भारतीय बॉक्सिंगचा ‘हिरो’ गेला…

dingko singh - Maharashtra Today

बॉक्सिंगच्या (Boxing) रिंगमध्ये डिंगको सिंगने (Dingko Singh) कितीतरी वेळा आपल्या प्रतिस्पर्ध्यांना हरवलं पण आयुष्याच्या लढाईत तो कर्करोग नावाच्या प्रतिस्पर्ध्याला मात्र तो हरवू शकला नाही आणि यकृताच्या कर्करोगाने (Liver Cancer) गुरुवारी त्याला कायमचे नाॕकडाउन केले…वयाच्या अवघ्या 42 व्या वर्षी! गेल्या चार वर्षांपासून तो लिव्हर कॕन्सर नामक प्रतिस्पर्ध्याशी लढत होता पण ही लढत अपयशी ठरली आणि इम्फाळ येथे त्याने शेवटचा श्वास घेतला.

डिंगको हा साधारण खेळाडू नव्हता तर भारताच्या क्रीडा इतिहासात त्याचे खास स्थान आहे ते यासाठी की, त्याने तब्बल 16 वर्षांच्या खंडानंतर भारताला बँकाॕक आशियाडमध्ये बॉक्सिंगचे सुवर्णपदक जिंकून दिले होते. 1998 मध्ये बँटमगटात तो विजेता ठरला होता आणि आपल्या या यशाने त्याने कितीतरी युवकांना बाॕक्सिंगकडे वळण्यास प्रेरित केले.

या सुवर्ण विजेत्या बॉक्सरच्या पश्चात पत्नी, मुलगा आणि मुलगी असा परिवार आहे. डिंगकोच्या मित्रांनी दिलेल्या माहितीनुसार गेल्या तीन महिन्यांपासून त्याची प्रकृती ढासळत गेली.

डिंगको प्रकाशात आला तो 1997 साली. बँकाॕक येथील किंग्ज कप स्पर्धेत तो विजेता ठरला. मात्र त्यानंतर राष्ट्रकूल सामन्यांमध्ये तो दुसऱ्याच फेरीत बाद झाला आणि सुरुवातीला 1998 च्या आशियाडसाठी त्याला भारतीय पथकात स्थान मिळाले नव्हते. त्या निराशेतून त्याने मद्यपानास सुरूवात केली होती पण आशियाडसाठी शेवटच्या क्षणी त्याला भारतीय संघात स्थान मिळाले आणि त्या संधीचे डिंगकोने सोने केले.

या सोनेरी वाटचालीत डिंगकोने सुवर्णपदकाचा दावेदार स्थानिक बॉक्सर आणि त्यावेळचा जगातील नंबर दोन वोंग प्राजेस सोंताया याला मात दिली होती. ही आपल्या कारकिर्दीतील सर्वात खडतर लढत होती असे डिंगको सांगायचा. सोंतायाच्या या पराभवाने स्थानिक थायी प्रेक्षक एवढे संतापले की त्यांनी डिंगकोवर बियरच्या कॕन फेकून गोंधळ घातला होता. त्यानंतर सुवर्णपदकाच्या लढतीत जगातील तिसऱ्या क्रमांकाचा उझबेकी बॉक्सर तिमूर तुल्याकोव्ह याला मात दिली होती.

त्यानंतर इम्फाळमध्ये त्याचे अभूतपूर्व स्वागत झाले होते. मणिपूर सरकारने एका रस्त्याला त्याचे नावसुध्दा दिले आहे. त्याला 1998 मध्ये अर्जुन पुरस्काराने आणि 2013 मध्ये पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.

डिंगकोने खेळाडू म्हणूनच नाही तर प्रशिक्षक म्हणूनही यश मिळवले होते. त्यांच्या प्रशिक्षणात तयार झालेल्या नौदलाच्या संघाने 2009 मध्ये आंतर सेनादल स्पर्धांचे विजेतेपद पटकावले होते आणि आॕलिम्पिकपटू अंथरेश लाकडा व राष्ट्रकूल विजेता सुरंजय सिंग यांना त्याने प्रशिक्षित केलेले आहे. सुरंजयने त्यांच्याबद्दल म्हटलेय की मास्तर म्हणून ते फार कडक होते पण सरावानंतर ते मित्रासारखे रहायचे. कष्टाशिवाय फळ नाही असा त्यांचा मंत्र होता.

नौदलातून निवृत्त झाल्यावर डिंगकोने भारतीय क्रीडा प्राधिकरणासाठी इम्फाळ येथे सेवा दिली. 2019 च्याराष्ट्रीय स्पर्धांवेळी ते मणिपूरचे मुख्य प्रशिक्षक होते.ही त्यांनी पार पाडलेली शेवटची जबाबदारी ठरली.

डिंगको हा अतिशय चिकाटीचा व निश्चयी बाॕक्सर होता. विजेंदरच्या आॕलिम्पिक कास्यपदकाआधी डिंगकोच्या यशाने बाॕक्सिंगची लोकप्रियता, विशेषतः ईशान्येकडील राज्यात खूप वाढवली असे 1998 मधील मुख्य प्रशिक्षक जी.एस. संधू यांनी म्हटले आहे.

डिंगकोच्या उपचारासाठी निधी जमवण्यात पुढाकार घेतलेल्या विजेंदरसिंगने भावनावश होऊन सांगितले की, डिंगकोचे असे जाणे फारच धक्कादायक आहे. मी तरूण असताना त्याच्या लढती बघत होतो आणि खरोखरच त्याने कितीतरी युवकांना बॉक्सिंगकडे वळण्यास प्रेरित केले आहे. सहा वेळची विश्वविजेती मेरी कौम हिने श्रध्दांजली वाहताना म्हटलेय की, डिंगको हा देशाचा खरा हिरो होता. तो गेलाय पण त्याचा वारसा आम्ही पुढे चालवू.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button