इंग्रजांच्या निर्बंधावर तोडगा काढत गॅरेजमध्ये सुरू झालेली भारतीय पेंट कंपनी बनली देशात नंबर वन!

Maharashtra Today

भारतीय स्वातंत्र्य आंदोलन शिगेला पोहचलं होतं. वर्ष १९४२. स्वातंत्र्य आज मिळेल की उद्या अशी परिस्थिती निर्माण झाली होती. आधुनिक भारताच्या इतिहासात नवा अध्याय सामाविष्ट होऊ पाहात होत होता. ‘सविनय कायदे भंग’ या नावानं. त्यावेळी एका लहानशा गॅरेजमध्ये एका रंग बनवणाऱ्या कंपनीचा (Indian paint company ) पाया रोवला गेला. चार मित्रांच्या या स्वप्नामुळं येत्या काळात भारतीय घरं आनंदानं रंगणार होती.

त्यावेळी इंग्रजांनी रंगाच्या आयातीवर निर्बंध घातले होते. लोकांकडे मर्यादित विकल्प होते. शालीमारसारखे अतिमहागडे रंग वापरून घरांची रंगरंगोटी शक्य नव्हती. अशाच मर्यादा एक नव्या विस्तारांना जन्म देत असतात. तेच झालं. इंग्रजांची मर्यादा भारतीय उद्योजकांच्या विस्ताराचं कारण बनली. चंपकलाल चोकसी, चिमनलाल चोकसी, सूर्यकांत दाणी आणि अरविंद वकील यांनी नव्या उद्योग व्यवसायाच्या क्षेत्रात ठाम पाऊल ठेवलं. आणि ‘एशियन ऑइल अँड पेंट  कंपनी प्रायव्हेट लिमिटेड’ या नावाच्या स्वप्नाला सत्यात उतरवण्यासाठी दिवसरात्र एक करण्याची त्यांनी शपथ घेतली.

हे जाणून तुम्हाला आश्चर्य होईल की, ७८ वर्षे जुन्या या कंपनीचं नाव एका टेलिफोन डायरेक्ट्रीतून घेतलं होतं. आज घडीला भारतात उपलब्ध असणाऱ्या एकूण रंगांपैकी ५३ टक्के पेंट्स एशियनचे आहेत. आशिया खंडातली ही तिसरी सर्वांत मोठी पेंट कंपनी आहे. जगभराततील १६ देशांमध्ये या कंपनीनं विस्तार केलाय. “प्रत्येक घर काही तरी सांगतंय” असं या कंपनीचं घोष वाक्य आहे. हजारो शेड्स, थीम आणि पॅटर्न त्यांच्याकडून बाजारात आणण्यात आलेत.

१९४५ ला सुरू झालेल्या या कंपनीच्या यशामागं एक सटीक रणनीती आहे. त्या वर्षी भारतात इतर कंपन्या फक्त टिनच्या डब्यातून मोठ्या प्रमाणात रंग विकायचे तेव्हा यावर तोडगा म्हणून एशियन पेंटनं छोट्या वितरकांसोबत करार केला.

१९५४ ला कंपनीनं आणखी एक पाऊल पुढं टाकत मार्केटिंगला सुरुवात केली. कंपनीच्या उद्देशाला सर्व भारतीयांनी पाहावं अशी त्यांची इच्छा होती. म्हणून सुप्रसिद्ध व्यंग्यचित्रकार आर. के. लक्ष्मण यांच्याकडून त्यांनी गट्टू (एशियनच्या डब्यावर आधीच्या काळात दिसणारं पात्र) बनवून घेतलं.

या पात्राचं नाव काय असावं हे ठरवण्यासाठी एशियननं त्या काळी मोठ्या स्पर्धेचं आयोजन केलं. देशभरातील लोकांनी यात सहभाग नोंदवला. त्यावेळी ५०० रुपये किमतीचं बक्षीस ठेवण्यात आलं. देशभरातून ४७ हजार जणांनी या स्पर्धेत सहभाग नोंदवला. मुंबईतल्या दोघांनी ‘गट्टू’ असं नावं सुचवलं आणि एशियन पेंट्सच्या पोस्टर बॉयचं नामकरण झालं.

गट्टू एशियनचा चेहरा बनला. मध्यमवर्गीयात त्यानं लोकप्रियता वाढवली आणि एशियनचा व्यवसाय तेजीत सुरू झाला. एशियननं स्वतःचा चाहता वर्ग निर्माण केला. लोकांची जीवनशैली आणि विचार बदलावेत असे अनेक संदेश एशियनच्या पोस्टर्सवरून दिले जायचे. या नव्या रणनीतीनं ही कमाल दाखवली. फक्त चार वर्षांच्या आत एशियन पेंट्सची विक्री दहा पटीनं वाढली.

कंपनी प्रचंड वेगात वाढत होती. भांडूपमध्ये कंपनीचा पहिला प्लांट उभारला. १९५७ ते १९६६च्या दरम्यान एशियननं चांगली प्रगती केली. १९६७ एशियन पेंटसाठी महत्त्वाचं वर्ष ठरलं. याच वर्षी कंपनीनं पहिली भारताबाहेरची फॅक्टरी सुरू केली. फिजी या देशात रंग उत्पादनाचं काम सुरू झालं आणि यानंतर एशियन पेंटच्या यशाचा आलेख चढताच राहिला.

असं मिळवलं यश
गुणवत्ता टिकवून ठेवण्यासाठी केलेले अथक प्रयत्न आणि बाजारातील ट्रेन्डसनुसार करण्यात आलेले बदल हे कंपनीच्या यशामागचं मोठं कारणं असल्याचं तेथील कर्मचारी सागंतात.

१९८४ ला एशियन पेंटची पहिली जाहिरात टीव्हीवर झळकली. ९० च्या दशकात कंपनीनं नव्या उत्पादनांना बाजारात आणलं. १९९८- ९९ मध्ये ग्राहकांच्या समस्या सोडवण्यासाठी त्यांनी वेबसाईटही सुरू केली. एशियन पेन्ट्सची वाटचाल इतर स्पर्धक कंपन्यांपेक्षा नेहमी दोन पावलं पुढं होती. आजच्या सोशल मीडियाच्या जमान्यात एशियन पेंट्स क्रिएटिव्ह पद्धतीने मार्केटिंग करतेय.

जगभरातून एशियन पेंटचा सन्मान करण्यात आलाय. फोर्ब्सच्या ‘बेस्ट अंडर बिलियन कंपनी इन द वर्ल्ड’ या यादीत एशियन पेंट्सला सहभागी करण्यात आलं होतं. भारतीय स्वातंत्र्याच्या आधी स्वतंत्र उद्योगाच्या प्रेरणेनं स्वदेशीच्या विचारानं सुरू झालेली कंपनी नव उद्योजक भारतीयांसाठी प्रेरणास्रोत आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER