डोनाल्ड ट्रम्प यांच्याविरोधात महाभियोगाची कारवाई; स्वकियांचेही महाभियोगाचं समर्थन

नवी दिल्ली: अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांना पडत्या काळात मोठ्या विरोधाचा सामना करावा लागत आहे. डोनाल्ड ट्रम्प यांच्याविरोधात अमेरिकन संसदेने महाभियोगाची कारवाई सुरू केली आहे. ट्रम्प यांच्या विरोधात महाभियोगाची कारवाई करता यावी म्हणून संसदेच्या कनिष्ठ सभागृहात (हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटीव्ह) मतदान झालं.’एनबीसी न्यूज’च्या वृत्तानुसार ट्रम्प यांच्याविरोधात महाभियोग चालवण्याच्या बाजूने डेमोक्रॅटच्या 222 तर रिपब्लिकन पक्षाच्या 10 खासदारांनी मतदान केलं. अमेरिकेन घटनेनुसार महाभियोग चालवण्यासाठी 218 मतांची गरज असून त्यापेक्षा जास्त मते पडली आहेत. त्यामुळे ट्रम्प यांच्याविरोधात महाभियोग चालवण्याचा प्रस्ताव मंजूर झाला आहे. महाभियोग प्रस्ताव मंजूर झाल्याने ट्रम्प हे दुसऱ्यांदा महाभियोगाचा सामना करणारे पहिलेच अमेरिकन राष्ट्रपती ठरले आहेत.

मावळते राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर त्यांच्या समर्थकांना चिथावणी देण्याचा आरोप आहे. त्यांनी चिथावल्यामुळेच अमेरिकेच्या संसद परिसरात त्यांच्या समर्थकांनी हल्ला केला होता. त्यामुळे पाच लोकांचा मृत्यू झाला होता. या हल्ल्यामुळे अमेरिकेची संपूर्ण जगात नाचक्की झाली होती. तसेच ट्रम्प यांच्याविरोधात अमेरिकेत प्रचंड संतापाची लाट उसळली होती. या पार्श्वभूमीवर ट्रम्प यांच्याविरोधात महाभियोग चालवण्यात येत आहे. त्यामुळे अमेरिकेच्या इतिहासात तो दिवस काळा दिवस ठरला आहे. महाभियोगासाठी एकूण 218 मतांची आवश्यकता असते. पण ट्रम्प यांच्याविरोधात आणि महाभियोग प्रस्तावाच्या समर्थनात एकूण 232 मतं पडली. तर महाभियोग प्रस्तावाला विरोध करण्यासाठी 197 मतदारांनी मतदान केलं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER