25 नोव्हेंबरने केलेय फूटबॉलचे अपरिमीत नुकसान

Football

दिएगो मॕराडोना (Diego Maradona) गेला..आपल्या कोट्यवधी चाहत्यांचा निरोप घेण्यासाठी त्याने 25 नोव्हेंबर ही तारीख निवडली आणि या तारखेचा एक दुर्देवी योगायोग मॕराडोनाच्या आयुष्यात घडून आला. त्याचे प्रेरणास्थान आणि त्याचे आधारस्तंभ, योगायोगाने दोघींना त्याने 25 नोव्हेंबर रोजीच गमावले होते.

दिएगो मॕराडोनाचे प्रेरणास्थान म्हणजे नाॕदर्न आयर्लंड व मँचेस्टर युनायटेडचे ( Manchester United) दिग्गज खेळाडू जाॕर्ज बेस्ट (George Best). त्यांनी 25 नोव्हेंबर 2005 रोजी जगाचा निरोप घेतला त्यावेळी त्यांचे वय होते 59 वर्षे आणि आता त्याच तारखेला मॕराडोना त्यांच्या भेटीला गेलाय तेंव्हा त्याचे वय होते 60 वर्षे.

दुर्देवी समानता इथेच थांबत नाही तर दोघांचाही व्यसनांचा आणि आजारांचा इतिहास. मॕराडोना फारच कमी वयात कोकेनच्या आहारी गेला. पुढे ड्रग्जही घेऊ लागला. कोकेनपायी 1991 मध्ये 15 महिने बंदीची शिक्षा भोगली तर इफेड्रीन नावाचे ड्रग आढळून आल्याने 1994 ची विश्वचषक स्पर्धा अर्धवट सोडून द्यावी लागली. मद्यपानाचे व्यसन तर होतेच. साहजिकच आजारांनी घेरले. वजन खूप वाढले. वारंवार उपचार करावे लागले. 2004 व 2005 मध्ये गंभीर शस्त्रक्रिया कराव्या लागल्या. 2005 मध्ये तर मॕराडोना कृत्रिम श्वासोश्वासावर होता. आतासुध्दा मेंदुत रक्त साकोळल्याने 3 नोव्हेंबरला शस्त्रक्रिया करण्यात आली होती. त्यातुन तो सावरत होता पण अल्कोहोलच्या व्सनमुक्तीच्या प्रयत्नात त्याला त्रास होऊ लागला आणि 25 रोजी हृदयगती थांबल्याने त्याने अखेरचा श्वास घेतला.

जाॕर्ज बेस्ट..विश्वचषक खेळू न शकलेला सर्वोत्तम फूटबॉलपटूचाही व्यसनांनी घात केला. यकृत प्रत्यारोपण झालेले..त्यानंतरही मद्यपान सुरुच होते. परिणाम व्हायचा तोच झाला. 3 आॕक्टोबर 2005 रोजी लंडनच्या क्रॉमवेल दवाखान्यात उपचार सुरु झाले. किडनी इन्फेक्शन होते. रोपण केलेले यकृत शरीर स्विकारत नव्हते. 27 अॉक्टोबर रोजी बेस्ट गंभीर असल्याची बातमी पसरली. स्वतः बेस्टनेसुध्दा चाहत्यांना निरोपाचा संदेश दिला. 20 नोव्हेंबर 2005 रोजी जाॕर्ज बेस्टच्या विनंतीवरुनच ‘न्यूज आॕफ दी वर्ल्ड’ने जाॕर्ज बेस्टचा फोटो प्रसिध्द केला. त्यासोबत या महान खेळाडूने 59 वर्षे वयात संदेश दिला…डोंट डाय लाईक मी! अल्कोहोलचे धोके त्याने अधोरेखीत केले होते. आणि 25 नोव्हेंबरला फफ्फुसात संसर्ग झाल्याने आणि इतर अवयव काम करेनासे झाल्यावर जॉर्ज बेस्टने जगाचा निरोप घेतला.

त्यांना श्रध्दांजली वाहताना मॕराडोनाने म्हटले होतै, ‘ मी तरुण असताना जाॕर्ज माझे प्रेरणास्थान होते. त्यांचे आकर्षण होते आणि सहकाऱ्यांचे ते प्रेरणास्रोत होते. जादुई क्षण आणू शकणारे आम्ही दोघेही एकाच शैलीचे खेळाडू होतो म्हणजे ड्रिबलर होतो.

असे आपले प्रेरणास्थान 25 नोव्हेंबरला गमावल्यावर याच तारखेने मॕराडोनावर पुन्हा आघात केला 2016 मध्ये. यावेळी 25 नोव्हेंबरने त्याचे आधारस्तंभ म्हणजे क्युबाचे राष्ट्राध्यक्ष फिडेल कॕस्ट्रो यांना हिरावून नेले. कॕस्ट्रो यांना मॕराडोना अक्षरशः पित्यासमान मानायचा कारण निवृत्तीनंतर जेंव्हा त्याची प्रकृती ढासळली, परिस्थिती गंभीर बनली, महागड्या व किचकट उपचारांची गरज निर्माण झाली त्यावेळी त्याचा देश अर्जेंटिनातुन दुर्लक्ष झाले पण कॕस्ट्रो यांनी त्याला क्युबाचे दरवाजे उघडून दिले, आणि ला पेड्रेरा क्लिनीकमध्ये उपचार केले.

फिडेल कॕस्ट्रो हे बेसबाॕलचे फॕन असले तरी 1986 च्या विश्वविजयानंतर मॕराडोना पहिल्यांदा क्युबामध्ये गेला त्यावेळी त्यांची मैत्री झाली. कॕस्ट्रोंच्या लढ्याने मॕराडोना फार प्रभावीत झाला आणि तो त्यांना भेटायला जाऊ लागला.प्रत्येकवेळी आपली 10 नंबरची जर्सी ही गिफ्ट म्हणून ठरलेलीच. तर अशाप्रकारे मॕराडोना हा कॕस्ट्रो यांचा मानसपूत्र बनला.

25 नोव्हेंबरने फूटबॉलला एवढीच झळ पोहचवलेली नाही तर आणखी एक फूटबॉलपटू याच दिवशी हिरावुन नेला आहे. तो खेळाडू म्हणजे मँचेस्टर युनायटेडचे फूटबॉलपटू विल्यम फोकस्. 1958 मध्ये मँचेस्टर युनायटेडच्या संघाला घेऊन जाणाऱ्या विमानाला म्युनीक येथे झालेल्या अपघातात 44 पैकी 20 प्रवासी दगावले होते पण फोक्स सुदैवाने वाचले होते. मँचेस्टर युनायटेडसाठी तब्बल 688 सामने खेळलेल्या या सेंटर हाफ खेळाडूचे वयाच्या 81 व्या वर्षी निधन झाले ती तारीख होती 25 नोव्हेंबर 2013. या प्रकारे 25 नोव्हेंबरने जाॕर्ज बेस्ट, बिल फोक्स आणि दिएगो मॕराडौना या तीन महान फूटबॉलपटू आणि फिडेल कॕस्ट्रोंसारख्या लढवय्या नेत्याची आयुष्याची खेळी संपवली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER