भागीदारांमधील वादात निवाडा करण्याचा अधिकार चार्टर्ड अकाऊन्टंट संस्थेस नाही

kerla High Court - Maharastra Today
kerla High Court - Maharastra Today
  • केरळ उच्च न्यायालयाचा महत्वपूर्ण निकाल

एर्णाकुलम : एकाहून अधिक चार्टर्ड अकाऊन्टंटनी एकत्र येऊन चार्टर्ड अकाऊन्टन्सीचा व्यवसाय करण्यासाठी स्थापन केलेल्या भागीदारी संस्थेत (Partnership Firm) निर्माण होणार्‍या वादांचा निवाडा करण्याचा अधिकार ‘इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाऊन्टन्टस ऑफ इंडिया’ला (ICAI) नाही, असा महत्वपूर्ण निकाल केरळ उच्च न्यायालयाने दिला आहे.

न्यायालयाने म्हटले की, भागिदारीने व्यवसाय करणारे चार्टर्ड अकाऊन्टंट ‘आयसीएआय’चे सदस्य असले व त्यांची नोंदणी त्या संस्थेकडे झालेली असली तरी त्यांच्या भागिदारी संस्थेला १९३२ चा ‘इंडियन पार्टनरशिप अ‍ॅक्ट’ हा कायदा लागू होतो व त्या भागिदारी संस्थेतील वादांचा निवाडा फक्त त्याच कायद्यानुसार केला जाऊ शकतो. आपले सदस्य असलेल्या चार्टर्ड अकाऊन्टंटमध्ये भागिदारीवरून निर्माण होणारे वाद आपल्यामार्फत सोडविण्याचे प्रयत्न करण्यासाठी पर्यायी व्यवस्था उभी करण्याचा संस्थेचा इरादा कितीही स्तुत्य असला तरी या वादाचा निवाडा होईपर्यंत संस्था सदस्य चार्टर्ड अकाऊन्टटच्या व्यवसाय करण्याच्या स्वातंत्र्यावर बंधने आणू शकत नाही.

न्यायालयाने असेही म्हटले की,  चार्टर्ड अकाऊन्टट्सच्या भागीदारी संस्थांच्या बाबतीत ‘आयसीएआय’चे अधिकार फक्त अशा संस्थांच्या व्यावसायिक नावांना मंजुरी देणे, त्यांची नोंदणी करणे व त्यांच्या रचनेत वेळोवेळी होणाºया बदलांची नोंद ठेवणे एवढ्यापुरतेच मर्यादित आहेत. ती संस्था भागीदारी संस्था म्हणून कशी चालते याच्याशी ‘आयसीएआय’चा काहीही संबंध नाही.

एर्णाकुलम येथील एक चार्टर्ड अकाऊन्टंट जोशी जॉन यांनी केलेली याचिका मंजूर करताना न्या. एन. नागरेश यांनी हा निकाल दिला. कोझिकोड येथील अनिता सी. शेणॉय, दुबई येथील पी. के. गिरिजा व जोशी जॉन यांनी चार्टर्ड अकाऊन्टन्सीचा व्यवसाय करण्यासाठी एर्णाकुलम येथे ‘आर. मेनन अ‍ॅण्ड असोशिएट्स’या नावाने भागीदारी संस्था सन २०१५ मध्ये सुरु केली. ही संस्था ‘भागिदारांची इच्छा असेपर्यंत’ (Partnership at Will) अशा कालावधीसाठी स्थापन झाली होती. सन २०१९ मध्ये ऑफिसच्या जागेवरून भागिदारांमध्ये वाद झाल्यावर जॉन यांनी भागिदारीमधून स्वत: बाहेर पडण्याची व भागीदारी  संस्था विसर्जित करण्याची नोटीस अन्य दोन भागिदारांना दिली. भागीदारी कायद्यानुसार ‘अ‍ॅट विल’ स्वरूपाची भागिदारी संस्था कोणाही भागिदाराने विसर्जनाची नोटीस दिली की त्या तारखेपासून विसर्जित होते. परंतु जॉन यांच्या अन्य दोन भागिदारांनी भागीदारी विसर्जित करण्यास विरोध केला. हवे तर जॉन यांनी भागिदारीतून निवृत्त व्हावे व त्यानंतर आम्ही ती पुढे चालवू, असे त्यांचे म्हणणे होते.

यानंतर जॉन यांनी ‘जोशी जॉन अ‍ॅण्ड असोशिएट्स’ या नावाची पूर्णपणे स्वत:च्या एकट्याच्या मालकीची नवी संस्था सुरु करून चार्टर्ड अकाऊन्टन्सीचा व्यवसाय करायचे ठरवले. परंतु जोपर्यंत जॉन यांची आधीची भागीदारी संस्था अन्य भागिदारांच्या संमतीने रीतसर विसर्जित होणार नाही तोपर्यंत त्यांच्या नव्या संस्थेची नोंदणी करण्यास व त्या संस्थेला व्यवसायाचा परवाना देण्यास ‘आयसीएआय’ने नकार दिला. न्यायालयाने ‘आयसीएआय’ची ही भूमिका व त्यासंदर्भात त्यांनी केलेले नियम चुकीचे ठरविले आणि जॉन यांच्या नव्या संस्थेची नोंदणी करून त्यांना व्यवसायाचा परवाना देण्याचा आदेश दिला.

अजित गोगटे

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button