
अहमदनगर : कोरोनाच्या (Corona) पार्श्वभूमीवर कोरोनाबाधित रुग्णांकडून जास्त पैसे उकळणाऱ्या हॉस्पिटलला (Hospital) अखेर जिल्हा प्रशासनाने जोरदार दणका दिला आहे. रुग्णांकडून घेतलेली आठ लाख रुपयांची रक्कम अखेर सुरभी हॉस्पिटलने परत केली आहे. त्यामुळे मनसेने बॅनर दाखविण्याऐवजी राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांची भेट घेऊन निवेदन देण्याचा निर्णय घेतला आहे. सुरभी हॉस्पिटलच्या विस्तारित इमारतीच्या उद्घाटनासाठी रविवारी शरद पवार नगरमध्ये येणार आहेत.
नगरमध्ये सुरभीसह अनेक हॉस्पिटलने कोरोना काळात रुग्णांना अधिक बिले आकारली, असा ठपका ठेवण्यात आला होता. रुग्णांना हे पैसे परत मिळावे यासाठी शरद पवार यांच्या दौऱ्यात फलक झळकवण्याचा इशारा मनसेने दिला होता. यासंदर्भात जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भोसले यांच्या उपस्थितीत बैठक झाली. या बैठकीत सुरभी हॉस्पिटलने रुग्णांचे पैसे परत केले असल्याच्या पावत्या प्रशासनास दाखविल्या आहेत.
सुरभी हॉस्पिटलचे आणखी काही पैसे बाकी असून तो वाद न्यायप्रविष्ट असल्याचे बैठकीत सांगण्यात आले. अन्य रुग्णालयांनी सात दिवसांत पैसे परत करावे; अन्यथा परवाने रद्द केले जातील, असा इशारा प्रशासनाने दिला आहे.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला