शहरात आलेल्या नागरिकांमुळेच रुग्ण संख्येत वाढ – पोलिस आयुक्त चिरंजीव प्रसाद

Chiranjeev Prasad
  • उद्यापासून जिवनावश्यक वस्तू खरेदीसाठी पायी फिरा
  • सर्दी, खोकला, ताप आल्यावर दुस-यांशी संपर्क टाळा
  • आपापल्या परिसरात वस्तूंची खरेदी करा

औरंगाबाद : परगावाहून शहरात दाखल झालेल्या नागरिकांमुळेच रुग्ण संख्येत वाढ झाल्याचे ब-याच केसेसवरुन समोर आले आहे. कोरोनाची लक्षणे असताना देखील रुग्णाने उशीरा उपचार घेतले. तोपर्यंत त्याच्या संपर्कात आलेल्या नागरिकांना संसर्ग झाला होता. अशा ब-याच केसेस आतापर्यंत समोर आल्याचा दावा पोलिस आयुक्त चिरंजीव प्रसाद यांनी बुधवारी केला. तसेच उद्यापासून जिवनावश्यक वस्तू खरेदी करण्यासाठी नागरिकांनी वाहनांचा वापर करु नये, वस्तू खरेदी करण्यासाठी जाताना हातात पिशवी असावी. त्याचप्रमाणे तोंडाला मास्क लावणे आवश्यक आहे. तर सर्दी, खोकला व ताप असल्यास दुस-यांशी संपर्क टाळावा. असे आवाहनही त्यांनी केले.

शहरात मुंबई व इतर ठिकाणांहून दाखल झालेल्या संशयितांमुळेच रुग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे. राज्य राखीव बलाचे जवान मालेगावात बंदोबस्तासाठी गेले होते. तेथून परतलेल्या ७३ जवानांना कोरोनाची लागण झाल्याचे त्यांच्या वैद्यकीय तपासणीनंतर समोर आले. अशाच केसेस जयभीमनगर, भीमनगर, किलेअर्क, समतानगर, मुकुंदवाडीतील संजयनगर, रामनगर, पुंडलिकनगर या भागात घडल्याचे निदर्शनास आले आहे. संशयितांनी वेळीच उपचार घेतले नाही. त्यामुळे संसर्गाचा धोका वाढल्याचे पोलिस आयुक्तांनी सांगितले. पोलिस दलातील एक अधिकारी व बारा कर्मचा-यांना कोरोनाची लागण झाली. त्यापैकी एक निरीक्षक व कर्मचारी अशा पाच जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर सात जणांवर अजूनही उपचार सुरू आहेत. सुशिक्षीत नागरिकांकडून देखील चुका होत असल्याची आतापर्यंतची बरीच उदाहरणे आहेत. कोरोनाची लक्षणे दिसून आल्यास नागरिकांनी तात्काळ डॉक्टरांशी संपर्क साधावा. एक पोलिस नाईक २२ मे पासून आजारी होता. त्यांना पोलिसांनी ताबडतोब रुग्णालयात दाखल केले. अनेक जण सर्दी, खोकला व ताप असूनही नागरिकांशी संपर्क साधत आहेत. तेव्हा अशा रुग्णांनी जास्तीत जास्त नागरिकांशी संपर्क टाळावा. त्यात वयोवृध्दांनी जास्तीत जास्त काळजी घेणे महत्त्वाचे आहे.

होम क्वारंटाईनवर नागरिकांवर गुन्हे….
होम क्वारंटाईन करण्यासाठी पोलिस दलाच्या वतीने पाचशे स्टिकर छापण्यात आले आहेत. तसेच शिक्का देखील मारला जात आहे. असे असताना देखील होम क्वारंटाईन असलेले नागरिक बाहेर का पडत आहेत. अशा नऊ जणांविरुध्द आतापर्यंत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नागरिकांनी जागरुक राहण्याची आवश्यकता आहे. ज्या नागरिकांच्या परिसरात कोरोनाचा रुग्ण आढळला आहे. त्यांनी त्या रुग्णापासून सावध राहत त्याला बाहेर फिरण्यास मज्जाव करायला हवा. कोरोनाचा धोका सध्या तरी टळलेला नाही हे नागरिकांनी ओळखायला हवे. त्यासाठी नागरिकांनी जास्तीत जास्त काळजी घ्यायला हवी असेही पोलिस आयुक्त प्रसाद म्हणाले.

जिवनावश्यक वस्तूंसाठी पायी फिरा……
जिवनावश्यक वस्तू खरेदी करण्यासाठी नागरिकांनी पायीच फिरावे. दुचाकीचा वापर त्यांनी टाळावा. काही नागरिक एका परिसरातून दुरच्या परिसरात खरेदी करण्यासाठी जात आहेत. जेव्हा की प्रत्येक ठिकाणी जिवनावश्यक वस्तूंची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. उद्यापासून नागरिकांनी राहत असलेल्या परिसरातच पायी जाऊन वस्तूंची खरेदी करावी, त्यासोबतच तोंडाला मास्क लावणे आवश्यक आहे. अन्यथा त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल असेही आयुक्त म्हणाले.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER