटर जनरल अनिल सिंग यांनी दाभोलकर तपासातील प्रगतीची माहिती दिली.

अजित गोगटे

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER