फडणवीसांनी दिलेली माहिती दिशाभूल करणारी; जयंत पाटील यांचा पलटवार

Devendra Fadnavis - Jayant Patil

मुंबई : मनसुख हिरेन (Mansukh Hiren) यांच्या हत्येप्रकरणीच्या तपासात एटीएसने चांगली प्रगती केली आहे. त्यांना अजून चार दिवसांचा अवधी मिळाला असता तर या प्रकरणाच्या मुळाशी पोहचण्यात नक्कीच यश आले असते. मात्र हा तपासही एटीएसकडून काढून घेण्यात आला आहे. त्यामुळे आता एनआयए (NIA) काय तपास करते हे पाहणे आवश्यक आहे. एनआयए तपासात मिळालेल्या धाग्यादोऱ्यांची माहिती मीडियाला देत होती. मात्र गेल्या १-२ दिवसांत मीडियाला फारसे ब्रिफिंग झालेले नाही. या प्रकरणात महाराष्ट्र सरकारची अपेक्षा हीच आहे की, अंबानी यांच्या घरासमोर गाडी कोणी ठेवली व मनसुख हिरेनची हत्या कोणी केली या मुद्द्यांबाबत लक्ष विचलीत न होता तपास यंत्रणेने काम केले पाहीजे, असे जलसंपदा मंत्री जयंत पाटील (Jayant Patil) यांनी स्पष्ट केले.

देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) रोज पत्रकार परिषद घेऊन या मुख्य प्रश्नाकडून जनतेचे लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न का करत आहेत, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. हा दहशतवादी कारवाई आणि राष्ट्रीय सुरक्षेचा प्रश्न असताना तपास योग्य आणि लवकर व्हायला हवा, हीच राज्य सरकारची मागणी आहे. याप्रकरणात कितीही मोठा अधिकारी असला तरी एनआयए त्याचा खरा चेहरा उघड केल्याशिवाय शांत बसणार नाही, या भाबड्या समजुतीने आम्ही आमचा तपास थांबवून एनआयएच्या तपासाची वाट बघतोय, असे जयंत पाटील म्हणाले.

देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या पत्रकार परिषदेत रश्मी शुक्ला यांचा अहवाल सादर केला त्यामध्ये गृहमंत्र्यांवर कोणताही आरोप करण्यात आलेला नाही वा त्यांच्या संभाषणाचा कुठेही उल्लेख करण्यात आलेला नाही. या अहवालात नमूद केलेल्या बहुतांश व्यक्ती या खासगी आहेत. त्यामुळे फडणवीस यांनी दिलेल्या ६.३ जीबी डेटामध्ये विशेष असे काही नाही नसल्याचे मत जयंत पाटील यांनी मांडले.

या अहवालात संदीप बिष्णोई (Sandeep Bishnoi) यांची बदली पोलीस आयुक्त, नवी मुंबई अशी होईल असे सांगण्यात आलेय, मात्र त्यांची बदली रेल्वे अप्पर पोलीस आयुक्त अशी झाली. संजय कुमार वर्मा यांची बदली ठाणे पोलीस आयुक्त होणार असे अहवालात म्हटले आहे परंतु त्यांची बदलीच झाली नाही. विनयकुमार चौबे यांची बदली पोलीस आयुक्त नागपूर किंवा पुणे होणार असे अहवालात नमूद होते, मात्र त्यांची बदली अप्पर पोलीस महासंचालक लाचलुचपत विभाग, मुंबई येथे झाली आहे. बी. के. सिंग यांची बदली पिंपरी-चिंचवडला नाही तर नवी मुंबईला झाली आहे. त्यामुळे अहवालात नमूद केल्याप्रमाणे फडणवीस यांनी जी उदाहरणे पत्रकार परिषदेत सांगितली ती चुकीची असल्याचे जयंत पाटील यांनी निदर्शनास आणले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER