तिघींचा खून करणार्‍या आरोपीची जन्मठेप हायकोर्टाने केली कायम

Bombay HC - Maharashtra Today
  • परिस्थितीजन्य पुराव्याने गुन्हा झाला सिद्ध

मुंबई : रायगड जिल्ह्याच्या पेण तालुक्यातील मालदेव शेडाशी या गावातील लीलाबाई बापू सावंत ही महिला व मनिषा आणि पूनम या तिच्या दोन मुलींचा सहा वर्षांपूर्वी खून करणार्‍या अशोक धोंडिराम ढवळे या आरोपीची जन्मठेप उच्च न्यायालयाने कायम केली.

या तीन खुनांबद्दल अशोकला रायगड सत्र न्यायालयाने जून २०१८मध्ये जन्मठेप ठोठावली होती. त्याविरुद्ध त्याने केलेले अपील न्या. साधना जाधव व न्या. एन. आर. बोरकर यांच्या खंडपीठाने फेटाळले आणि त्याची जन्मठेप कायम केली. कोरोनाच्या साथीमुळे अन्य कैद्यांप्रमाणे अशोकलाही तातडीच्या जामिनावर किंवा पॅरॉलवर सोडले असेल तर त्याने शिक्षा भोगण्यासाठी पुढील आठ आठवड्यांत रायगड सत्र न्यायालयापुढे हजर व्हावे, असा आदेशही खंडपीठाने दिला.

खालापूर येथील पायोनियर कंपनीत नोकरी करणारा अशोक हाही मालदेव शेडाशी याच गावचा रहिवासी होता. मनिषा हिच्याशी त्याचे प्रेम प्रकरण होते. पण गावकºयांना ते पसंत नसल्याने त्याला गावातून हाकलून देण्यात आले होते. अशोकने या तिघींचे खून नेमके कधी व कसे केले हे निकालपत्रातील तपशीलावरून स्पष्ट होत नाही. परंतु  त्याने दिलेल्या  माहितीवरून पोलिसांनी तिघींचे मृतदेह, हमरत्यापासून सुमारे दोन किमी आत आडवाटेला रघुवीर टेकडीजवळच्या झुडपांमध्ये २४ एप्रिल, २०१५ रोजी हस्तगत केले होते. सापडले तेव्हा तिन्ही मृतदेह ओळखही पटणार नाही एवढे सडलेले होते. त्यावरून तिघींचा मृत्यू त्याआधी कित्येक आठवड्यांपूर्वी निरनिराळया वेळी झाला असावा असा निष्कर्ष काढला गेला. ‘डीएनए’ चाचणीवरून ते मृतदेह लीलाबाई, मनिषा व पूनम यांचेच असल्याचे सिद्ध झाले होते.

हा खटला पूर्णपणे परिस्थितीजन्य पुराव्यांवर आधारित होता. एकवेळ साक्षीदार खोटं बोलतील, पण घटना नेहमी सत्यच सांगत असतात, असे नमूद करून खंडपीठाने म्हटले की, या खटल्यात परिस्थितीजन्य पुराव्यांची साखळी एवढी मजबूत आहे की, हे खून आरोपी अशोकनेच केले याशिवाय दुसरा कोणताही निष्कर्ष त्यातून निघू शकत नाही.

न्यायालयाने म्हटले की, मृतदेह जेथे सापडले ते ठिकाण फक्त पायवाटेने जाता येईल, असे अडचणीचे होते. आरोपी अशोक त्या परिसरातील रहिवासी नसूनही त्याने पोलिसांना नेमके तेथे नेऊन मृतदेह दाखविले या त्याच्या विरुद्धचा सर्वात प्रबळ पुरावा आहे. शिवाय मृतदेहांजवळ त्याचे पैशाचे पाकीट व त्यातील त्याची ओळखपत्रे सापडणे, लीलाबाईचा मोबाईल फोन व मनिषाचे सोन्याचे लॉकेट तसेच मनिषाने त्याला लिहिलेले प्रेमपत्र त्याच्याकडे सापडणे या घटनाही गुन्हेगार तोच आहे याकडे इंगित करतात.

लीलाबाई ९ फेब्रुवारी, २०१५ रोजी मालशेड गावी एका बारशाला गेल्या होत्या व त्यानंतर घरी परत आल्या नव्हत्या. त्यांची लग्न झालेली मोठी मुलगी दीपाली शिंदे त्यांच्या मोबाईलवर सतत फोन करत होती. पण फोन बंद होता. दीपालीने मालदेव येथे माहेरी येऊन व नंतर लीलाबाईंच्या माहेरी जाऊन चौकशी केली. पण त्यांचा पत्ता लागला नाही. २७ मार्च, २०१५ रोजी दीपालीला लीलाबाईंच्या मोबाईल फोनवरून अचानक फोन आला. फोनवर कोणी अनोळखी इसम बोलत होता. तिची आई व बहीण अत्यवस्थ असून त्यांना ऑक्सिजनवर ठेवले आहे, असे त्या इसमाने दीपालीला सांगितले. पुन्हा अर्ध्या तासाने फोन करीन असे तो इसम म्हणाला, पण त्याने फोन केला नाही.

त्यानंतर १ एप्रिल, २०१५ रोजी पुन्हा त्याच अनोळखी इसमाने लीलाबाईंच्या मोबाईल फोनवरून फोन केला. फोवर बोलणाºया इसमाने दीपालीला आईशी बोलू दिले नाही. पण आईला भेटायचे असेल तर अकल्पे गावी एकटीच ये. तेथे माझा माणूस तुला न्यायला येईल, असे त्या अनोळखी इसमाने सांगितले.

दीपालीने फोनवर झालेले हे बोलणे सासू-सासºयांना सांगितले व त्यांच्या सूचनेवरून लीलाबाई बेपत्ता असल्याची फिर्याद पेणे पोलीस ठाण्यात नोंदविली. दरम्यान, मालदेव येथे माहेरी आली असता अशोक ढवळे व मनिषा यांच्या प्रेम प्रकरणाची व त्यावरून अशोकला गावकºयांनी गावातून हाकलून दिल्याची माहिती तिचा चुलत भाऊ सचिन सावंत याने दीपालीला दिली होती. त्यावरून तिने पोलिसांकडे अशोकविषयी संशय व्यक्त केला. पोलिसांनी अशोकला अटक केली आणि त्यानंतर घडलेल्या घटनांतून तिन्ही खुनांचा उगडा झाला.

अजित गोगटे

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button