भारतीय महिला प्रथमच खेळणार डे-नाईट कसोटी सामना

Indian Women's Cricket Team - BCCI

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) वार्षिक करारात पुरुष व महिला क्रिकेटपटूंना दिलेल्या रकमेतील प्रचंड तफावतीचा मुद्दा गरम असतानाच भारताच्या महिला क्रिकेट संघासाठी एक चांगली बातमी आली आहे. गेली सात वर्षे एकही कसोटी सामना न खेळलेल्या भारतीय महिलांना (India women cricket) यंदा दोन कसोटी सामने खेळायला मिळणार आहेत. त्यातील पहिला सामना 16 जूनपासून इंग्लंडमध्ये आणि दुसरा सामना 30 सप्टेंबरपासून आॕस्ट्रेलियातील पर्थ (Perth) येथे खेळला जाणार आहे आणि यापैकी पर्थ येथील सामना हा दिवस-रात्र (Day-Night) खेळला जाणार आहे हे विशेष!

भारतीय महिलांना आॕस्ट्रेलिया दौऱ्यात तीन वन डे आणि तीन टी-20 सामनेसुध्दा खेळायचे आहेत. भारतीय महिलांचा हा पहिलाच दिवस-रात्र कसोटी सामना असेल.बीसीसीआयचे सचिव जय शहा यांनी सामन्यांचा हा कार्यक्रम जाहीर केला. महिला क्रिकेटच्या प्रगतीसाठी आम्ही बांधील आहोत. मला हे कळविताना अतिशय आनंद होतोय की, बीसीसीआय वुमेन त्यांचा सर्वात पहिला डे-नाईट कसोटी सामना यंदा आॕस्ट्रेलियात खेळणार आहेत असे शहा यांनी आपल्या व्टिटर पोस्टमध्ये म्हटले आहे. भारतीय महिलांनी आॕस्ट्रेलियात 2006 पासून कसोटी सामना खेळलेला नाही.

पर्थ येथील डे-नाईट कसोटी सामना (Pink Ball Test) हा महिला क्रिकेटच्या इतिहासातील केवळ दुसराच डे-नाईट कसोटी सामना असेल. पहिला सामना नोव्हेंबर 2017 मध्ये सिडनी येथे आॕस्ट्रेलिया आणि इंग्लंडदरम्यान खेळला गेला होता. तो अनिर्णित राहिला होता.

आॕस्ट्रेलिया दौऱ्याचा कार्यक्रम

  • 19 सप्टेंबर – पहिला वन डे सामना (नाॕर्थ सिडनी ओव्हल- डे नाईट)
  • 22 सप्टेंबर- दुसरा वन डे सामना (जंक्शन ओव्हल)
  • 24 सप्टेंबर- तिसरा वन डे सामना (जंक्शन ओव्हल)
  • 30 सप्टेंबर ते 3 आॕक्टोबर- डे नाईट कसोटी सामना (पर्थ)
  • 7, 9 आणि 11 आॕक्टोबर- टी-20 सामने, नाॕर्थ सिडनी ओव्हल

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button