केंद्राकडून वैद्यकीय सामग्रीचा महाराष्ट्राला सर्वाधिक पुरवठा, दुजाभाव नाही – रामदास आठवले

Ramdas Athawale

मुंबई : ‘मुंबई (Mumbai) शहराला देशाची आर्थिक राजधानी म्हणून ओळख आहे. कोरोना काळात महाराष्ट्राला अधिक मदत मिळाली पाहिजे ही सर्वांचीच मागणी आहे. केंद्र सरकारने महाराष्ट्राला ऑक्सिजन (Oxygen), लस (Vaccination) आणि रेमडेसिवीर (Remdesivir) इंजेक्शनचा इतर राज्यांच्या तुलनेत सर्वाधिक पुरवठा केला आहे. केंद्राने कधीही महाराष्ट्राशी दुजाभाव केला नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदींचे (PM Narendra Modi) महाराष्ट्राकडे लक्ष आहे, असे मत रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले (Ramdas Athawale) यांनी व्यक्त केले आहे.

महाराष्ट्रात कोरोनाचा (Corona) प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे. ही वेळ आरोप-प्रत्यारोप करण्याची नाही. केंद्रावर आरोप करण्यापेक्षा रुग्णांचे जीव कसे वाचवता येईल याकडे लक्ष घालण्याची गरज आहे. महाराष्ट्र सरकारच्या सर्व मंत्र्यांनी कोरोना रुग्ण वाचविण्याकडे, कोरोनाची लाट रोखण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. रुग्णांना बेड मिळत नाही, ऑक्सिजन मिळत नाही, रेमडेसिवीर इंजेक्शन मिळत नाही त्याकडे लक्ष घालावे. उगाच केंद्र सरकारकडे बोट दाखवून, आरोप करून आपले पाप झाकू शकत नाही, असा टोला आठवले यांनी राज्य सरकारला लगावला. मागील वर्षी महाराष्ट्रात कोविड सेंटर उभारण्यात आले होते.

यंदा कोरोना रुग्णांसाठी राज्य सरकारने योग्य नियोजन केले नाही. त्यामुळे राज्यात अनेक रुग्णांचे मृत्यू झाले आहेत. यास कोण जबाबदार, असा प्रश्न रामदास आठवले यांनी राज्य सरकारला विचारला आहे. केवळ केंद्र सरकारवर आरोप करण्यापेक्षा रुग्णांचे जीव वाचविण्याकडे लक्ष द्यावे, असा मोलाचा सल्ला आठवले यांनी राज्य सरकारला दिला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button