नॉयलॉन मांज्याच्या बेकायदा विक्रीची हायकोर्टाने स्वत:हून घेतली गंभीर दखल

  • विक्रेते व नागरिकांवर कडक कारवाईचे दिले आदेश

औरंगाबाद : पतंग उडविण्यासाठी वापरलेला नॉयलॉन मांज्याने गळा कापून नाशिक येथे एका महिलेचा झालेला मृत्यू व आकाशात उडणार्‍या पक्ष्यांना या मांज्यामुळे होणारी प्राणघातक इजा याची उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद (Aurangabad) खंडपीठाने स्वत:हून गंभीर दखल घेतली असून या मांज्याची विक्री करणारे दुकानदार व तो वापरणारे नागरिक यांच्यावर तत्परतेने कठोर करवाई करण्याचा आदेश सरकार व पोलिसांना दिला आहे.

या संबंधी वृत्तपत्रांमध्ये प्रसिद्ध झालेल्या बातम्यांची दखल घेत न्या. रवींद्र घुगे व न्या. विभा कंकणवाडी यांच्या खंडपीठाने हा विषय जनहित याचिका (Suo Mottu PIL) म्हणून स्वत:हून हाती घेतला. खंडपीठाने अ‍ॅड. सत्यजीत बोरा यांची या प्रकरणी ‘अ‍ॅमायकस क्युरी’ म्हणून नेमणूक केली. बोरा यांनी रीतसर याचिका तयार करून ती दाखल केल्यावर खंडपीठाच्या कार्यक्षेत्रात येणाºया १२ जिल्ह्यांच्या जिल्हा पोलीस अधीक्षकांना आणि जिल्हाधिकार्‍यांना प्रतिवादी करून १, २ व ३ जानेवारी रोजी सुनावणी घेण्यात आली.

खरे तर राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाने (National Green Tribunal-NGT) अशा नॉयलॉन माज्यावर देशव्यापी बंदी घालण्याचा आदेश यापूर्वीच दिला आहे. त्यानंतर राज्य सरकारने त्या आदेशाची कसोशीने अंमलबजावणी करण्याचे निर्देश सर्व जिल्हाधिकारी व महापालिका आयुक्तांना दिले. तरीही राज्यात या मांज्याची विक्री सुरु आहे व त्या मांज्यामुळे माणूस आणि पक्ष्यांचे जीव धोक्यात येत आहेत, याची न्यायालयाने नाराजीसह प्रकर्षाने नोंद घेतली. खास करून येत्या संक्रातीला मोठया प्रमाणावर पतंग उडविले जातील हे लक्षात घेऊन प्रकरण अधिक नेटाने चालविले गेले.

न्यायालयाने पहिल्या दिवशी तोंडी निर्देश देताच सुस्तावलेली पोलीस यंत्रणा जागी झाली. औरंगाबाद शहरातील १६ पैकी सहा पोलीस ठाण्यांनी त्यांच्या हद्दींमध्ये अचानक धाडी टाकून नॉयलॉन मांज्या विकणार्‍या आठ जणांना अटक करून त्यांच्याकडून १३,८३० रुपयांचा नॉयलॉन मांजा जप्त केला. मात्र बाकीच्या १० पोलीस ठाण्यांनी काहीही कारवाई केली नाही, याचीही नोंद घेण्यात आली. जे अधिकारी यात हयगय करतील त्यांच्यावरही कारवाई करण्यात येईल, असेही न्यायालयाने स्पष्ट केले.

बाकीच्या जिल्ह्यातील जिल्हा पोलीस अधीक्षक, जिल्हाधिकारी व महापालिका आयुक्तांना नोटीस काढण्यात आली असून त्यांचे म्हणणे ऐकण्यासाठी मंगळवारी ५ जानेवारी रोजी पुढील सुनावणी होईल.

-अजित गोगटे

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER