‘तीरा’ला अखेर मिळाले ते इंजेक्शन

Teera Kamat
  • कोट्यवधींच्या दातृत्वाने वाचविले तिचे प्राण

मुंबई :- तीरा कामत (Teera Kamat) या सहा महिन्यांच्या बालिकेला झोलजेन्स्मा हे कोट्यवधी रुपयांचे इंजेक्शन अखेर देण्यात आले असून त्यामुळे स्पायनल मस्क्युलर अ‍ॅट्रोफी या दुर्धर रोगावर आता ती मात करणार अशी मोठी आशा निर्माण झाली आहे.

तीराला माहीमच्या पी. डी हिंदुजा हॉस्पिटलमध्ये ठेवण्यात आले आहे. गुरुवारी हे इंजेक्शन अमेरिकेतून रुग्णालयात पोहचले,  ते  देण्याचा परवाना हिंदुजा रुग्णालयाकडे आहे. शुक्रवारी ते  तीराला सलाईनमार्फत देण्यात आले. अजून एक दिवस तिला रुग्णालयात देखरेखीखाली ठेवण्यात येईल आणि शनिवारी तिला रुग्णालयातून डिस्चार्ज मिळणार असून, तिला घरी सोडण्यात येणार आहे. अशा पद्धतीने या आजारावर औषध मिळणारी तीरा मुंबईतील दुसरं मूल असून यापूर्वी अशाच स्वरूपाचे इंजेक्शन एका बाळाला महिन्यापूर्वीच याच रुग्णालयात देण्यात आलं आहे. देशात आतापर्यंत  ११ बाळांना हे इंजेक्शन देण्यात आले. हिंदुजा हॉस्पिटलमधील लहान मुलांच्या न्यूरॉलॉजिस्ट डॉ. निलू देसाई यांनी सांगितलं की,  तीराच्या प्रकृतीत सुधारणा होण्यासाठी निश्चितच काही काळ जाणार आहे. तोपर्यंत सध्या तिला काही दिवस तरी अजून पोर्टेबल व्हेंटिलेटरवर ठेवावे लागणार आहे.

तीराला झोलजेस्मा हे इंजेक्शना मिळावे यासाठी तब्बल १६ कोटी रुपये लोकवर्गणीतून जमा झाले. त्यासाठी तिच्या आईवडिलांनी सोशल मीडियावर भावनिक आवाहन केले होते आणि लोकांनी त्यास भरभरून प्रतिसाद दिला होता.

विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांना पत्र पाठवून झोलजेस्मावरील सहा कोटी रुपयांचा कर माफ करण्याची मागणी केली होती आणि पंतप्रधानांनी तसा निर्णय घेत मोठा दिलासा दिला होता.

अंधेरी येथे राहणाऱ्या प्रियांका आणि मिहीर या दांपत्याला, १४ ऑगस्ट २०२० रोजी मुलगी झाली. तिचा जन्म झाला त्यावेळी ती सर्वसाधारण मुलांसारखीच होती. गोंडस बाळ जेव्हा रुग्णालयातून घरी आले तोपर्यंत तिला काही त्रास नव्हता. आई वडिलांनी त्या बाळाचं नाव ठेवलं तीरा. मात्र, काही दिवसातच म्हणजे दोन आठवड्यनंतर तीरा दूध पिताना अस्वस्थ व्हायची, एकदा तिचा श्वास कोंडला गेला. त्यावेळी ही परिस्थिती पाहून त्यांनी तात्काळ लहान मुलांच्या डॉक्टरांचा सल्ला घ्यायचा ठरविले आणि सल्ला घेतल्यानंतर काही काळ विविध चाचण्या केल्यानंतर अखेर २४ ऑक्टोबर रोजी स्पायनल मस्क्युलर अ‍ॅस्ट्रॉफी (रटअ) या दुर्धर आजाराचे निदान झाले.या  आजारात व्यक्तीमध्ये प्रोटीन तयार करण्यासाठी जो जीन असणे अपेक्षित असते तो नसल्याचे आढळून आले. त्यामुळे मज्जातंतू आणि स्नायू बळकटीकरणाची प्रक्रिया  मंदावते. परिणामी अन्न गिळणे, श्वास घेणे, त्याशिवाय हालचाली करणे या सर्व गोष्टींवर बंधने येऊ लागतात आणि परिस्थिती गंभीर होत जाते. अशा या दुर्मिळ आजारांवर परदेशात खूप मोठ्या प्रमाणावर संशोधन सुरु आहे आणि अमेरिकेत या आजारासाठी काही औषधे हल्लीच उपलब्ध झाली आहेत. मात्र, ती औषधे प्रचंड महागडी असून ती उपचारपद्धती घेणे सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर असते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER