राष्ट्रवादी नेत्यांच्या हस्तक्षेपाने कोल्हापुरातील अधिष्ठाता बदली रखडली

Kolhapur

कोल्हापूर : कोल्हापूरच्या राजर्षी शाहू शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठाता पदावर डॉ. जयप्रकाश रामानंद झालेली बदली अचानक थांबवली आहे. कोल्हापुरातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका बड्या नेत्याने केलेल्या हस्तक्षेपामुळे आरोग्य विभागातील बदल्यांना ब्रेक लागला आहे. या बदली प्रकरणावरून आता जिल्ह्यातील काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या दोन बड्या नेत्यांमध्ये शक्तिप्रदर्शन टीपेला पोहोचू पाहते आहे. या शक्तिप्रदर्शनात कोण बाजी मारतो, यावर कोल्हापूरच्या राजर्षी शाहू शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठाता पदाचा निकाल अवलंबून असणार आहे.

आरोग्य विभागाने शुक्रवारी कोल्हापूर, जळगाव आणि धुळे या तीन शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांच्या अधिष्ठातांच्या नियुक्तीचे आदेश काढले होते. यानुसार संचालकांनी डॉ. जयप्रकाश रामानंद, डॉ. पल्लवी सापळे व डॉ. मीनाक्षी गजभिये यांना आपल्या पदाचा कार्यभार वरीष्ठ प्राध्यापकाकडे सुपूर्द करून तातडीने शनिवारी (ता.23) नव्या नियुक्तीच्या जागी म्हणजेच अनुक्रमे कोल्हापूर, धुळे व जळगाव या ठिकाणी हजर व्हावे, अशा सूचना दिल्या होत्या.

प्रत्यक्षात यापैकी डॉ. पल्लवी सापळे यांनी शनिवारी दुपारी धुळे येथील भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठातापदाची सूत्रे स्विकारली.

परंतु कोल्हापूरच्या राजकीय नेत्याच्या हस्तक्षेपाने कोल्हापूर व जळगाव येथील पदभार स्विकारण्यास खो बसल्याची चर्चा राज्याच्या वैद्यकीय शिक्षण वर्तुळात आहे. यापैकी डॉ. जयप्रकाश रामानंद हे कोल्हापुरला पदभार स्विकारण्यासाठी शुक्रवारी निघाल्याची वार्ताही रात्री थडकली. ते शनिवारी सकाळी आपल्या पदाची सूत्रे स्विकारणार असल्याचे सांगण्यात आले. प्रत्यक्षात मात्र डॉ. मिनाक्षी गजभिये यांनी कोल्हापुरच्या अधिष्ठाता पदाचा पदभार सोडला नाही आणि डॉ. रामानंदही कोल्हापूर हजर होऊ शकले नाहीत. याविषयी तर्क-वितर्कांना कोल्हापुरात उधाण आले आहे. वैद्यकीय क्षेत्रातील अनागोंदी कारभाराबाबत सोशल मिडियावर चर्चा आहे.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER